Cotton : शेतकरी पीक नियोजन : कपाशी

निंभारा, (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथे गणेश नानोटे यांची ५० एकर शेती आहे. त्यापैकी सुमारे १२ एकरांवर कपाशी आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन, केळी तसेच सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक पद्धतीने लागवड केली आहे.
Cotton
Cotton Agrowon

शेतकरी ः गणेश श्‍यामराव नानोटे

गाव ः निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

एकूण क्षेत्र ः ५० एकर

कपाशी क्षेत्र ः १२ एकर

निंभारा, (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथे गणेश नानोटे यांची ५० एकर शेती आहे. त्यापैकी सुमारे १२ एकरांवर कपाशी (Cotton) आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन (Soybean), केळी (Banana) तसेच सोयाबीन अधिक तूर (Tur) अशी आंतरपीक पद्धतीने लागवड (Inter Crop Cultivation) केली आहे. श्री. नानोटे हे मागील ३० वर्षांपासून कापूस लागवड करत आहेत. या वर्षी त्यांनी खासगी कंपनीच्या ५ वाणांची लागवड केली आहे. त्यात मागील वर्षी चांगले उत्पादन (Crop Production) मिळालेल्या व काही नवीन जातींची यंदा लागवडीसाठी निवड केली.

Cotton
Cotton Pest:कापसावरील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कसा टाळाल?

लागवड नियोजन ः

- यंदा १२ एकर क्षेत्रावर कपाशी लागवडीचे नियोजन केले. त्यानुसार पूर्वमशागत करून जमीन लागवडीसाठी तयार करून घेतली.

- साधारण ३ ते १५ जून या काळात बैलजोडीच्या साह्याने पेरणी केली. जमिनीच्या मगदुरानुसार साडेतीन बाय सव्वा फूट आणि ४ बाय सव्वा फूट अंतरावर पेरणी केली.

पेरणीसाठी मागील वर्षीचे ३ वाण आणि यंदा २ नवीन वाणांची लागवड केली.

- सिंचनासाठी संपूर्ण क्षेत्रामध्ये स्प्रिंकलरचा पद्धतीचा अवलंब केला आहे.

- पेरणीवेळी रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या.

- जमिनीत वाफसा तयार होईल तसे डवरणी, वखरणीची कामे करून घेतली.

- सध्या पाऊस थांबल्यामुळे आंतरमशागतीच्या कामांस वेग आला आहे.

- मागील हंगामात सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. झाडावर २ ते ३ किलोपर्यंत बोंडसड झाली होती. त्यामुळे कपाशी पिकाचा सरासरी उतारा ७ ते ८ क्विंटल इतका मिळाला. यंदा आतापर्यंत पिकाची स्थिती चांगली आहे.

Cotton
Cotton : पेरा वाढूनही कपाशी बियाणे विक्रीला मर्यादा

तणनियंत्रण ः

जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे पिकांत तणांचा प्रादुर्भाव अधिक दिसत होता. आंतरमशागतीच्या कामांनाही अडचणी येत होत्या. त्यामुळे मजुरांमार्फत तणनियंत्रण केले. प्रभावी तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापरही केला. सध्या पावसाने उसंत घेतल्याने आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. सध्या पीक तणमुक्त झाले असून, उत्तमरीत्या वाढीस लागले आहे.

खत नियोजन ः

सध्या पीक ५० ते ६० दिवसांचे झाले आहे. हंगामाच्या सुरुवातील १५ जूनपर्यंत कडक उन्ह व जुलैमध्ये सतत पाऊस झाला. जुलैमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. लागवडीनंतर १० दिवसांनी डीएपी ५० किलो खतांची पहिली मात्रा मजुरांमार्फत दिली. तर दुसरी मात्रा मागील आठवड्यात डवरणीद्वारे ८ः२१ः२१ हे खत ४० किलो आणि युरिया २५ किलो प्रति एकर प्रमाणे दिले. तिसरी खतमात्रा पुढील पंधरवड्यात देण्याचे नियोजन आहे.

कीडनियंत्रण ः

- पिकावर काही प्रमाणात तुडतुडे व मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी निंबोळी अर्क आणि शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी केली.

- पिकाचे निरीक्षण केले असता अपवादात्मक गुलाबी बोंड अळीच्या डोमकळ्या आढळून आल्या. अजूनतरी बोंड अळीचा प्रादुर्भाव व्यापक प्रमाणात झालेला दिसून आला नाही. काही झाडांवरील डोमकळ्या हाताने वेचून नष्ट केल्या. यानंतरही पिकाचे सतत निरीक्षण सुरू ठेवणार आहे. कपाशीची बोंडसड व इतर बुरशीजन्य रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिफारशीप्रमाणे फवारणी केली जाईल.

------------------

- गणेश नानोटे, ९५७९१५४००४

(शब्दांकन ः गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com