
फळबाग
आंबा, काजू, चिकू झाडाचे कडक उन्हापासून तसेच बुरशीजन्य रोगापासून संरक्षण (Crop Protection) करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी.
आंबा
पालवी ते मोहोर अवस्था
किमान तापमानात (Minimum Temperature) घट होत असल्याने बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या झाडावरती मोहोर फुटण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी पालवीवर करावी. (टीप : विद्यापीठाच्या प्रायोगिक निष्कर्षावर आधारित.)
पालवी ते मोहोर अवस्थेत असलेल्या झाडावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. तुडतुडे मोहोरातील, कोवळ्या पालवीतील रस शोषून घेतल्यामुळे मोहोराची गळ होते यासोबतच तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात आणि तो पानांवर पडल्यामुळे त्यावर काळी बुरशी वाढते. बागेचे वेळोवेळी सर्वेक्षण करून तुडतुडे पिल्लावस्थेत असतानाच कीटकनाशकाची फवारणी करावी. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ०.९ मि.लि.
संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.
बोंगे फुटण्याच्या अवस्थेत तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. + हेक्झाकोनॅझोल (५% प्रवाही) ०.५ मि.लि. किंवा
गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम.
मोहोरावरील तुडतुडे, मिजमाशीच्या व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा
ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. + ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ०.५ मि.लि. किंवा
गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम.
टीप : मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेचेच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी ०९.०० ते १२.००) फवारणी करावी. कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
या अगोदर फवारणी घेतली असल्यास कीड व रोगाच्या प्रादुर्भावासाठी झाडाचे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास उपाय योजना कराव्यात.
किमान तापमानात होणारी घट यामुळे आंब्याच्या फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नाचे वहन नवीन मोहोराकडे होवून जुन्या मोहोराला असलेली वाटाणा/ गोटी आकाराच्या फळांची गळ दिसून येते.
यासाठी मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुनर्मोहोर प्रक्रिया टाळण्यासाठी जिबरेलिक ॲसिड ५० पी.पी.एम. (१ ग्रॅम प्रति २० लिटर पाणी) या प्रमाणे झाडाला पुरेसा मोहोर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच झाडावरील मोहोर पूर्ण उमललेला असताना स्वतंत्र फवारणी करावी. नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराची फळे झाल्यावर एक फवारणी करावी.
टीप ः जिबरेलिक ॲसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावी.
नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी.
जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.
काजू
पालवी ते फळधारणा अवस्था
पालवी/ मोहोर अवस्थेतील काजूवर ढेकण्या (टी मोस्कीटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ही कीड पालवी/मोहोरातील/फळातील रस शोषून घेते. पिले आणि प्रौढ यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहोर सुकून जातो. मोहोराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात.
किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी पालवी फुटण्याच्यावेळी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. मोहोर फुटण्याच्यावेळी, प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि. फळधारणेच्या वेळी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी करावी. फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. (टीप : लेबल क्लेम नाहीत, ॲग्रेस्को शिफारस)
टीप : एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे. काजू बागेतील गवत काढून बागेची साफसफाई करावी आणि नंतर कीटकनाशकाची फवारणी करावी. काजू बागेतील कलमांसोबतच इतर स्थानिक झाडांवर देखील फवारणी करण्यात यावी जेणेकरून किडींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.
काजू पिकाचे अधिक उत्पादन मिळण्याकरीता १९:१९:१९ या पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्याची २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात पहिली फवारणी पालवीवर, दुसरी फवारणी मोहोर आल्यावर आणि तिसरी फवारणी फळधारणा झाल्यावर करावी.
(विद्यापीठ प्रायोगिक निष्कर्षावर आधारित.)
काजू पिकाची फळधारणा व उत्पादन वाढविण्यासाठी स्वस्त अशा सुकविलेल्या माशांचा अर्क ५०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फुले येताना पहिली फवारणी व पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
काजू बियांचे उत्पादन व बियांचे आकारमान वाढविण्यासाठी प्रति झाड ताज्या किंवा आठ दिवसांपर्यंत साठविलेल्या २५ टक्के गोमूत्राच्या ५ लिटर द्रावणाची फवारणी करावी. २५ टक्के गोमूत्राच्या १० लिटर द्रावणाची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी पालवी आल्यापासून ३० दिवसांच्या अंतराने ४ वेळा करावी. (ॲग्रेस्को शिफारस.)
नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पंधरा दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी.
नारळ
फळधारणा
नारळावरील इरिओफाइड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात. प्रादुर्भित भागावरील फळांचे आवरण तडकते परिणामी नारळ लहान राहतात तसेच लहान फळांची गळ होते. या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनेसाठी नारळ बागेत स्वच्छता ठेवावी नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.
नियंत्रणासाठी कडुनिंब अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ७.५ मि.लि. प्रति ७.५ मि.लि. पाणी किंवा फेनपायरॉक्झीमेट (५ टक्के प्रवाही) १० मि.लि. प्रति २० मि.लि. पाणी या प्रमाणे मिसळून मुळाद्वारे द्यावे. याशिवाय बुटक्या नारळ जातींवर फवारणी प्रति लिटर पाणी कडुनिंबयुक्त कीटकनाशक (१ टक्का) ४ मि.लि. किंवा फेनपायरॉक्झीमेट (५ टक्के प्रवाही) २ मि.लि.नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत. रसायन दिल्यानंतर किंवा फवारणी केल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत.
नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडाना ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ३० लिटर पाणी द्यावे. यासाठी माडाच्या खोडापासून १.२५ मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाइप टाकून सहा ड्रीपरच्या सहाय्याने द्यावे. आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे १५ सें.मी. जाडीचे आच्छादन किंवा नारळाच्या शेंड्या पुराव्यात. झावळ्यांचे आच्छादन करावे.
सुपारी
वाढीची अवस्था
सुपारी बागेस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात खताचा दुसरा हप्ता देण्यात यावा. ३ वर्षांवरील सुपारीला १६० ग्रॅम युरिया आणि १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खते प्रति झाड बांगडी पद्धतीने द्यावीत. सदर खताची मात्रा तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/३ पट आणि दुसऱ्या वर्षी २/३ पट या प्रमाणे देण्यात यावी.
सुपारी बागेस ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
०२३५८ -२८२३८७, ८१४९४६७४०१
डॉ. विजय मोरे, (नोडल ऑफिसर)
९४२२३७४००१
(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.