Paddy Farming : तेथे कर माझे जुळती...

छत्तीसगढ हे राज्य आदिवासी बहुल म्हणून मानले जाते. मध्य भारतातील घनदाट जंगल, पठारे आणि भारताचा नायगरा समजला जाणारा चित्रकोट धबधबा याच भागात. सराई किंवा सालवृक्ष या भागातले खास वैशिष्ट्य. याच्याशी संबंधित अनेक लोककथा व मिथके येथे ऐकायला मिळतात. जेथे सालाचे वृक्ष तेथे मोठ्या प्रमाणात लोहखनिज, ही इथली सर्वमान्य समजूत. तांदळाचे आंबवून केलेले पेय हडीया आणि त्यासोबत मुंग्यांची चटणी हे इथल्या भागातील खास पदार्थ. शाकाहारी लोकांसाठीच खास असणारे या भागातील जातबोडा सालबोडा या अनोख्या चवीच्या नैसर्गिक अळंबी इथे हमखास मिळणार. जशा इथल्या गोष्टी अनोख्या तसेच इथले लोक व त्यांची संस्कृती.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

‘धानाचा कटोरा’ (Paddy Hub) असे संबोधन मिळालेल्या छत्तीसगढ राज्यात भातशेती (Paddy Farming) मोठ्या प्रमाणात पिकते आणि जशी स्थानिक भौगोलिकता बदलते, तशी इथली स्थानिक वाणे/बियाणे (Paddy Verity) बदलत जातात. स्थानिक बियाण्यांचे (Local seed) महत्त्व वातावरण बदलाच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. वातावरण बदलाचा सर्वात मोठा फटका गेल्या काही वर्षांत पीकपद्धती व शेतीचे उत्पन्न यांना बसत आहे. या समस्येचे स्वरूप गंभीर होईल तेव्हा अन्ननिर्मितीच्या व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. त्याचा अन्न पुरवठ्यावर (Food Supply) परिणाम निश्‍चित होणार. म्हणून आतापासूनच याविषयी सजग राहून पर्याय तयार ठेवणे आवश्यक आहे. हीच बाब काही वर्षांपूर्वी जाणकार तज्ज्ञांनी जाणली आणि देशभरात ‘देशी बीज संवर्धना’चे काम सुरू झाले. यात छत्तीसगडदेखील मागे राहिला नाही.

Paddy Farming
Paddy Harvesting : भुदरगडला भात कापणी अंतिम टप्प्यात

विशेष म्हणजे इथे टिकून राहिलेल्या कामाची सुरुवात महाराष्ट्रातील संस्थेने केली होती. शिवराज हे इथले स्थानिक शेतकरी सांगत होते, ‘‘१९९३-९४ मध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती. अशा वेळी संस्थेच्या माध्यमातून देशी बियाण्यांचे महत्त्व समजले. आपल्याला बियाणे संवर्धन केले पाहिजे, हे लक्षात आलं.’’ तेव्हापासूनच यांच्या कामाची सुरुवात झाली. सुरुवातीला पाच-दहा भाताच्या जातींपासून सुरू झालेले हे काम हळूहळू ५०० वाणांपर्यंत वाढले.

Paddy Farming
Paddy Harvest : भात कापणीला वेग

आलटून-पालटून लागवड करत त्यांनी ते काम सातत्याने इतकी वर्षे सुरू ठेवले आहे. शिवराजजी आता वयाने थोडे थकले आहेत. त्यांचा मुलगा आता शेती करतोय. उगीचच कष्ट करून हे भात बियाणे राखण्यापेक्षा त्या शेतात भात पिकवला तर घराचे उत्पन्न वाढेल, ही त्याची अपेक्षा चुकीची नाही. पण तरीही आजही शिवराजजी १०० वाण जोपासत आहे.

Paddy Farming
Paddy Harvesting : आंबेतर्फेतील शेतात भातपीक कापणी प्रयोग

याच राज्यात खासगी, शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोठे काम उभे राहिलेले आजही दिसत आहे. रायपूर परिसरातील शेतकरी व संस्थांसोबत गेली अनेक वर्षे काम करण्यात ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले, अशा अनेक ध्येयवेड्या लोकांपैकी एक जेकब नेल्लीथेलन. बाबा आमटेंच्या भारत जोडो आंदोलनात केरळमधील आपले मूळ गाव सोडून आले ते कायमचेच. सध्या ते बीज संवर्धनासाठी देशभर फिरून प्रचार-प्रसार करत आहेत.

Paddy Farming
Paddy Straw : पेंढ्यांना योग्य दर देण्याची मागणी

आकाश बडवे हा महाराष्ट्रातील तरुण दंतेवाडासारख्या ठिकाणी लोकमाची, जवाफूल अशा दुर्मीळ बियाण्यांचे संवर्धन करण्यासोबतच सेंद्रिय शेतीचे धडे इथल्या शेतकऱ्यांना देत आहे. नक्षलग्रस्त सुखमा, दंतेवाडा भागात देखील सजग कृषी अधिकाऱ्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आणि नवी आशा पल्लवित करणारे आहेत. वैयक्तिक प्रयत्नांच्या पाठीशी यंत्रणा उभी राहिली तर काय जादू होते हे इथे पाहावयास मिळते.

भारतातील बहुतांश राज्यांत भातशेती मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. याला कर्नाटकदेखील अपवाद नाही. इथे भात, भरडधान्य शेती व इतर नगदी पिके देखील होतात. सय्यद घणी खान हा चाळिशीतील तरुण शेतकरी. महाविद्यालयात असताना पुरातत्वशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण करत होता. त्याचे कुटुंब व्यवसायाने शेतकरी. वडील अचानक निवर्तले. घरचा मोठा मुलगा म्हणून कुटुंब व पर्यायाने शेती बघण्याची वेळ त्याच्यावर आली. शेतातल्या कामाचा अनुभव व ज्ञान होतेच. शेती करण्यास सुरुवात झाली, पण मन पुरातत्व विषयाकडे वळायचे.

घरच्या भातशेतीबरोबर घणीच्या शेतात एक अजून जगावेगळी गोष्ट होती. साधारणतः ३०० वर्षांपूर्वी सैनिकांच्या सोयीसाठी लावलेली आंब्याची झाडे येथे मोठ्या प्रमाणावर होती. खरे तर ही अशी झाडे सर्व परिसरातच होती. परंतु लोकांनी कालांतराने घर बांधण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी ही झाडे तोडली. घनीच्या कुटुंबाने मात्र आपल्या बांधावरील १०० पेक्षा जास्त झाडांची जपणूक केलेली.

यात आंब्याच्या विविध जाती आहेत. संत्र्याच्या चवीचा, केळीच्या चवीचा, गोड, आंबट, लहान, मोठा अशा विविध छटा यात आहेत. जाणकारांनी मुद्दामहून वेगवेगळ्या आंब्याच्या जाती येथे लावलेल्या होत्या. हा जोपासलेला वारसा घनीला ज्ञात होताच. दरवर्षी हंगामात ही झाडे बघायला, विविध आंब्यांच्या चवी चाखायला लोक येथे येतात. त्यावरूनच त्याला ‘तांदूळ संग्रहालया’ची कल्पना सुचली.

‘‘आपली शेती ही आपल्याकडे असणारी खूप भारी गोष्ट आहे. त्यात शेतकरी म्हणून अनेक प्रयोग करण्यास आपल्याला वाव असतो,” असे तो सांगत होता. देश-विदेशांतील उत्तम भाताच्या वाणांचा संग्रह त्याने सुरू केला. निवड पद्धतीने त्यातले बियाणे निवडण्यास सुरुवात केली. भाताची नर फुले, मादी फुले, त्यांची गुणवैशिष्ट्ये, परागीकरणाच्या प्रक्रिया अशा सर्व बाबींचे ज्ञान त्याने आत्मसात केले. त्यासाठी प्रशिक्षण देखील घेतले. संकर कसा होतो, बियाण्यांची शुद्धता कशी राखावी व उत्तम वाण कसे निवडावे हे अनुभवातून पक्के होत गेले.

मग त्यातूनच दाढदुखी थांबवणारा भात, रक्तवाढीसाठी उपयुक्त असणारा भात अशा औषधी गुणधर्मांचा शोध लागला. सध्या काळ्या भाताला औषधी भात म्हणून समाजमान्यता मिळत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. परंतु काळ्या भातात जास्त विविधता नाही. म्हणून निवड पद्धतीने त्यात वेगळे वाण निर्माण केले जाऊ शकते का, याचा शोध सुरू केला आहे. आपल्या या प्रयोगांची नोंद योग्य तेथे होईल याची काळजी तो घेत आहे. याआधी देखील त्याने दोन भाताच्या वाणांचा नैसर्गिक संकर करून HS नावाची एक जात निर्माण केली. लोकांनी त्याचे ‘घनीचावल’ असे नामकरण केले आहे. त्याच्या या अनोख्या शास्त्रशुद्ध प्रयोगाबरोबरच त्याच्या

तांदूळ संग्रहालयात १३५० विविध जातींच्या भात बियाण्यांचे संवर्धन तो करत आहे. घनीने आपल्या शिक्षणचा आपल्या व्यवसायाशी असा ताळमेळ घातला आहे. ज्याचा पुढच्या पिढ्यांना नक्कीच फायदा होईल. ओडिशा राज्यातील शिबप्रसाद साहू हे धडपडे व्यक्तिमत्त्व. घरात खाण्यासाठी टंचाई असताना गावासाठी असलेल्या शासकीय योजना गावाला व्यवस्थित मिळाव्यात म्हणून प्रयत्न करू लागले.

हळूहळू गरीब गावकऱ्यांना मदत करता करता शेतीचे प्रश्‍न समजू लागले. देशी बियाण्यांचे महत्त्व पटले. त्यातूनच अनेक गावांत काम सुरू झाले. आजही त्यांच्या शेतात विविध भातांच्या ४५० पेक्षा जास्त जातींचे संवर्धन ते करत आहेत. ‘बिहाण परब’ नावाचा वार्षिक उत्सव जल्लोषात साजरा करून गावकऱ्यांचा उत्साह ते वाढवत आहेत. देशभर फिरताना असे अनेक ध्येयवेडे लोक भेटत जातात. ते शांतपणे आपले काम, आपल्या ठिकाणी राहून पार पाडत असतात. ना त्यांना कोणत्या मोठ्या सरकारी पुरस्कारांची अपेक्षा, ना कोणी झगमग कार्यक्रमात सन्मान करेल अशी आस.

हे लोक वर्षानुवर्षे सातत्याने आपले उद्दिष्ट, ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. हे सर्व करताना त्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागत असेल, हे आपण समजू शकतो. तरीही समाजाप्रति असलेल्या आपल्या जबाबदारीच्या जाणिवेतून ते अशी मोठी कामे उभे करत असतात. आणि तरीही आपल्यासोबत जमिनीवर उभे असतात. कधी कधी थोड्याशा कामानेही हुरळून जाणारे देखील असतात. पण वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचे भव्य व उदात्त काम पहिले, की आपले पाय अपोआप जमिनीवर टिकून राहण्यास मदत नक्कीच होते.

ranvanvala@gmail.com

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com