सोयाबीन लागवड करताय? तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजेत.

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
सोयाबीन लागवड करताय? तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजेत.
SoybeanAgrowon

जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन (Soybean) पिकाची निवड करतात. गेल्या हंगामात सोयाबीनचे दर चढे (Bullish Rate) राहिले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे ओढा वाढला आहे. संपूर्ण देशभरातच यंदा सोयाबीनचे लागवड (Sowing) क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. देशात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये सायोबीन उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Soybean
सोयाबीन पिकाच्या फवारणी आणि काढणीसाठीची आधुनिक यंत्रे

देशातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून सोयाबीन ओळखले जाते. सोयाबीनचे क्रशिंग केल्यानंतर सोयापेंड किंवा डिओसी आणि सोयातेल ही दोन उत्पादने मिळतात. सोयापेंड पशुखाद्यामध्ये विशेषतः पोल्ट्री फीड (Poultry feed) म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पोल्ट्री उद्योगाचे कच्च्या मालाचे अर्थकारण सोयापेंडच्या किमती किती राहतात, यावर अवलंबून असते. दुसऱ्या बाजुला देशाची खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी सोयातेलाचा मोठा उपयोग होतो. देशात तेलबिया पिकांचे पुरेसे उत्पादन होत नसल्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर सोयाबीनमुळे देशातील २५ टक्के खाद्यतेलाची पुर्तता होते.

महाराष्ट्रात सोयाबीनची उत्पादनक्षमता कमी आहे. राज्यात सरासरी हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादकता असल्याचे कागदावर दिसते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी १० ते १२ क्विंटलच्या आसपास उतारा पडतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे, कोरडवाहू लागवडीचे मोठे प्रमाण, दर हेक्टरी झाडांची अपुरी संख्या, बीज प्रक्रिया व उगवणशक्तीची तपासणी न करणे हे होत. तसेच योग्य खतांच्या मात्रांचा वापर शिफारशीत प्रमाणात न करणे, तण आणि रोग-किडींचा वेळेवर बंदोबस्त न करणे, आंतरपीक न घेणे आणि मर्यादीत यांत्रिकीकरण हीसुध्दा प्रमुख कारणे आहेत.

अन्य देश सोयाबीन उत्पादकतेत भारताच्या पुढे आहेत. या देशांमध्ये प्रामुख्याने जनुकीय सुधारित (जीएम) तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. हजारो हेक्टर क्षेत्रावर सलग लागवड करुन जमीन तयार करण्यापासून पेरणी, फवारणी व काढणीपर्यंत सर्व कामे यंत्राद्वारे केली जातात. रोग व किडींच्या आक्रमणाबद्दल माहिती देण्यासाठी प्रभावी पूर्वानुमान यंत्रणा उभारली जाते. रोग किडींच्या बंदोबस्तासाठी कीडनाशकांची ड्रोनद्वारे फवारणी केली जाते. त्यामुळे मजुरांवरील खर्च वाचतो. तसेच रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर होऊन उत्पादन वाढते.

योग्य वाणांची निवड

पेरणीसाठी फुले किमया, फुले संगम, जे एस ३३५, जेएस ९३०५, एमएयुएस ७१, एमएयुएस ६१२ इ. सुधारित जातींची निवड करावी (Soybean variety).

पेरणीचा कालावधी

सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत ७५ ते १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करुनच करावी.

पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशकाची प्रक्रिया करुन बियाणे सावलीमध्ये वाळवून योग्य वेळी पेरणी करावी.

Soybean
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा सुधारित जाती

पेरणीसाठी अंतर

सोयाबीनची पेरणी ४५ बाय ५ सें. मी. किंवा ७.५ सें. मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्टरचलित सीड ड्रिलच्या साहाय्याने करावी. बियाणे २.५ ते ३.० सें. मी. खोलीपेक्षा जास्त खोल पेरु नये. अन्यथा बियाण्याची उगवण कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते.

मध्यम आकार असणाऱ्या वाणांसाठी हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे. बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर गरजेनूसार प्रतिहेक्टर ५ ते १० किलो जास्त बियाणे वापरावे .

खतांचा संतुलित वापर

३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश आणि २० किलो गंधक प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळेसच द्यावे. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी.

पेरणीनंतर पीक २० ते ३० दिवसांचे असताना कोळपणी व निंदणी करुन शेत तणविरहीत ठेवावे. सतत पडणाऱ्या पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे निंदणी व कोळपणी करण्यास अवघड होत असल्यास तणनाशकाचा वापर करावा.

रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील अवस्था आहेत. या कालावधीत १५ ते २० दिवसांची पावसाची उघडीप झाल्यास या अवस्थेत पिकास पाणी दिल्यास उत्पादनात भर पडते.

Soybean
सोयाबीन उत्पादनवाढीसाठी खत व्यवस्थापन महत्वाचे

पीकसंरक्षण

सोयाबीनवर प्रामुख्याने चक्रीभुंगा, खोडमाशी, विविध उंटअळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, पाने गुंडाळणारी अळी व पाने पोखरणारी अळी तसेच मावा तुडतुडे, पांढरी माशी, आदी रसशोषक किंडींचा प्रादुर्भाव अढळतो. यासाठी नियमित सर्वेक्षण करुन किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्याची खात्री करुनच शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. एकात्मिक कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. किडी रोगांच्या प्रादुर्भाच्या बरोबरीने अन्न्द्रव्यांच्या कमतरतेची लक्षणेही ओळखणे महत्वाचे आहे. (Crop Protection)

किडींसोबतच सोयाबीनवर मूळकूज, शेंगा वाळणे, तांबेरा, मोझाईक इ. प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोग नियंत्रणासाठी रोगास प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. पिकांची फेरपालट करावी. पेरणीपुर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

लागवडीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सोयाबीनचे हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळू शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com