तण खाई धन, तण देई धन

जमिनीवरील भागापेक्षा जमिनीखालील अवशेषाचे सेंद्रिय खत तयार करण्यास शिकले पाहिजे. या व्यतिरिक्त मागील पिकाचे अवशेष (एकाच वनस्पतीचे) पेक्षा अनेक वनस्पतीच्या बुडखा व मुळांचे जाळे बुजविल्यास आणखी जास्त चांगल्या दर्जाचे खत तयार होईल.
Weed Control
Weed ControlAgrowon

मी १९७० मध्ये कृषी पदवीधर होऊन शेतीस प्रारंभ केला. महाविद्यालयात शिकत असता कृषी विस्तार अंतर्गत काही शेतकरी मेळाव्यांचे नियोजन करावे लागे किंवा उपस्थित रहावे लागे. कार्यक्रमातील भिंती पत्रिकेवर ‘तण खाई धन’ असे सुविचार छापलेले असत. शिक्षण पूर्ण करून शेतीत हजर झाल्यावर शेतातही तण खाई धन असेच वातावरण होते. शेतकऱ्यांचा तणाकडे (Weed) पाहण्याचा दृष्टिकोन शत्रूत्वाचा असे. रानात फक्त पिकाच्या हिरव्यागार ओळी व दोन ओळींमध्ये काळे भोर जमिनीचे पट्टे असेच दिसणे हे प्रगतिशील शेतीचे लक्षण मानले जाई. पिकात तण दिसणे म्हणजे शेतकऱ्यासाठी कमीपणाचे लक्षण मानले जाई. माझीही शेतीची सुरुवात याच मळलेल्या वाटेने झाली. पुढे ३० ते ४० वर्षे स्वच्छ शेती ठेवण्यात गेली. रानात तणाचा मोड दिसला नाही पाहिजे हा ध्यास होता. माझे एक सरकार मित्र होते. त्यांची ७० ते ७५ एकरांची मोठी शेती वाडी होती. त्यांचे लोकांना आवाहन होते की माझ्या संपूर्ण रानात तणाचा मोड शोधून दाखवा आणि १००० रुपये मिळवा!

Weed Control
भाजीपाला पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन

तणनाशकाच्या वापराला सुरुवात ः

१९७० ते २००० हा काळ विचारात घेतला तर भांगलणी करून रान स्वच्छ ठेवण्यास मुबलक मनुष्यबळ मिळत असे. त्यांची मजुरीही परवडण्याजोगी होती. माझ्याकडे या कामासाठी कायम ८-१० मजूर असत. १९८०-८५ चे दरम्यान उसासाठी निवडक तणनाशक म्हणून बाजारात आले आणि रासायनिक तणनियंत्रण असे नवीन पर्व सुरू झाले. उसाप्रमाणे पुढे सर्वच पिकासाठी प्रथम पीक आणि तण उगवणीपूर्वीची आणि पुढे पीक, तण उगविल्यानंतर नियंत्रणासाठी निवडक तणनाशके बाजारात आल्याने तण नियंत्रण सोपे झाले. तणनाशकाने प्रवेशावेळी फक्त पीक उगवत असे, तणे उगवतच नसत. मग आम्हाला वाटले, शेतीत भांगलणी अगर निंदणीचे काम बंद पडून भांगलणीचा मजूर वर्ग बेकार होईल. गंमत अशी झाली, की एखाद्या तणनाशकामुळे सर्वच तणे मरततात असे होत नाही.

काही तणे त्या तणनाशकाला दाद न देणारी असतात. इतर स्पर्धक तणे मरून गेल्यामुळे अशी तणे प्रचंड वेगाने फोफावतात. त्यासाठी भांगलणीचे काम चालू करावे लागते. सतत एखाद्या तणनाशकाचा वापर होऊ लागल्यानंतर तणामध्ये प्रतिकारकता निर्माण होईल. तणनाशक फवारणीनंतर चार दिवस तण मलूल दिसे आणि पुढे काही दिवसांनी नेहमीप्रमाणे वाढू लागे. मग रासायनिक निंदणी व मानवी निंदणी अशी दोनही कामे चालू राहिली. माणसाकडून तणनियंत्रण हे काम १०० टक्के बंद झाले नाही.

तणनाशकाची तिसरी पिढी बाजारात आली ती थोडी वेगळी होती. मागील पिढ्यात तण उगवू नये म्हणून पीक व तण उगवणीपूर्वी तणनाशक फवारणी चालू होती. ही तणनाशके साधारण २५ ते ३० दिवस काम करीत त्यानंतर तण उगवणे परत चालू होत असे. आता असे महिन्यानंतर नवीन आलेले तणनियंत्रणासाठी तण २ ते ४ पानांवर असताना पीक व तण उगवणी नंतर नियंत्रणासाठी तणनाशके उपलब्ध झाली. यामुळे तणनियंत्रणाचे काम खूप सोपे झाले. अनेक पिकांसाठी निवडक गटातील अशी तणनाशके आता उपलब्ध आहेत. याचा योग्यवेळी वापर केल्यास मानवी निंदणीची गरज बऱ्यापैकी कमी होते. इथपर्यंतचा प्रवास तणे मारून टाकून जमीन तणमुक्त करणे अशा स्वरूपाचा होता.

Weed Control
Weed Control : खरीप पिकांतील तणनियंत्रण

जमिनीखालील अवशेषांचा वापर ः

मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत या प्रयोगातून असे लक्षात आली, की जमिनीवरील भागापेक्षा जमिनीखालील अवशेषाचे सेंद्रिय खत तयार करण्यास शिकले पाहिजे. या व्यतिरिक्त मागील पिकाचे अवशेष (एकाच वनस्पतीचे) पेक्षा अनेक वनस्पतीच्या बुडखा व मुळांचे जाळे बुजविल्यास आणखी जास्त चांगल्या दर्जाचे खत तयार होईल. यातील जैववैविध्य जास्तीत जास्त कसे तयार करता येईल याबाबत चिंतन सुरू झाले.

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या एका पुस्तकात द्विदल वनस्पतीपेक्षा एक दल तणापासून जास्त चांगल्या दर्जाचे खत मिळते असा संदर्भ मिळाला. त्यानंतर सेंद्रिय खताचा दर्जा चांगला मिळविण्यासाठी कच्चा माल जितका जून (मोठा सी/एन गुणोत्तर) असेल तर खत जास्त उत्तम दर्जाचे तयार होते असे संदर्भ मिळाले. इथे पिकाच्या अवशेषाची जोड द्यावयाची. इथून पुढे रानात फक्त पीकच वाढले पाहिजे. मुख्य पीक अधिक मिश्र पीक अशी रचना न करता एक पट्टा पिकाचा आणि एक पट्टा तणाचा अशी रचना करणे गरजेचे आहे. माझ्या गरजेसाठी जमिनीचा जसा वापर केला जातो तसेच जमिनीची सुपीकता टिकविणेसाठी जमिनीच्या काही भागाचा वापर केला तरच जमिनीची सुपीकता टिकून राहील.

जवळ अंतरावरील पिकास असे करता येणार नाही. ऊस, कापूस, तूर, फळबागा यांसारख्या क्षेत्रात तणांचा मुख्य पिकाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने तणे कशी वाढविता येतील याचा विचार पीक पेरणीपूर्वीच करावा लागेल.

तणाकडून मिळणारे धन ः

१) रानात आपोआप उगविणाऱ्या तणांचा अभ्यास केल्यास त्यामध्ये एकदल, द्विदल जातीची अनेक प्रजातींचे एकत्रीकरण झालेले असते. सेंद्रिय खतात जैववैविध्य असेल तितके ते खत चांगले. तणे वाढवून पिकाची वाढ करून घेत असता आपण सेंद्रिय खतही निर्माण करू शकतो. आता एखाद्या जमिनीत उगविणाऱ्या तणांचा अभ्यास केल्यास त्या जमिनीमध्ये सुधारणा करण्याचे दृष्टीने त्या तणांचे जैववैविध्य तयार झालेले असते. समजा अशा तणांच्या वापरातून जमिनीची सुपीकता सुधारली तर तणांच्या जातीमध्येही फरक आपोआप होत जातो. पुढे अधिक जड जमिनीत येणारी तणे तेथे आपोआप वाढू शकतात.

२) एखाद्या पठाराचा अभ्यास केल्यास तेथे जर अनियंत्रित चराई चालू असेल तर जनावरांच्या खुराने जमिनीच्या वरच्या थरातील माती सैल होते व पावसाचे पाण्याने वाहून जाते. कालांतराने तेथील जमीन - वरकस बनते. पुढे तेथे फक्त खुरटी व काटेरी गवते वाढू लागतात. जमीन बरड होऊन जाते. समजा पुढे तेथे चराई बंदी केली तर गवतांना वाढण्यास वाव मिळतो. गवत जमिनीवर व जमिनीखाली खोलवर वाढण्यास वाव मिळतो. कालांतराने कापणी झाल्यावर तेथे मुळांचे जाळे जमिनीखाली कुजून जमिनीचा दर्जा हळूहळू वाढू लागतो. पुढील वर्षी तेथे थोडी उंच वाढणारी गवते येतील, कालांतराने गवताचे बुडख्यांची जाळी जमिनीवर तयार होईल. या ठिकाणी चराई बंदी ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.

३) डोंगर पठारावर चराई बंदी केल्यास त्या ठिकाणी बुडख्याची गादी तयार होते. अशा गादीतून पावसाचा थेंब पडल्यास तो जागेलाच मुरतो. मूलस्थानी जल संवर्धन होते. भूजल पाण्याच्या पातळीत वाढ होते. फक्त चराईबंदी केल्याने ज्या गावात पावसाळा संपताच टॅंकर लावावा लागत असे ते गाव आता १२ महिने बागायत शेती करीत आहे.

३) महाराष्ट्रात ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे तर १८ टक्के बागायतीत आहे. कोरडवाहू शेतीत पाऊस लवकर गेल्यास नेमके अवर्षणामुळे पक्वता काळात पीक वाळून जाते. खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. अशा जमिनीला संरक्षित पाण्याची सोय केली पाहिजे असे बोलले जाते. परंतु ते केवळ अशक्‍य आहे. अशा जमिनीत लांब अंतरावरील पीक घ्यावे. मिश्रपीक घेऊ नये. पिकाजवळील तण साफ ठेवावे. दोन पिकांच्या ओळीत तणांचा पट्टा वाढवावा. योग्य वेळी तो अवजाराने आडवा करून तणनाशकाने मारून टाकावा. या तणाच्या पट्ट्यामुळे अशा रानातून कितीही मोठा पाऊस झाला तरी पाणी आडवे वाहत नाही, जागेला जिरते. मिश्रपिक घेतल्यास मिश्रपीक निघून गेल्यानंतर जमीन उघडी पडते. ओलावा बाष्पीभवनाने उडून जातो. जमिनीला भेगा पडतात. त्या कोळपणीचे साहाय्याने सतत बुजवाव्या लागतात. स्वच्छ मधल्या पट्ट्यापेक्षा तणाचा पट्टा असेल तर या तणाच्या पट्ट्यात मुळांचे जाळ्यात इतके पाणी साठविले जाते, की आज जर पाऊस गेला तर पुढे दोन महिने हा ओलावा पिकाची पाण्याची गरज भागवितो. कापूस आणि तूर ही लांब मुदतीची पिके या ओलाव्यावर कोणतीही संरक्षित पाण्याची सोय न करता चांगली येतात.

--------------------

संपर्क ः

प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्हातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com