कसे कराल संत्रा बागेचे नियोजन ?

संत्रा बागेचे नियोजन करताना सुसंगत जमीन, हवामान, जातिवंत कलम आणि संगोपन या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
Orange Cultivation
Orange CultivationAgrowon

कोणत्याही फळबागेचे (Fruit Orchard) नियोजन करताना सुसंगत जमीन, हवामान, जातिवंत कलम आणि संगोपन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे संत्रा बागेचे नियोजन करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार जमिन व कलमांची निवड करावी. जेणेकरून भविष्यामध्ये तयार होणारी संत्राबाग ही चांगल्या प्रतीची आणि उत्कृष्ट व दर्जेदार उत्पादन देणारी होईल.

Orange Cultivation
संत्रा उत्पादकांना हेक्‍टरी लाखाची मदत करा ः अनिल बोंडे

जमिनीची निवड
संत्रा कलम लागवडीसाठी मध्यम, काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ०.७५ ते १ मीटर खोलीची असावी. जमिनीखाली कच्च्या मुरमाचा थर असावा. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. चुनखडीची उपलब्धता दहा टक्के पेक्षा कमी, जमिनीची क्षारता ०.५ डेसीमल पर्यंत असलेली जमीन चांगली समजली जाते. पाण्याचा अयोग्य निचरा होणारी, चोपण खडकाळ , रेवाळ, पाणथळ व भारी जमीन लागवडीसाठी निवडू नये. भारी काळ्या जमिनीत काळी माती १.५ ते ३.५ मीटर खोल असते आणि खाली चोपन मातीचा थर असतो. अशी जमिन पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवते. अशा जमिनीत संत्रा लागवड करू नये.

Orange Cultivation
Orange Cultivation : संत्रा लागवडीसाठी कलमांची निवड

जमिनीस तिचा मूळचा सुसंगत उतार (ढाल) असावा. उतार साधारणपणे एक टक्का असावा. निवडलेली जमीन ही संपूर्ण सपाट किंवा अधिक उताराची नसावी. कारण सपाट जमिनीमध्ये पाणी साचून राहणे, पाण्याचा निचरा न होणे याचबरोबर अधिक उताराच्या जमिनीमध्ये वरच्या थरातील मातीची धूप होणे, खालच्या थरातून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये झिरपून जाणे इत्यादी बाबींची शक्यता असते. पाण्याचा योग्य निचरा होण्याकरिता बागेभोवती जमिनीच्या उतारानुसार एक मीटर रुंद, एक मीटर उंच खोल चर किंवा नाला करून घ्यावा. माती परीक्षण करून जमिनीची निवड करावी. जमिनीची खोली कमी असल्यास झाडाची योग्य प्रकारे वाढ होत नाही. कारण झाडांना अन्नद्रव्याचा संतुलित पुरवठा होत नाही. उन्हाळ्यात अशा जमिनीवरील झाडांना जास्त ताण बसतो. वाजवीपेक्षा अधिक फळधारणा होऊन काही कालावधीतच अशा झाडांची वाढ खुंटते. अधिक खोल काळ्या चिकन मातीच्या जमिनीत लागवड केलेल्या झाडांची सतत वाढ होते. त्यामुळे या झाडांना विश्रांती मिळत नाही. म्हणून फुल व फळधारणा कमी होते. अशा जमिनीत अंबिया बहराची फळे ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात गळतात. म्हणून जमिनीची निवड फार महत्त्वाची आहे.

Orange Cultivation
Orange : संत्रा उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

वारा रोधक जैविक कुंपण
बागेच्या दक्षिण - पश्चिम बाजूला सागरगोटी, चिलार करवंद, भुवन वेल वृक्षांचे जैविक कुंपण करावे. त्यामुळे हिवाळ्यातील थंडीची लाट आणि उन्हाळ्यातील उष्ण वारे यापासून पिकांचे संरक्षण होईल.
लागवड अंतर
सर्वसाधारणपणे दोन झाडातील अंतर ३० बाय व २० फूट (एकरी ११० झाडे) ठेवावे. कलमांची लागवड ही चौरस पद्धतीने करावी. जमिनीची आखणी करून लावणीच्या ठिकाणी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे करावेत. खड्ड्यामध्ये एक भाग चांगले कुजलेले शेणखत, दोन भाग माती, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट १०० ग्रॅम कार्बोफ्युरॉन पावडरचे मिश्रण करून खड्डे जमिनीच्या १५ सेंटीमीटर उंच भरावे. योग्य आकाराचे खड्डे व प्रमाणशीर मिश्रणाने भरून लागवड केल्यावर मुळांची वाढ खड्ड्याच्या खोलीपर्यंत झपाट्याने होऊन झाडांची अन्न रस घेण्याची क्षमता वाढते.

Orange Cultivation
संत्रा फळपिकासाठी विमा योजना

कलमांची निवड
कलम निवडताना अलीमो, रंगपूर आणि जंबेरी लिंबू यासारख्या जोमदार वाढणाऱ्या खुंटावरची असावी. कलम ही २५ ते ३० सेंटीमीटर उंचीवर कलमीकरण केलेली असावी. साधारणतः २ ते २.५ ते ३ फूट उंच व कलमांना जारवा (लहान कार्यक्षम मुळ्या) भरपूर प्रमाणात असाव्यात. कलम निवड करताना ती वेलीसारख्या वाढणाऱ्या तसेच खूपच बारीक पाने व पानसोट असणाऱ्या मातृक्षापासून तयार केलेली नसावी. शक्यतो संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठे व शासकीय रोपवाटिका येथूनच घ्यावीत.

लागवडीची तयारी
निवड केलेली कलमे मॉन्सूनचा पाऊस तीन ते चार वेळा पडून गेल्यानंतर व जमिनीत योग्य ओल झाल्यावर लावावेत. कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळ असताना लावावीत. शेणखत व मातीने भरलेले खड्डे हाताने मोकळे करून त्या खंड्ड्यांमध्ये कार्बोफ्युरॉन यासारख्या कीटकनाशकाचा वापर करावा. कलमाचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याचे प्रकार टाळता येतील. कलम खड्ड्यात ठेवल्यावर मूळ स्वाभाविक अवस्थेत ठेवून माती हळूहळू खड्ड्यात टाकावी. माती हलक्या हाताने दाबावी. जोरात मातीवर दाब दिल्यास तंतूमुळे तुटण्याची दाट शक्यता असते. कलम पनेरीतून काढताना काही मुळ्या तुटतात. त्यामुळे कलमावरील पानाचे शोषण होत नाही. अशावेळी सर्व पाने ठेवल्यास कलम वाढण्याची शक्यता असते. म्हणून लागवडीपूर्वी कलमाच्या खालच्या बाजूची अर्धी पाने काढून टाकावीत. खुंटावर आलेली फुट जोमाने वाढते म्हणून ती वरचेवर काढावीत.

कलमे लावल्यानंतर कलमांना अंदाजे एक लिटर पाणी देणे योग्य राहील. कलमांना बांबूचा आधार द्यावा. किमान चार वर्षापर्यंत उन्हाळ्यात कलमांची विशेष काळजी घ्यावी. निवड केलेली कलमे लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या कलमांच्या संख्येपेक्षा १५ टक्के जास्त कलमे खरेदी करावीत. अशी कलमे नांगे भरणे किंवा रोपे मर झालेल्या ठिकाणी परत लावावीत शक्यतो पिशवीतील संत्रा कलमांना प्राधान्य द्यावे. कलमावर नवीन फूट आल्यानंतर रोपे रुजली असे समजावे. डोळ्याखाली खुंटावर आलेले फूट वेळीच काढावी. डोळे फांद्यावरील कोणतीही फूट काढू नये. जुलैमध्ये लावलेल्या कलमांना डिसेंबर महिन्यापर्यंत कोणत्याही रासायनिक तणनाशकाची फवारणी करू नये. सुरुवातीचे तीन ते चार वर्ष फळधारणा होण्यापूर्वी आंतरपीक घ्यावे. पहिल्या वर्षी ठेंगणी कमी कालावधीची, भाजीपाला, हिरवळीची किंवा कडधान्याची पिके घ्यावी. ज्वारी, कपाशीचे आंतरपीक घेऊ नये.

स्रोत: कृषी पत्रिका, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com