Paddy : चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान

शेतकरी सुधारित भात पीक लागवड पद्धतीचा अवलंब करू लागले असले सर्व चारही सूत्रांचा अवलंब करत नाहीत. त्यामुळे उत्पादनात अपेक्षित वाढ मिळत नाही. कै. डॉ. नारायण सावंत यांनी विकसित केलेले चार सूत्री भात लागवड तंत्रज्ञान कसे वापरायचे ते पाहू.
Paddy
Paddy Agrowon

डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. तुकाराम भोर, संदीप कदम

कै. डॉ. नारायण सावंत यांनी चार सूत्री भात लागवड (Charsutri Paddy Cultivation) पद्धत एकात्मिक सेंद्रिय रासायनिक तंत्रज्ञानावर (Organic Chemical Technology) आधारित तयार केली आहे. हे तंत्र सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीतील बी, मजूर व खत (Fertilizer) यांच्या खर्चात कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती (Paddy Farming) निश्चितपणे फायदेशीर करणारे आहे. ती चार सूत्रे पाहू.

सूत्र १: भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर

१ अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळणे

भाताच्या तुसाची काळी राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे!) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चौरसमीटर एक किलो या प्रमाणात ४ ते ७ सें. मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर प्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.

मात्र भरडणीवेळी भाताचे तूस हे गिरणीमध्येच राहतात. ते शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. अशा वेळी मागील वर्षीच्या भात पिकातील पळींज वापरता येईल. त्यातही सिलिकॉन घटक मोठ्या प्रमाणात असतात. सामान्यपणे शेतकरी हे पळिंज फेकून देतात. त्याऐवजी ते पोत्यामध्ये भरून साठवून ठेवावे. पुढील वर्षी भात रोपवाटिकेवेळी त्याची काळी राख टाकता येते. त्यावर प्रक्रिया केलेले बियाणे पेरावे.

फायदे -

१) तूस किंवा पळिंजांच्या राखेतील सिलिकॉन उपलब्ध झाल्यामुळे भाताची रोपे निरोगी व कणखर निपजतात.

२) रोपांच्या मुळांची वाढ होण्यास मदत होते. रोप उपटणे, पुनर्लागवड या काळातील धक्का सहन करण्याची शक्ती मिळते. ३) खोडकिडा व पानांवरील करपा रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता रोपांमध्ये निर्माण होते.

४) रोपांची वाढ उत्कृष्ट होऊन भाताचे व पेंढ्याचे उत्पादन वाढते.

१ब ) भात पेंढा नांगरणीवेळी शेतात गाडणे

पहिल्या नांगरणीवेळी हेक्टरी २ टन या प्रमाणात भाताचा पेंढा शेतात गाडून घ्यावा. अनेक जण चिखलणीवेळी हा पेंढा गाडत असल्यामुळे कुजत नाही. रोपांच्या लागवडीवेळी अडचणी येतात. ते टाळण्यासाठी पहिल्या नांगरणीवेळीच भात पेंढ्यांचे बारीक तुकडे करून गाडावे. जून महिन्यातील पावसामध्ये तो कुजतो. चिखलणीवेळी तो मातीत उत्तम मिसळला जातो.

फायदे :

१. भातपिकांना सिलिका (१००-१२० कि.ग्रॅ.) व पालाश (२०-२५ कि.ग्रॅ.) यांचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थांत वाढ होते.

२. रोपे निरोगी व कणखर होतात.

३. रोपांमध्ये खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. रासायनिक कीडनियंत्रण करावे न लागल्यामुळे प्रदूषण टळते.

४. भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

Paddy
Paddy : भात पिकावर रसायनांचा वापर कमी करणार

सूत्र २ : वनशेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) या हिरवळीच्या खताचा हेक्टरी २ ते ३ टन वापर

गिरिपुष्प हिरवळीचे खत (२ ते ४ गिरिपुष्पाच्या झाडाची हिरवी पाने किंवा अंदाजे ३० कि.ग्रॅ./आर) चिखलणीपूर्वी २ ते ३ दिवस अगोदर पसरावीत व नंतर चिखलणी करून रोपाची लावणी करावी.

हिरवळीचे खत वापरण्याची सोपी पद्धत

१. गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें. मी उंचीवर तोडाव्यात. (दर वर्षी गिरिपुष्प झाड मोठे होऊ देऊ नये.)

२. त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी ६ ते ८ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. आठवड्यात फांद्यांवरील पाने गळून पडतात.

३. उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी इंधन म्हणून वापराव्यात. चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात व्यवस्थित मिसळावीत नंतर लावणी करावी.

Paddy
Paddy : देशात सरासरीऐवढी भात लागवड होईल

फायदे.

१. भातरोपांना सेंद्रिय-नत्र (हेक्टरी १० ते १५ कि. ग्रॅ.) वेळेवर मिळतो.

२. खाचरात सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे जमिनीची जडणघडण सुधारते.

३. सेंद्रिय पदार्थ मर्यादित प्रमाणात गाडले जातात. त्यातून मिथेन निर्मितीचे प्रमाणही अल्प राहून प्रदूषण कमी होते.

४. गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात.

ज्या शेतकऱ्यांना गिरिपुष्प उपलब्धतेमध्ये अडचणी आहेत, अशांनी त्याऐवजी ताग व धैंचा अशी हिरवळीची पिके जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरावीत. ती चिखलणीवेळी गाडून घ्यावीत. त्यानंतर भात रोपांची पुनर्लागवड करावी. हिरवळीच्या पिकाचा भराभर पाला वाढून ४ ते ६ आठवड्यांनी फुलोऱ्यावर येते. शक्यतो ही पिके द्विदलवर्गीय असतात. ती हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीत नत्राचा पुरवठा वाढवतात. त्यांचे खोडही कोवळे, लुसलुशीत असल्याने लवकर कुजते.

अ) ताग ः हे सर्वांत उत्तम असे हिरवळीचे खत असून, चिखलणीवेळी हेक्टरी १० टन जमिनीत गाडावे. सर्व जमिनीत हे पीक चांगले वाढते. मात्र पाणथळ जमिनीत चांगली वाढ होत नाही. हेक्टरी ५०-६० किलो बी पेरावे. पीक ६० ते ७० सें.मी. वाढते. नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून, हेक्टरी सुमारे ८० ते ९० किलोग्रॅम नत्र पिकाला मिळतो. या पिकाला सिंचनाची गरज असते.

ब) धैंचा ः हे पीक कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीतसुद्धा तग धरू शकते. मुळांवर गाठी असतात. लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलोग्रॅम बी लागते. पीक ९० ते १०० सें.मी. वाढून, १८ ते २० टन हिरव्या सेंद्रिय पदार्थांची निर्मिती होते. नत्राचे प्रमाण ०.४६ टक्का असून, हेक्टरी ८० किलोग्रॅम नत्र पिकास उपलब्ध होते. चिखलणीच्या वेळी हेक्टरी १० टन हिरवळीचे धैंचा खत जमिनीत गाडावे.

सूत्र ३ : सुधारित किंवा संकरित जातीच्या भाताची रोपांची (२५ चूड/चौ.मी.) नियंत्रित लावणी

१. अधिक उत्पादनासाठी बुटक्या, जास्त फुटवे देणाऱ्या सुधारित अथवा संकरित भात जातीचा वापर करावा.

२. भात तुसाची काळी राख रोप वाटिकेमध्ये वापरून तयार केलेली रोपे (अंदाजे उगवणीपासून ३ आठवड्यांनी) लागवडीसाठी वापरावीत.

३. लागवड करताना प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे.

४. रोपे सरळ व उथळ (२ ते ४ सें. मी. खोलीवर) लावावीत.

५. नियंत्रित लागवडीसाठी सुधारित दोरीवर १५-२५ सें. मी. बाय १५-२५ सें. मी. अंतरावर रोपे लावावीत.

६. शेताच्या बांधाजवळून लागवडीस सुरुवात करावी.

सुधारित लागवड दोरीवर १५ सें. मी अंतरावर असलेल्या (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर २५ सें. मी पुढे आणखी तिसरा व १५ सें. मी अंतरावर चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत नियंत्रित लागवड पूर्ण करावी. खाचरात अनेक १५ बाय १५ सें. मी. चुडांचे चौकोन व २५ सें. मी. चालण्याचे रस्ते तयार होतात.

फायदे.

१. प्रचलित पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३०% बचत होते. परिणामी बियाणे, रोपे तयार करणे यांचे श्रम व पैसा वाचतो.

२. तसेच कापणीवरील मजुरीचा खर्चही कमी होतो.

३. शेतकऱ्यांना खतगोळ्या (ब्रिकेट्स) कार्यक्षमपणे वापरता येतात.

सूत्र ४: - खतगोळ्या खोचणे

नियंत्रित पुनर्लागवडीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) १ ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१० सें. मी. खोल खोचाव्यात. युरिया-डीएपी खत (६०:४० मिश्रण) वापरून ब्रिकेट्‍स (२७ ग्रॅम/१० ब्रिकेट्स) उशीच्या आकारात यंत्राच्या साह्याने तयार करता येतात. एका आर क्षेत्रात ६२५ ब्रिकेट्स (१.७५ कि.ग्रॅ.) पुरतात. यातून मिळणाऱ्या खताची मात्रा (प्रति हेक्टरी) : ५७ कि. ग्रॅ. नत्र अधिक २९ कि.ग्रॅ. स्फुरद इतकी असते. एकूण हेक्टरी ६२,५०० ब्रिकेट्स(१७० किलो) लागतात.

नियंत्रित पुनर्लागवडीनंतर त्याच दिवशी युरिया-डीएपी ब्रिकेट हाताने रोवण्याचे फायदे ः

१. लागवडीच्या भातासाठी नत्र व स्फुरद वापरण्याची ही कार्यक्षम पद्धत आहे.

२. पाण्याबरोबर नत्र व स्फुरदयुक्त खत वाहून जात नाही. दिलेल्या खतापैकी ८०% पर्यंत नत्र भातपिकास उपयोगी पडते. खत वाहून पाण्याचे होणारे प्रदूषण टळते.

३. खतात ४०% पर्यंत बचत होते. त्या प्रमाणात खताचा खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होते.

४. ब्रिकेट्‍स खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत. तणाचा त्रास कमी होतो. तणनाशक न वापरल्यामुळे प्रदूषण टळते.

५. भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) निश्‍चित वाढते. भात शेती फायद्याची होते.

डॉ. नरेंद्र वि. काशीद, ९४२२८५१५०५

(प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com