उसावरील कांडे किडीचे नियंत्रण

ऊस पिकामध्ये विविध प्रकारच्या साधारणपणे २८८ किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यातील सुमारे २४ किडींमुळे ऊस उत्पादनात सरासरी १५ ते २० टक्के, तर साखर उताऱ्यात २ टक्क्यांपर्यंत घट येते.
Sugarcane
SugarcaneAgrowon

ऊस पिकामध्ये विविध प्रकारच्या साधारणपणे २८८ किडींचा (Sugarcane Pest) प्रादुर्भाव होतो. त्यातील सुमारे २४ किडींमुळे ऊस उत्पादनात (Sugarcane Production) सरासरी १५ ते २० टक्के, तर साखर उताऱ्यात (Sugar Recovery) २ टक्क्यांपर्यंत घट येते. उसामध्ये कांडे कीड (Internode Borer) आणि खोडकीड या दोन प्रमुख किडींचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो. कांडे किडीमुळे ऊस उत्पादनात ३५ टक्के, तर साखर उताऱ्यात २.९ ते ३ टक्क्यांपर्यंत घट येते. तर खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात ३३ टक्के आणि साखर उताऱ्यात १ ते १.५ टक्क्यापर्यंत घट येते.

पोषक घटक ः

- कांडी तयार झाल्यापासून ते ऊस तोडणीपर्यंत प्रादुर्भाव आढळतो. पूर्वहंगामीपेक्षा आडसाली उसामध्ये जास्त प्रादुर्भाव होतो.

- उसाला कांडी लागताच कांडे किडीचा उपद्रव सुरू होतो.

- किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळतो.

- जास्त तापमान, कमी आर्द्रता व कमी पाऊस या बाबी किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरतात. ऑक्टोबर महिन्यातील वातावरण किडीसाठी जास्त पोषक ठरते.

- नत्राची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त दिल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

प्रसार ः

बेणे, शेती अवजाराद्वारे तसेच रात्रीच्या वेळी किडीचा पतंग विहार करतो त्याद्वारे होतो.

यजमान पिके ः

ज्वारी, भात इ.

जीवनक्रम ः

अंडी ः

- पानाच्या दोन्ही बाजूंस मध्य शिरेलगत ८ ते १० बॅचमध्ये पुंजक्यात आढळतात.

- कांड्याला असलेल्या पानाच्या आवरणावरदेखील कीड अंडी घालते.

- अंड्याच्या एका बॅचमध्ये १० ते ८० अंडी आढळतात.

- नुकतीच दिलेली अंडी चपटी, अंडाकृती, चमकदार व पांढरी मेणचट असतात.

- एक मादी पतंग जास्तीत जास्त ४१४ अंडी देते.

अळी ः

- अंडी अवस्थेपासून ५ ते ७ दिवसांत अळी बाहेर पडते.

- अळी २.५ सेंमी लांब, तपकिरी डोके, पांढऱ्या रंगाची असून शरीरावर ४ नारंगी रंगाचे पट्टे असतात. सुरुवातीला पानांवर उपजीविका करते. नंतर उसाच्या कांड्याला छिद्र पाडण्याला सुरुवात करते.

- अळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीस पानांवर साधारण: १ तास फिरते. त्यानंतर वाऱ्याद्वारे आजूबाजूच्या उसावर जाते. ज्या अळ्या खाली पडतात त्या नष्ट होतात.

- ही कीड निशाचर असून जास्त प्रकाशमानात निवाऱ्यासाठी उसाच्या पोंग्यात किंवा पानांच्या बेचक्यात जाते.

- पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळी पानांच्या पेशींवर उपजीविका करते.

- तिसऱ्या अवस्थेपासून अळी उसाच्या कांडीला छिद्रे करते.

- अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पोंग्याच्या पानांच्या पेशी खरडून काढते. त्यामुळे पाने उघडल्यानंतर पांढरे पट्टे दिसून येतात. नंतर अळी उसाच्या वरील कोवळ्या कांड्यांना नुकसान करते.

- कमी वयाच्या उसात विशेषत: खोडवा पिकात या किडीमुळे जास्त नुकसान होते.

- काही वेळा पोंगामर सुद्धा आढळून येतो. हा पोंगा सहजासहजी ओढून काढता येत नाही. त्याचा उग्र आणि सडल्यासारखा वास येत

नाही.

- अळी शक्यतो कांडीमध्ये खालून वरच्या दिशेला गोलाकार शिडीप्रमाणे खात जाते. आणि विष्टा छिद्राबाहेर टाकत जाते. क्वचित वेळाच अळी खालच्या दिशेने पोखरते.

- अळी साधारण: १.६ ते ४ कांड्या पोखरते. क्वचित प्रसंगी ९ कांड्यासुद्धा पोखरते. प्रादुर्भाव झालेल्या कांडीला खालच्या बाजूस डोळा फुटतो.

- या किडीमुळे उसाच्या वजनात १०.७ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. उसाच्या ३-४ कांड्यांना नुकसान झाल्यास उसाच्या रसाची प्रतवारी खराब होते.

कोष ः

- अर्ध वाळलेले पानांखाली बेचक्यात चंदेरी आवरणात कोषामध्ये जाते.

- संपूर्ण कोष अवस्था पाचटाच्या आतमध्ये पूर्ण होते. साधारण ७ ते १० दिवसांनी कोषातून पतंग बाहेर पडतो.

पतंग ः

- पतंग सकाळी लवकर कोषातून बाहेर पडतात.

- उष्ण तापमानात किडीच्या जास्त पिढ्या तयार होतात. तर थंडीच्या कालावधीत कमी पिढ्या तयार होतात.

- कोष अवस्था फेब्रुवारीमध्ये पूर्ण होऊन मार्च ते ऑक्टोबरमध्ये पतंग बाहेर पडतो.

- पतंगाला २४ ते ३६ मिमी लांबीचे पंख असून, पुढील पंखावर १ ते २ काळे ठिपके आढळतात. नर पतंगात मागील पंख फिक्कट पांढरे किंवा तपकिरी तर मादीमध्ये चंदेरी रंगाचे आढळून येतात.

- वर्षातून ५ ते ७ पिढ्या हे पतंग पूर्ण करतात.

- मादी पतंग २-३ समांतर ओळीत, हिरव्या पानाच्या दोन्ही व मध्यशिरेला समांतर पुंजक्यात अंडी घालते.

नुकसानीचा प्रकार ः

- सुरुवातीला किडीची नुकसानीची तीव्रता कमी असून नंतर ती वाढत जाते.

- कीड सुरुवातीला कोवळ्या पानांवर उपजीविका करते. पानांची गुंडाळी करते. त्यामुळे ऊस लवकर पडतो आणि लोळण्याचे प्रमाण वाढते.

- वरील बाजूच्या नवीन तयार झालेल्या पाच कांड्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. कांड्यातील आतील भाग लालसर दिसून येतो.

- लोळलेल्या आणि पाणथळ ठिकाणच्या प्रादुर्भावग्रस्त उसाच्या कांडीला अनेक छिद्रे पाडते. सुरुवातीला लागलेल्या ४-५ कांड्यावरून कांडे किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होते.

- उसाच्या कांड्यावर, डोळ्याच्या वरच्या भागात छिद्रे आढळून येतात. छिद्रातून ओली विष्ठा बाहेर आलेली दिसते.

- प्रादुर्भावग्रस्त उसाची वाढ कमी होऊन कांड्या लहान राहतात. पांगशा फुटतात, नवीन धुमारे (वॉटरशूट) फुटतात.

- किडीची अळी एका उसाच्या २ ते ३ कांड्याना छिद्र पाडून आतील बाजूस नुकसान करते.

- कांड्या आखूड आणि बारीक राहतात. उसास पांगशा फुटतात, पाचट काढले असता त्यात किडीची विष्ठा व भुसा आढळतो. बऱ्याच वेळा त्यात किडीची अळी दिसून येते.

नियंत्रण ः

१) मशागतीय नियंत्रण ः

- लागवडीसाठी निरोगी आणि कीड विरहित बेण्याची निवड करावी.

- प्रादुर्भावग्रस्त टिपरी बाजूला काढून जमिनीत खोल गाडून टाकावी.

- जास्त प्रादुर्भावग्रस्त बेणे लागवडीसाठी वापरू नये.

- नत्रयुक्त रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.

- जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी ऊस लागवडीनंतर पीक तणविरहित आणि स्वच्छ ठेवावे. पिकांस ८ ते १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

- किडीचा प्रादुर्भाव उसाला कांडी लागल्यानंतर सुरू होतो. नियंत्रणासाठी ५ व्या आणि ७ व्या महिन्यात जमिनीलगत खालची २-३ पाने काढून किडीच्या अंड्यासह नष्ट करावीत. ही प्रक्रिया ९ व्या महिन्यांपर्यंत करता येते. त्यामुळे पानांवरील किडीच्या अवस्था नष्ट होतात.

- पांगशा न फुटणाऱ्या भागांत उसाचे पाचट काढावे.

- पाणथळ ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा करावा. कीडग्रस्त उसाचा खोडवा घेणे टाळावे.

- भात, भाजीपाला, तेलबिया यासारखी फेरपालटाची पिके घ्यावीत.

- उसाचे पीक सुरुवातीला ५ महिन्यांपर्यंत तणमुक्त ठेवावे.

- उसाला २ महिन्यांनंतर बाळ बांधणी केल्यास किडीने पाडलेली छिद्रे बंद होतात. त्यामुळे खोडकिडीचे पतंग बाहेर पडण्यास अटकाव होतो.

२) जैविक नियंत्रण ः

- ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्रकीटकाचे प्रौढ १ ते १.५ लाख प्रति हेक्टरी प्रमाणात सोडावेत.

- ऊस लागवडीनंतर ४ महिन्यांनी फुले ट्रायकोकार्ड ५ ते ६ या प्रमाणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार वापरावीत. प्रत्येक वेळी ५० हजार या प्रमाणे २ ते ३ प्रसारणे करावीत. ट्रायकोकार्डचा वापर ऊस तोडण्यापूर्वी एक महिन्यापर्यंत करावा.

- ऊस पीक ४ ते ५ महिन्यांचे असताना आणि नुकसान पातळी १५ टक्के दिसताच,

नियंत्रणासाठी एकरी ४ ते ५ फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) (ई.एस.बी./आय.एन. बी.ल्यूर) वाढ्याच्या उंचीवर लावावीत. दर १५ दिवसांनी ल्यूर बदलावे.

- मक्याचे आंतरपीक घेणे टाळावे.

३) रासायनिक नियंत्रण ः

- पाचट काढल्यानंतर,

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ टक्का) हे दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १८.७५ किलो किंवा

फिप्रोनिल (०.३ टक्का) दाणेदार २५ किलो प्रमाणे लागवडीच्या वेळी सरीमधून द्यावे. किंवा

क्लोरपायरिफॉस (२० टक्के) २.५ लिटर प्रति १ हजार लिटर पाणी याप्रमाणे जमिनीत वाफसा आल्यानंतर सरीमधून द्यावे. किंवा

दाणेदार क्विनॉलफॉस ३० किलो प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीत टाकावे.

(लेबलक्लेम आहेत.)

----------------

- डॉ. भरत रासकर, ८७८८१ ०१३६७

(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com