वातावरण बदलांचे परिणाम नाकतोड्यांच्या आहारावरही

उन्हाळ्याच्या शांत संध्याकाळी गवताळ कुरणे किंवा बागेतून फिरताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येतो. तो असतो नाकतोडे, झुडपामधील क्रिकेट या किड्यांचा.
वातावरण बदलांचे परिणाम नाकतोड्यांच्या आहारावरही
GrasshopperAgrowon

उन्हाळ्याच्या शांत संध्याकाळी गवताळ कुरणे किंवा बागेतून फिरताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येतो. तो असतो नाकतोडे, झुडपामधील क्रिकेट या किड्यांचा. त्यातील नर हे मादीला आकर्षित करण्यासाठी खास आवाज काढतात. दोन नर एकमेकांना आव्हान देण्यासाठीही काही आवाज काढतात. या कीटकांवर गवताळ कुरणातील एक मोठी जीवनसाखळी अवलंबून आहे. या कीटकांच्या आहारावर होणाऱ्या वातावरण बदलाच्या परिणामांचा अभ्यास जर्मनीमध्ये करण्यात येत आहे.

जर्मनीमध्ये ऑर्थोप्टेरा वर्गामध्ये ८० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यांच्याविषयी माहिती देताना बवारिया (जर्मनी) येथील ज्युलियास- मॅक्झिमिलियान्स युनिव्हर्सिटाट बुर्झबर्ग येथील प्राणिशास्त्रज्ञ सेबास्टियन कोनिग यांनी सांगितले, की कोणत्याही गवताळ कुरणाच्या परिस्थितिकीमध्ये नाकतोडे हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पक्ष्यांच्या आहारामध्ये त्यांचा समावेश असतो. या कीटकांमुळे कुरणातील ३० टक्क्यांपर्यंत वनस्पती बायोमास खाल्ले जाते. त्यामुळे अन्य वनस्पतीच्या वाढीला संधी मिळते.

बदलत्या वातावरणामध्ये अन्नसाखळीतील विविध घटक कशा प्रकारे प्रतिक्रिया देणार, हा प्रश्‍न सर्वांना सतावतो आहे. कारण या छोट्या छोट्या घटकांवर विविध जैविक प्रक्रिया अवलंबून असतात. प्रो. इन्गोल्फ स्टिफन- डिवेन्टेर आणि प्रो. जोचेन क्रौब यांच्या मार्गदर्शनाखाली कोनिग अभ्यास करत आहेत. त्यांनी बुर्झबर्ग, म्युनिज आणि साल्झबर्ग येथील आपल्या सहकाऱ्यांसह ऑर्थोप्टेरा आणि वनस्पती प्रजातींमधील संबंध कसे असतात, हे पाहण्यासाठी निरीक्षणे केली. त्याचे निष्कर्ष जर्नल ग्लोबल चेंज बायोलॉजीमध्ये प्रकाशित केले आहेत.

...असा झाला अभ्यास

-अभ्यासात बेरच्टेसगेडेन आल्प्स येथील उष्ण स्थानांवर समुद्रसपाटीपासून २५० ते २१०० मीटर उंचीच्या पट्ट्यामध्ये आढळणाऱ्या प्रजाती समुदायांचे २०१९, २०२० आणि २०२१ अशी सलग तीन वर्षे विश्‍लेषण केले. ४१ गवताळ कुरणांमध्ये चरणाऱ्या नाकतोड्याच्या प्रजातींचे निरीक्षण केले. त्यांनी ५४ प्रजातीच्या सुमारे ३००० नाकतोड्याच्या विष्ठेवरून आहाराचे अनुमान केले. अधिक विश्‍लेषणासाठी त्याचे डीएनए सिक्वेन्सिंग केले.

-जसेजसे अधिक उंचीवर जाऊ, तसे वनस्पती प्रजातींची वैविध्यता कमी होत जाते. त्यानुसार नाकतोड्यांच्या आहारामध्येही उंचीनुसार अत्यंत कमी वनस्पती प्रजाती मिळत जातात. जी वनस्पती उपलब्ध आहे, त्यामध्ये निवडीसाठी फारशा संधी उपलब्ध नसल्याने नाकतोड्यांचा आहारामध्ये मर्यादित वनस्पती आढळतात.

-थंड प्रदेशामध्ये तुलनेने अधिक वनस्पती खाण्यासाठी उपलब्ध असल्यामुळे नाकतोड्यांच्या आहारामध्ये अधिक वनस्पती प्रजाती आढळतात. त्याच प्रमाणे निवडीसाठी अधिक संधी उपलब्ध असल्याने विशिष्ठ आहारावर अवलंबून राहण्याची चैन परवडू शकते. हीच बाब लोअर फ्रॅन्कोनियासारख्या उष्ण रहिवासामध्येही आढळते.

-वातावरण, उपलब्ध असलेल्या वनस्पती प्रजातींचे प्रमाण यांचा परिणाम अशा वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांच्या आहारावरही होत असतो. जर त्यांनी आहारामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश केलेला असल्यास रहिवासामध्ये तीव्र होत चाललेल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न म्हणूनही त्याकडे पाहता येते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

- नाकतोड्यांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांचेही विश्लेषण या अभ्यासात करण्यात आले. आहार, त्याची विविधता आणि पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव यातील सहसंबंधही मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com