Vegetable : शेतकरी नियोजन पीक : कोबी

मागील ४० वर्षांपासून दिघोळे बंधूंची खरीप हंगामात १० ते १२ एकरांवर, तर रब्बीत २ ते ३ एकरांवर कोबी लागवड असते. सिंचन, खते व कीड-रोग व्यवस्थापनावर विशेष महत्त्व दिले जाते. या वर्षी खरिपात १० एकरांवर कोबीची लागवड केली आहे.
Cabbage Farming
Cabbage FarmingAgrowon

शेतकरी ः रघुनाथ नामदेव दिघोळे

गाव ः जायगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक

एकूण शेती ः २५ एकर

कोबी लागवड ः १० एकर

जायगाव (जि. नाशिक) येथे दिघोळे बंधूंची २५ एकर शेती आहे. त्यापैकी १० एकरांवर कोबी लागवड (Cabbage Cultivation), तर उर्वरित क्षेत्रामध्ये टोमॅटो (Tomato), सोयाबीन (Soybean) आणि चारा पिकांची लागवड (Fodder Crop Cultivation) असते. कुटुंबातील मधले बंधू रघुनाथ हे शेतीच्या सर्व कामांचे नियोजन करतात. तर थोरले बंधू गणपत आणि धाकटे बंधू जगन्नाथ यांच्यासह त्यांची मुले सतीश आणि राहुल दिघोळे हे शेतीकामांचे तांत्रिक व्यवस्थापन पाहतात.

मागील ४० वर्षांपासून दिघोळे बंधूंची खरीप हंगामात १० ते १२ एकरांवर, तर रब्बीत २ ते ३ एकरांवर कोबी लागवड असते. सिंचन, खते व कीड-रोग व्यवस्थापनावर विशेष महत्त्व दिले जाते. या वर्षी खरिपात १० एकरांवर कोबीची लागवड केली आहे. यंदा खासगी कंपनीचे गोल गड्डा प्रकारातील बियाणे लागवडीसाठी वापरले आहे. रोपवाटिकेतील रोपे विकत आणून त्यांच्या लागवडीतून उत्पादन खर्च निघत नाही. कारण विक्रीवेळी कमी दर मिळाल्यास उत्पादन खर्च निघण्यास अडचण येते. त्यामुळे घरीच रोपवाटिका तयार करून पुनर्लागवड करण्यावर त्यांचा भर असतो.

पानांचा आकार, घट्टपणा, आकारमान, रंग तसेच गड्ड्याचा आकार चांगला तयार होईल, अशापद्धतीने व्यवस्थापन केले जाते. प्रामुख्याने ‘गोल गड्डा’ या प्रकारातील कोबी लागवडीकडे जास्त कल असतो.

रोपनिर्मिती

एप्रिल महिन्याच्या शेवटी रोपवाटिकेसाठी जमिनीची योग्यप्रकारे पूर्वमशागत केली जाते.

ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे ४ फूट रुंद आणि १५ फूट लांबीचे वाफे तयार केले जातात.

बियाणे लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया केली जाते. त्यामुळे वाढीच्या काळात आणि काढणी अवस्थेत येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळला जातो.

मे महिन्याच्या शेवटी वाफ्यांवर बियाणे फोकून टाकले जाते. एकरी साधारण १५० ते २०० ग्रॅम पुरेसे होते.

बियाणे फोकल्यानंतर लगेच पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाते.

साधारण १ महिन्यात रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

Cabbage Farming
Vegetable Market : टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या दरात सुधारणा

लागवड पद्धती

पुनर्लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची दोन वेळा उभी आडवी खोल नांगरणी आणि कुळवणी करून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर हेक्टरी २५ टन प्रमाणे शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात.

रोप लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने ४ फूट रुंद आणि १५ फूट आकाराचे सपाट वाफे तयार केले जातात. या वाफ्यांवर दोन रोपांत १७ इंच अंतर राखले जाते.

साधारण जून महिन्याच्या अखेरीस ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुनर्लागवडीची कामे पूर्ण केली जातात. लागवडीसाठी योग्य वाढ झालेली आणि निरोगी रोपे निवडली जातात.

रोप लागवडीनंतर त्वरित पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाते.

Cabbage Farming
Vegetable Rate : कळमना बाजारात पालेभाज्यांच्या दरात तेजी

खत व्यवस्थापन

लागवडीच्या वेळी सिंगल नत्र ४५ किलो, स्फुरद ५५ किलो, पालाश ५० किलो आणि सुपर फॉस्फेट ६५ किलो याप्रमाणे रासायनिक खतांचा पहिला हप्ता दिला जातो. लागवडीनंतर ५-६ आठवड्यांनी नत्र ६५ किलो आणि पोटॅश ५० किलो याप्रमाणे मात्रा दिली जाते.

सिंचन व्यवस्थापन

सिंचनासाठी प्रवाही पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र पाण्याची कमतरता असेल तेव्हा ठिबकद्वारे सिंचन केले जाते. साधारणपणे सायंकाळच्या वेळी सिंचन केले जाते. गड्डे तयार होण्याच्या अवस्थेत पिकास अतिरिक्त सिंचन करणे टाळले जाते.

आंतरमशागत

कोबीची मुळे जमिनीत ५ ते ७ सेंमी खोल जातात. वाढीच्या अवस्थेत खोल मशागत केल्यास मुळांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे तण नियंत्रणावेळी हलकी खुरपणी करून मशागत केली जाते.

कीड व रोगनियंत्रण

रोपवाटिका तयार केल्यापासून कोबी पीक निघेपर्यंत कोणत्याही अवस्थेत कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात.

लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात मर रोग, चौकोनी ठिपक्याचा पतंग इत्यादींच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पांढरे डाग पडणे, लहान छिद्रे पडणे अशा समस्या दिसून येतात. त्यासाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करून आवश्यकतेनुसार फवारणी केली जाते.

लागवडीनंतर १५ दिवसांनी आणि ४० दिवसांनंतर रंगीत ठिपक्याच्या ढेकणाचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे ढेकूण पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे पिवळी पडतात.

रोपे तयार करण्यापासून काढणीपर्यंत मावा किडीचा प्रादुर्भाव होतो. याशिवाय पांढरी माशी पिकात उपद्रव करते. या किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनाच्या प्रतवारीवर परिणाम होतो.

कंद तयार होत असताना लागवडीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी कंद पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होतो. ही अळी कंदाला छिद्रे पाडून नुकसान करते.

- सतीश दिघोळे, ७०५७०६३१२३

- राहुल दिघोळे, ७५५९१६५७९५

(शब्दांकन ः मुकुंद पिंगळे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com