खुरपुडीपासून पिकाचा बचाव आवश्यक

खुरपुडीचा उपद्रव ज्वारी, तूर, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन, कपाशी इत्यादी पिकांना प्रामुख्याने दिसून येतो. कधी कधी पिकाची फेरपेरणी करण्याचीही पाळी येऊ शकते. त्यामुळे अशा बिया आणि अंकुरण झालेली रोपे खाऊन टाकणाऱ्या या किडींच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नये.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

डॉ. अनिल ठाकरे, डॉ. राजेंद्र वानखंडे

पिकाची उगवण (Crop Germination) पाहण्यासाठी शेतकरी जेव्हा शेतात जातात तेव्हा जर त्यांना तासात असंख्य सलग खांडण्या पडलेल्या दिसून आल्या तर ते ‘पिकाला खुरपुडी लागली’ (Pest Attack On Crop) असा शब्द प्रयोग करतात.खुरपुडी लागलेल्या शेतात रोपे उपटून तासाजवळ पडलेली दिसतात. अशा प्रकारचे नुकसान करणारा प्राणी अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये पक्षी, खारी, वाणी, नाकतोडे, रातकिडे, गुझिया सोंडे किंवा म्हशी यांचा समावेश असतो. यामुळे रोपांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी राहून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. (Crop Protection)

१) पक्षी : शेतात पेरणीनंतर उगवण झाल्यावर पाऊस नसल्यास पक्ष्यांमुळे नुकसान होते. सामान्यतः पेरणी झालेल्या शेतात कबुतराचे मोठे मोठे थवे येऊन बसतात. पेरलेले दाणे उकरून खातात. या व्यतिरिक्त बिवड, लहान पिवळ्या चिमण्याही असे नुकसान करतात. अनेक वेळा बीजप्रक्रिया केलेले दाणेही खाण्यात आल्यामुळे झालेल्या विषबाधेमुळे पक्षी मरून पडलेले दिसतात. पक्ष्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पेरणी कमी ओलाव्यात करणे टाळावे. तसेच शेतात एक आठवडाभर राखण करणे आवश्यक असते.

Crop Protection
योग्य पद्धतीने पीक संरक्षण करा : डॉ. पवार

२) खार : आपल्याकडे अंगावर तीन किंवा पाच पट्ट्या असलेल्या दोन्ही प्रकारच्या खारी आढळतात. जास्त झाडे असलेल्या शेतात, शेतातील घराजवळ यांची संख्या जास्त असते. या त्यांच्या पुढील पायांच्या साह्याने जमिनीतील दाणे उकरून खातात.

३) वाणी : हा लांब अळीसारखा प्राणी असून, त्याला स्पर्श केल्यास तो पैशासारखा गोलाकार दिसतो. म्हणून शेतकरी याला ‘पैसा’ असेही म्हणतात. पावसाळ्यात सुरुवातीला यांचे थवेच्या थवे आढळतात. पुढे मोठे झाल्यावर ते एकटे फिरतात. त्यांची नुकसान करण्याची तऱ्हा अगदी वेगळी असते. शेतामध्ये हळूहळू चालताना एखादे रोपे आले की आपले डोके झाडाच्या बुडाजवळ खुपसून शिल्लक असलेला दाणा खाऊन टाकतात. त्यामुळे काही काळाने रोपे सुकलेली दिसतात. विशेषतः ते ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. याच्या नियंत्रणासाठी मिथिल पॅराथिऑनची (२ टक्के भुकटी) किंवा क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के भुकटी) हेक्टरी २० किलो प्रमाणे वारे शांत असताना धुरळावी. किंवा क्लोरपायरिफॉस (२० इ.सी.) ३.७५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे नॅपसॅक पंपाने नोझल सैल करून किंवा नोझल काढून ड्रेंचिंगसारखी ओळीने २० ते २५ पंप प्रति एकर प्रमाणे फवारणी करावी.

४) नाकतोडे : टोळ अथवा नाकतोडे यांच्या अनेक प्रजाती असतात. त्यापैकी जंगली नाकतोडे जमिनीतील दाणे खातात. त्यामुळे खुरपडीचा त्रास होतो. हे नाकतोडे रंगाने काळे असून कमी अंतराच्या उड्या मारतात. त्यांच्या नियंत्रणासाठी वाणी किडीप्रमाणे उपाययोजना करावी.

५) वायरवर्म : ही कीड कोलीओप्टेरा या कीटक गणातील असून तिच्या अनेक प्रजाती आहेत. भुरकट ते काळ्या रंगाच्या प्रौढ कीटकांना खेड्यात “म्हशी” म्हणून ओळखतात. त्यांची लांबी ६ ते १३ मि.मी. असते. त्यांची सूक्ष्म गोलाकार व मोतिया रंगाची अंडी जमिनीत पुंजक्यात टाकलेली असतात. लहान अळ्या दुधावरील सायीच्या रंगाच्या दिसतात. मोठ्या अळ्या चमकदार पिवळ्या असतात. पूर्ण वाढ झालेली अळी २५ मि.मी. लांबीची असते. मोठ्या अळ्या दाणे पोखरतात. त्यामुळे दाण्याची उगवण होत नाही. नुकसान होते.

ज्या भागात या किडीचा प्रादुर्भाव सातत्याने दिसतो, अशा ठिकाणी प्रादुर्भाव टाळण्यासाठी जमिनीत दाणेदार कीटकनाशक कार्बोफ्युरॉन (३%) ३३ किलो किंवा दाणेदार क्लोरपायरिफॉस (१० टक्के) १० किलो किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (०.४ % दाणेदार कीटकनाशक) १० किलो किंवा फिफ्रोनील (०.३ % दाणेदार

कीटकनाशक) २० ते ३० किलो किंवा इमिडाक्लोप्रीड (०.३ % दाणेदार कीटकनाशक) २० ते ३० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावे.

डॉ. अनिल ठाकरे, ९४२०४०९९६०

(वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ, संत्रा फळगळ व्यवस्थापन मिशन, कृषी संशोधन केंद्र, अचलपूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com