
उन्हाळ्यात सिंचनाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन करणे हे उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कायम ठेवत अधिकाधिक शाश्वत उत्पादन मिळविणे हा पाणी नियोजन आणि व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश असतो.
ऊस पीक शेतामध्ये सुमारे १२ ते १८ महिने उभे असते. वाढीच्या काळात ऊस पिकांस सतत बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे ऊस उत्पादनात चढ-उतार आढळून येतात. ऊस उत्पादन घटण्यामागे उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष हे प्रमुख कारण आहे. मॉन्सूनचा पाऊस लांबला तर पिकास पाण्याचा ताण बसण्याची शक्यता असते.
पिकास पाण्याचा ताण बसल्यामुळे वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट येते. मुख्यत्वेकरून वाढीच्या अवस्थेतील आडसाली व पूर्वहंगामी उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. उन्हाळ्यात दिवसाचा कालावधी जास्त असतो. रात्रीचे तापमानही वाढलेले असते. मुळांभोवती तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी, मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होते. उसाच्या पानावरील पर्णरंध्राद्वारे होणारे बाष्पीभवन म्हणजेच उत्सर्जन कमालीचे वाढते.
पाण्याच्या ताणामुळे होणारे दुष्परिणाम ः
- ऊस पिकाची पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.
- मुळांची कार्यक्षमता घटते. परिणामी, पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.
- पिकाच्या विविध भागांत अन्नद्रव्यांचे अपुरे वहन होते. त्यामुळे पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण घटते.
- उसातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून धशीचे प्रमाण वाढते.
- पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. तसेच उसाचे वजन घटते.
- सुरू हंगामात लागण केलेल्या तसेच खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी होते. गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने उत्पादन कमी येते.
प्रवाही सिंचन पद्धती ः
- उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लांब सरी, एका आड एक सरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा.
- प्रवाही सिंचनाचे पाट व दांड स्वच्छ ठेवावेत.
- मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊन उसाचे क्षेत्र मर्यादित ठेवावे.
- लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवावे.
- जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीत प्रत्येक सरीतून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे १ ते १.५, २ ते २.५ आणि २.५ ते ३ लिटर प्रति सेकंद याप्रमाणे विभागून द्यावा.
- ऊस पिकाची खालची वाळलेल्या पानांचे सरीत आच्छादन करावे. पाचटाचे आच्छादन केल्याने दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते. तसेच पाण्याच्या ३ ते ५ पाळ्यांमध्ये बचत होते.
- शेताच्या बाहेरील बाजूस साधारणपणे एक मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये.
- पीक कायम तणविरहित ठेवावे.
- सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करावा. पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन रासायनिक खतांचा वापर करावा.
- पाण्याचे दुर्भिक्ष असल्यास, ऊस पिकास पोटॅश खताची २५ टक्के अधिक मात्रा द्यावी. दर २१ दिवसांनी म्युरेट ऑफ पोटॅश (दोन टक्के) अधिक युरिया (२ टक्के) यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
- पाण्याचा ताण असताना रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी मल्टीन्युट्रीयंट (मॅक्रो आणि मायक्रो) द्रवरूप खतांच्या १ टक्का या प्रमाणात १ महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
- पट्टा किंवा जास्त अंतरावरील लागण पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी आंतरमशागत (कुळवणी) करावी.
- या परिस्थितीत काणी व गवती वाढ या रोगांचा तसेच खोडकीड, कांडीकीड, वाळवी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. काणी व गवती वाढ रोगग्रस्त बेटे मुळासहित काढून नष्ट करावीत. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकीड किंवा कामगंध सापळ्यांचा वापर करावा. याशिवाय फिप्रोनीलयुक्त कीटकनाशकाचा वापर एकरी १० किलो या प्रमाणात करावा.
- तुटणाऱ्या उसाच्या खोडव्याचे योग्य व्यवस्थापन (उदा. पाचट आच्छादन, पाचट प्रक्रिया (युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर), बुडख्यांची जमिनीलगत छाटणी, नांग्या भरणे आणि मल्टीन्युट्रीयंट द्रवरूप खतांची फवारणी ही कामे करावीत.
ऊस पिकात ठिबक सिंचनाचा वापर ः
ऊस पिकामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन करणे किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात व साखर उताऱ्यात भरघोस वाढ मिळते.
उसासाठी योग्य ठिबक संच ः
- ठिबक सिंचन पद्धतीत शक्यतो १६ मि.मी. व्यासाची इनलाइन ड्रीप वापरणे फायदेशीर ठरते.
- ठिबकच्या दोन नळ्यांतील अंतर मध्यम खोल जमिनीत किमान दीड मीटर (५ फूट) तर जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत १.८० मीटर (६ फूट) असावे.
- दोन ड्रीपरमध्ये ४० सेंमी अंतर असावे. आणि ड्रीपरचा प्रवाह ताशी १.६ किंवा २ लिटर असावा.
- पृष्ठभागाखालील ठिबक सिंचनासाठी दा नियंत्रित इनलाइन ड्रीप वापरणे फायदेशीर आहे. यात दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह ताशी १.६ किंवा २ लिटर असावा.
- एकाचवेळी जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ताशी १ लिटर प्रवाह देणारे ड्रीपर असणारी इनलाइन वापरणे फायदेशीर आहे.
ठिबक सिंचन पद्धतीची निवड ः
कमी कालावधीत लागवड क्षेत्रावरील सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असलेले ड्रीपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कमी अंतराने (म्हणजेच दरदिवशी अथवा एक दिवसाआड) कमी प्रवाहाने मात्र जास्त कालावधीसाठी पाणी देणे फायद्याचे असते. त्यामुळे जमिनीमध्ये पिकांच्या मुळाशी पाण्याचे अपेक्षित व योग्य प्रकारे उभे-आडवे प्रसरण होते. यामुळे मुळांची वाढ चांगली खोलवर होते. त्यामुळे ऊस पिकाची जोमदार वाढ होऊन भरीव उत्पादन मिळते. यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड, दोन ठिबक नळ्यांमध्ये योग्य अंतर व ड्रीपरचा प्रवाह निश्चित करणे महत्त्वाचे आहे.
ठिबक सिंचनाचे फायदे ः
- पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाणी व खतांचे योग्य व्यवस्थापन करता येते.
- पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये पिकाच्या मुळांजवळ अन्न, पाणी व हवा यांचे संतुलन राखता येते.
- उसाची उगवण २५ ते ३० दिवसांत एकसारखी व ७५ टक्के पेक्षा जास्त होते.
- प्रचलित सरी- वरंबा पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचन पद्धतीमुळे ४५ ते ५० टक्के पाण्यात बचत होते.
- पाणी वापर कार्यक्षमता दुप्पट ते अडीच पटीने वाढते.
- ठिबक सिंचनातून खतांचा वापर केल्याने खतांची कार्यक्षमता वाढते. तसेच खतांमध्ये ३० टक्के बचत होते.
- पीक तिथेच पाणी दिल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे तणनाशकांचा किंवा खुरपणीचा खर्च कमी होतो.
- सिंचन, खत आणि तण नियंत्रणाचा खर्च कमी झाल्यामुळे ऊस उत्पादन खर्चामध्ये सुमारे २० टक्केपर्यंत बचत होते.
- ऊस उत्पादनात ३० टक्के तर साखर उताऱ्यात ०.५ युनिटने वाढ होते.
- जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता टिकवून ठेवली जाते.
उसासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतीच्या निवडीसाठी मार्गदर्शक सूचना ः
जमिनीचा प्रकार---शिफारशीत ठिबक सिंचन प्रणाली---दोन ठिबक नळ्यातील अंतर (मी)---दोन ड्रीपरमधील अंतर (मी)---ड्रीपरचा प्रवाह (लिटर/तास)
उथळ कमी खोलीची जमीन---पृष्ठभागावरील ठिबक---१.३५---०.३०---१
मध्यम खोलीची जमीन---पृष्ठभागावरील किंवा पृष्ठभागाखालील ठिबक---१.५०---०.४०---१/१.६ /२
जास्त खोलीची काळी जमीन---पृष्ठभागावरील किंवा पृष्ठभागाखालील ठिबक---१.८०---०.५०---१.६ /२
चढ उताराची जमीन---पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रीपर असणारी इनलाइन ठिबक---१.५०---०.४०---१/ १.६
सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात प्रवाह मिळविण्यासाठी व एकसारखी ओल निर्माण करण्यासाठी ठिबक नळ्यांची लांबी खालील प्रमाणे असावी
ठिबक पद्धती---दोन ड्रीपरमधील अंतर (सेंमी)---ड्रीपरचा प्रवाह (लिटर/तास)---ठिबक नळीची लांबी (मी)---ड्रीपरचा प्रवाह (लिटर/तास)---ठिबक नळीची लांबी
(मी.)---ड्रीपरचा प्रवाह (लिटर/तास)---ठिबक नळीची लांबी (मी)
१) १६ मिमी व्यासाची इनलाइन ठिबक---५०---१---१३७---२---८८---३---६८
००---४०---१---११६---२---७४---३---५७
००---३०---१---९३---२---५९---३---४६
२) १६ मिमी व्यासाची दाब नियंत्रित इनलाइन ठिबक---५०---१---१८७---१.६---१३७---२---११९
००---४०---१---१५७---१.६---११५---२---९९
००---३०---१---१२४---१.६---९१---२---७८
३) १२ मिमी व्यासाची इनलाईन ठिबक---५०---१---८४---१.९---५४---२.८५---४२
००---४०---१---७१---१.९---४५---२.८५---३५
००---३०---१---५६---१.९---३६---२.८५---२८
४) १२ मिमी व्यासाची दाब नियंत्रित इनलाइन ठिबक---५०---१---९६---१.६---८८---२---७६
००---४०---१---८२---१.६---७२---२---६२
००---३०---१---६५---१.६---५६---२---४८
अरुण देशमुख, (सह सरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.