माणसांच्या मेंदूची मशागत...

खरं तर ज्यांच्या आनंद, व्यथा, वेदनांचं भांडवल करून आपण लिहितो ते लिखाण वाचकांना समजलंच नाही तर लिहिण्याचा उपयोग काय ?
Brain
BrainAgrowon

देवा झिंजाड

खरं तर ज्यांच्या आनंद, व्यथा, वेदनांचं भांडवल करून आपण लिहितो ते लिखाण वाचकांना समजलंच नाही तर लिहिण्याचा उपयोग काय? अगदी साध्या साध्या गोष्टी, घटना खूप अवघड भाषेत मांडल्यावर त्या समजून घेताना वाचकांच्या मनावर ताण येतो. त्यामुळे एक तर वाचक अशी गोष्ट अर्धवट सोडून देतो किंवा पूर्ण वाचली तरी लिखाणाशी समरस होत नाही. अगदी सोप्प्या भाषेतली प्रभावी मांडणीच वाचक डोक्यावर घेतो. म्हणूनच मी ‘मशागतच्या’ लेखांसाठी ह्याची आवर्जून काळजी घेत आलोय.

Brain
Citrus Crop : लिंबूवर्गीय संस्था आणि शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठात सामंजस्य करार

त्यामुळेच वाचकांचे खूप प्रेम मिळते. अनेक फोन व मेसेज येतात. शेकडोजण लेख शेयर करतात. चांगली माणसं जोडली जातात. मशागतच्या लेखांच्या संदर्भानं जेव्हा वाचक फोनवर बोलतात तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतं अन् ते म्हणजे, ‘तुम्ही अगदी आमच्या मनातलं अन् आमच्या भाषेत लिहिता बरका.’ असे अभिप्राय लिखाणाचा हुरूप तर वाढवतातच पण कुणाचंही मन न दुखावता वास्तव मांडण्याचं भानही देतात. असो, स्वतःचं कौतुक दुसऱ्यानं करावं नाही का ?

हा ऊहापोह यासाठी, की हिंगोलीहून मला एक फोन आला होता. सुरुवातीला तर ती व्यक्ती काहीच बोलेना. नुसती मुसमुसत होती. मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो. थोड्यावेळानं त्या व्यक्तीनं रडणं थांबवलं. मग मी त्यांना विचारलं ‘का रडत होतात?’ तर त्यांनी सांगितलं, की ‘भाऊ, मी आमच्या इथल्या झेडपीच्या मराठी शाळेत १२० शाईपेन आणि दऊत वाटल्या.

’ ‘अरे वाह, खूपच चांगलं काम केलंत.’ ‘भाऊ, पण याचं कारण म्हणजे आपला ‘पेनाच्या पोटाला पोटभर शाई मिळाली’ हा लेख आहे.’ मी स्तब्ध झालो. पुढं काय बोलावं ते सुचेना. त्यावर ते पुन्हा म्हणाले, ‘भाऊ, तुमच्यासारखीच माझीही परिस्थिती होती, दहावीपर्यंत शाईपेन मिळाला नव्हता अन् जेव्हा मिळाला तेव्हा दऊत मिळाली नव्हती. आज माझी परिस्थिती बरी आहे त्यामुळे मी पेन वाटले.

आज माझ्या मनातली ती सल निघून गेली जेव्हा पेन अन् दऊत मिळाल्यावर लेकरांच्या चेहऱ्यावरचं समाधान मी पाहिलं.’ त्यांच्या वाक्यागणिक माझं मन भरून येत होतं. मी मनात विचार केला की एखाद्या लेखानं माणसाचा नुसता भूतकाळच जागा होत नसतो तर काही संवेदनशील माणसं कृतीही करतात अन् हेच लिखाणाचं यश असतं असं मला वाटतं आणि याचं सगळं श्रेय हे ‘मशागत’ला दिलंच पाहिजे. खऱ्या अर्थानं माणसांच्या मेंदूची मशागत सुरू आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com