Chana Pest Management : घाटे अळी हरभरा पिकासाठी किती नुकसानकारक? या अळीचे व्यवस्थापन कसे कराल?

एक घाटे अळी तिच्या जीवनात २० ते २५ घाट्यांना नुकसान करते. घाटे अळीमुळे पिकाचे ५ ते ३८ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
Chana Pod Borear
Chana Pod BorearAgrowon

डॉ. प्रज्ञा शं. कदम

Chana Pod Borer Management : मागील काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण (Cloudy Weather) हरभऱ्यावरील घाटे अळीस पोषक ठरत आहे. सध्या या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पीक कळ्या, फुले व घाटे अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव (Chana Pest Outbreak) जास्त नुकसानकारक ठरतो.

एक घाटे अळी तिच्या जीवनात २० ते २५ घाट्यांना नुकसान (Chana Outbreak) करते. घाटे अळीमुळे पिकाचे ५ ते ३८ टक्क्यांपर्यंत नुकसान होते. रब्बी हंगामात हरभरा (Rabi Chana) पिकात घाटेअळीच्या २-३ पिढ्या पूर्ण होतात. वेळीच उपाययोजना केल्यास घाटे अळीच्या नियंत्रणात मदत होईल.

घाटे अळीची ओळख : हेलीकोवर्पा आर्मिजेरा

ही कीड तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, अमेरिकन बोंड अळी, हिरवी बोंड अळी व हरभऱ्यावरील घाटे अळी या विविध नावाने ओळखली जाते.

ही एक बहूभक्षी कीड आहे. कडधान्यामध्ये तूर, हरभरा, मसूर, वाटाणा, चवळी या पिकांवर आढळते. तर कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, कोबी व एरंडी इ. पिकांवरही प्रादुर्भाव होतो.

Chana Pod Borear
Chana Pest : बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

१) पतंग पिवळसर रंगाचा असतो. पुढील पंखाची जोडी तपकिरी असून, त्यावर काळे ठिपके असतात. मादी पतंग हरभऱ्याच्या कळ्या व फुलांवर अंडी घालतात.

२) अंडी खसखसीच्या दाण्याप्रमाणे दिसतात. अंडी अवस्था २-३ दिवसांची असते.

३) अंड्यातून निघालेल्या अळ्या फुले व घाट्यातील दाणे खाऊन १५-२० दिवसांत पूर्ण विकसित होतात. पूर्ण विकसित झालेली अळी ३० ते ४० मि.मी. लांब असून, ती विविध रंग छटांमध्ये आढळून येते. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रांगा असतात.

४) पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोष तपकिरी रंगाचा असतो.

Chana Pod Borear
Chana Pod Borer : ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळी

नुकसानीचा प्रकार :

अंड्यातून निघालेल्या प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या प्रथम पानावरील आवरण (हिरवा पदार्थ) खरडून खातात. त्यामुळे पाने काही अंशी जाळीदार होतात. त्यानंतर अळी कळी, फुले व घाट्यांवर उपजीविका करते.

या अळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अळी घाट्यात तोंडाकडील भाग खुपसून दाणे खाते. तिचा पार्श्र्वभाग घाट्याच्या बाहेर राहतो. अळी घाट्यातील दाणे फस्त करते, त्यामुळे घाटे पोकळ होतात.

Chana Pod Borear
Chana Pest : हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

आर्थिक नुकसानीची पातळी :

पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना सर्वेक्षण करावे. दोन अळ्या प्रती मीटर ओळीत आढळून आल्यास अथवा ५ टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच अथवा सतत ३ दिवस प्रत्येक कामगंध सापळ्यात ८ ते १० नर पतंग सापडत असल्यास किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असे समजावे. त्वरित पीक संरक्षणाचे उपाय योजावेत.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

१) दरवर्षी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यामुळे हरभऱ्यावरील घाटे अळ्यांचे कोष नष्ट होतील.

२( कीड प्रतिबंधक वाणांचा वापर आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत करतो. उदा. जाकी ९२१८, कनक, विजय, दिग्विजय, कांचन या वाणांमध्ये इतर वाणांपेक्षा घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आला आहे.

३) हरभऱ्यात गहू, मोहरी, जवस, कोथिंबीर अशी मिश्र पिके घ्यावीत.

४) शेताच्या बांधावरील अळीचे पर्यायी खाद्य उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.

५) पीक कळी अवस्थेत आल्यापासून १ फूट उंचीवर प्रति हेक्टरी ५ ते १० कामगंध सापळे लावावे. (हेलील्युअर/ हेक्झाल्युअर)

६) मोठ्या अळ्या वरच्यावर वेचून त्यांचा नायनाट करावा.

७) शेतात पक्ष्यांकडून घाटे अळीचे नियंत्रण शक्य होते. त्यांना आकर्षित करण्यासाठी २० पक्षिथांबे प्रति हेक्टरी उभारावेत.

८) पीक कळी अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ४ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

९) घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या दिसू लागताच, एचएएनपीव्ही विषाणूवर आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी. विषाणूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी राणीपाल किंवा नीळ १ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणीच्या द्रावणात मिसळावे.

वरील सर्व उपायांच्या अंमलबजावणीनंतर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे शिफारशीत कीटकनाशकांचा वापर आलटून पालटून करावा.

फवारणी प्रति लिटर पाणी

क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा

इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४५ ग्रॅम किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा

फ्लूबेंडायअमाइड (८.३३ टक्के) + डेल्टामेथ्रीन (५.५६ एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मि.लि.

किंवा लॅम्बडा सायलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १.२ मि. लि.

किंवा नोव्हॅल्युरॉन (५.२५ टक्के) + इन्डोक्झाकार्ब (४.५० एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) १.६५ मि.लि.

डॉ. प्रज्ञा शं. कदम ९९७५८९४९९५, (सहा. प्राध्यापक -कीटकशास्त्र, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com