टोमॅटो लागवडीसाठी निवडा योग्य वाण

टोमॅटो लागवडीसाठी जास्त उत्पादन मिळणाऱ्या योग्य वाणाची निवड करावी. लागवड क्षेत्राचा विचार करून योग्य आकाराची रोपवाटिका तयार करावी.
Tomato
Tomato Agrowon Cultivation

डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. शिल्पा गायकवाड, डॉ. श्रीमंत रणपिसे

----------------------------

खरीप हंगामात (Kharif Season) टोमॅटो लागवड (Tomato Cultivation) ही मे ते जून या कालावधीत रोपवाटिकेमध्ये (Nursery) रोपे तयार करून जून ते जुलै महिन्यात पुनर्लागवड (Rellantation) केली जाते. जमीन, बियाणे, रोपवाटिका, पुनर्लागवड, सिंचन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

-----------------

हवामान ः

- टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रतायुक्त आणि उष्ण हवामान चांगले मानवते.

- सरासरी १८ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगले होते.

- तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींना इजा होते.

- टोमॅटोला लालबुंद रंग हा लायकोपीन नावाच्या रंगद्रव्यामुळे येतो. हे रंगद्रव्य तयार होण्यासाठी २१ ते २४ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास लायकोपीनच्या प्रमाणावर परिणाम होतो.

जमीन ः

- चांगला निचरा होणारी, मध्यम व काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते.

- हलक्या जमिनीत पीक लवकर निघते, तर भारी जमिनीत फळे उशिरा तोडणीस येतात. परंतु उत्पादन क्षमता वाढते.

- खरीप हंगामात लागवडीसाठी काळी जमीन शक्यतो टाळावी.

- जमिनीचा सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

- अति पावसाच्या असलेल्या क्षेत्रामध्ये हलकी ते मध्यम जमिनीत लागवड केल्यास योग्य उतार द्यावा. जेणेकरून उभ्या पिकामध्ये पाणी साठून राहणार नाही.

- क्षारयुक्त व चोपण जमिनीत पिकाची वाढ खुंटते, फूलगळ होते. अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि क्षारयुक्त पाण्यातील क्षारांचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी जमिनीत चर काढणे आवश्यक आहे.

सुधारित वाण ः

टोमॅटोमध्ये सरळ व संकरित प्रकारात विविध वाण उपलब्ध आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्थानिक, मध्यम ते लांबच्या पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी विविध वाण प्रसारित केलेले आहेत.

अ) सरळ वाण

१) धनश्री ः

- मध्यम वाढणारा.

- जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी.

- उत्पादन ः हेक्टरी ४५ ते ५० टन.

- कालावधी १६५ दिवस.

- फळ पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारकक्षम.

२) भाग्यश्री

- मर्यादित वाढणारा

- जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी

- उत्पादन ः हेक्टरी ४० ते ४५ टन

- कालावधी १६५ दिवस

- फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम.

ब) संकरित वाण

१) फुले राजा

- सतत वाढणारा

- लांबच्या बाजारपेठेसाठी

- उत्पादन ः हेक्टरी ५५ ते ६० टन.

- कालावधी १८० दिवस

- फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम.

२) फुले केसरी

- मर्यादित वाढणारा

- फळांचा रंग केसरी

- उत्पादन ः हेक्टरी ५५ ते ५७ टन.

- विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम.

३) फुले जयश्री (चेरी टोमॅटो)

- अमर्यादित वाढणारा

- उत्पादन ः हेक्टरी ५० ते ५५ टन.

- फळाचे सरासरी वजन ६.३० ग्रॅम.

- विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम

बियाणे प्रमाण ः

साधारणपणे सरळ वाणांसाठी ४०० ग्रॅम व संकरित वाणांसाठी १२५ ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरसाठी बियाणे पुरेसे होते.

बीजप्रक्रिया ः

थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे चोळावे. त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. (ॲग्रेस्को शिफारस आहे.)

रोपवाटिका तयारी ः

- साधारणपणे १ हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी ३ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते.

- रोपवाटिकेची जमीन उभी आडवी चांगली नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.

- त्यानंतर ३ मी. लांब, १ मी. रुंद आणि १५ सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत.

- गादीवाफ्यांमध्ये ५ किलो चांगले कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५:१५ आणि २०० ग्रॅम निंबोळी पेंड चांगली मिसळावी. सोबत ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड (डब्ल्यू.पी.) ५० ग्रॅम एकसारखे मिसळून घ्यावे. जेणेकरून रोपवाटिकेमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळला जाईल.

- गादीवाफ्यावर हाताने किंवा खुरप्याच्या साह्याने १० सेंमी अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सेंमी अंतरावर बी पेरावे. लगेच बी मातीने झाकून झारीने हलके पाणी द्यावे.

- साधारण ५ ते ८ दिवसांत बी उगवते. बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाटाने पाणी द्यावे. पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

- रोपे २५ ते ३० दिवसांत पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

- रोपे उगवल्यानंतर ६० ते १०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ कापड २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणी प्रमाणे गादी वाफ्यावर लावून रोपे झाकून घ्यावीत.

- रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी,

नियंत्रण ः फवारणी (प्रतिलिटर पाणी)

टेब्युकोनॅझोल (२९.५ ईसी) १ मिलि अधिक फिप्रोनील (५ एसपी) १.५ मिलि किंवा

थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.४ ग्रॅम किंवा

कार्बोसल्फॉन १ मिलि

बियाणे उगवल्यानंतर १० दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून २ ते ३ वेळा फवारणी करावी.

(ॲग्रेस्को शिफारस आहे.)

ट्रे पद्धत ः

- ट्रे पद्धतीने रोपे तयार करण्यासाठी ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. १ ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट आवश्यक असते. कोकोपीट द्वारे भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमाणे बी पेरावे.

- या पद्धतीमध्ये बियाणे वाया जात नाही. तसेच रोपांची वाढ सशक्त होते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

- रोपांच्या वाहतुकीसाठी ट्रे पद्धत सोईस्कर ठरते.

- अन्नद्रव्यांसाठी रोपांमध्ये स्पर्धा होत नाही. त्यामुळे रोपांची एकसारखी वाढ होते.

- पुनर्लागवडीवेळी रोपे काढताना मुळे तुटण्याचा धोका नसतो. रोपे अलगद निघतात. त्यामुळे पुनर्लागवडीतील रोपांचे होणारे नुकसान टाळले जाते.

---------------------

वाढीच्या अवस्थेनुसार नियोजन ः

टोमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य काळजी घेणे गरजेचे असते. आंतरमशागत, पाणी आणि खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आदी बाबींचे नियोजन वाढीच्या अवस्थेनुसार करावे.

पहिली अवस्था ः

- ही रोपवाटिकेतील अवस्था असून ती २५ ते ३० दिवसांची असते.

- रोपवाटिकेत बियाणे पेरणी केल्यानंतर २५ ते ३० दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

- या अवस्थेमध्ये रोपे ४-५ पानांची असतात.

दुसरी अवस्था ः

- ही अवस्था लागवडीपासून २० दिवसांची असून यात रोपे स्थिर होतात.

- ही साधारण १५ ते २० दिवसांची अवस्था असते.

- या अवस्थेत मुळे नाजूक असून जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे शक्य नसते. त्यामुळे रोपांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

- रोपे स्थिर झाल्यानंतर शाकीय वाढ होण्यास सुरुवात होते.

--------------------------------------------------------

- डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७९१११५

(भाजीपाला संशोधन संकुल, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com