Cotton Cultivation : लांब धाग्याच्या उन्हाळी कापूस लागवडीचे तंत्र

महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये उन्हाळी कापूस, अर्थात लांब धाग्याच्या कापसाची लागवड केली जाते. या कापसाचे लागवड तंत्रज्ञान समजून घेऊन त्यातील प्रत्येक बाबींचा काटेकोर वापर केल्यास एकरी उत्पादन तसेच गुणवत्ता वाढ साधणे शक्य होईल.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. अनंत इंगळे, नवनाथ मेढे, डॉ. नंदू भुते

भारतात कपाशीची लागवड (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात  असली तरी त्यात आखूड व मध्यम लांब धाग्याचेच उत्पादन (Long Staple Cotton Production) होते. लांब धाग्याच्या कपाशीचे उत्पादन (Cotton Production) एकूण कपाशी उत्पादनाच्या केवळ २ ते ३ टक्के इतकेच घेतले जाते.

परिणामी, भारतातील कापड गिरण्यांना लांब व मजबूत धाग्याची आयात करावी लागते. लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन व रुईच उतारा कमी असला तरी अन्य देशी व अमेरिकन कापसापेक्षा लांब धाग्याच्या (इजिप्शियन) कापसाला दर चांगला मिळतो.

लांब धाग्याच्या कापूस उत्पादनासाठी पश्‍चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत प्रामुख्याने ‘बार्बाडेन्स’ या प्रजातीतील वाणांची लागवड केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये उन्हाळी कापूस अर्थात लांब धाग्याच्या कापसाची लागवड केली जाते.

त्यात प्रामुख्याने बार्बाडेन्स प्रजातीतील पूर्वी पीमा -८४, गीझा-७ वरलक्ष्मी या, तर अलीकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आंतरजातीय (हिरसुटम × बार्बाडेन्स) संकरित वाणांची फुले माही, फुले चेतना, फुले एकता, फुले प्रभा तसेच सरळवाण (बार्बाडेन्स) फुले रुखमाई यांची लागवड केली जाते. खासगी कंपन्यांचेही काही वाण उपलब्ध आहेत.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : कापूस पीक लागवडीत यांत्रिकीकरणाची गरज

लागवड व्यवस्थापन तंत्रज्ञान

लागवड : साधारणतः उन्हाळी कपाशीची लागवड १५ मार्च ते ३० मार्च या दरम्यान करावी.

हवामान : उबदार कोरडे, उष्ण हवामान अनुकूल.

जमीन : पाण्याचा निचरा होणारी भारी, काळी, मध्यम खोल जमीन निवडावी. तिचा सामू ५.५ ते ८.५ पर्यंत असावा.

पूर्वमशागत : एक खोल नांगरणी, दोन वेळा वखरणी व चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १०-१२ टन या प्रमाणात जमिनीत मिसळावे. गांडूळ खत व कंपोस्ट खत यांचाही वापर करावा. त्यानंतर सरी पाडून ठिबक किंवा पाटपाणी यांच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी कपाशीची लागवड करावी.

बीज प्रक्रिया : प्रमाण प्रति किलो बियाणे

कार्बेन्डाझीम (५० %) अधिक मॅन्कोझेब (२५% डब्ल्यूएस) ३ ग्रॅम किंवा थायरम (७५% डब्ल्यूएस) २ ग्रॅम व थायामेथोक्झाम (३० एफएस) १० मिलि किंवा इमिडाक्लोप्रीड (६०० एफएस) २ ग्रॅम तसेच पीएसबी, ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम.

वाढ नियंत्रण

पीक ६५ ते ७० दिवसांचे असताना शेंडे खुडणी करावी किंवा ५५ आणि ७५ दिवसांचे असताना शिफारसीत वाढ रोधकाची फवारणी करावी.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : पेच कापूस लागवडीचा

पाणी व्यवस्थापन

उन्हाळी कापसाला गरजेनुसार ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत व उत्पादनात वाढ होते.

संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पूर्व मशागती वेळी शेणखत द्यावे किंवा शेणखत कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकून मातीत चांगले मिसळावे.

द्रवरूप खते ठिबक सिंचनाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी, खत टाकी किंवा इंजेक्टर पंप या साधनाचा वापर करावा. द्रवरूप खतांचा वापर करताना माती परीक्षण आवश्यक आहे. त्यानुसार खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते.

नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त मॅग्नेशिअम, गंधक, लोह, जस्त, मॅंगेनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही गरज भासते. अन्नद्रव्यांमुळे बोंडांची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात.

अन्नद्रव्ये वापर सुधारित, संकरित व बीटी संकरित वाणनिहाय युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आदींचा वापर शिफारशीनुसार करावा. ठिबक सिंचनाद्वारे मध्यम खोल काळ्या जमिनीत बीटी कपाशीसाठी शिफारसीत खत मात्रा नत्र: स्फुरद: पालाश १२०:६०:६० किलो प्रति हेक्टर या विद्राव्य स्वरूपातील खतांमधून १४ आठवड्यांत द्याव्यात.

यात लागवडीनंतर १ ते २१ दिवस तीन समान हप्ते, २२ ते ६६ दिवस सहा समान हप्ते, ६४ ते ७७ दिवस दोन समान हप्ते व ७८ ते ९८ दिवस तीन समान हप्ते असे नत्र-स्फुरद व पालाश यांचे वर्गीकरण आहे. विद्यापीठातील तज्ज्ञांशी बोलून त्याबाबत अधिक माहिती घेता येईल.

लागवड अंतर आणि वाणांची निवड

संकरित वाण पेरणीचे अंतर झाडांची संख्या / एकर बियाणाचे प्रमाण

फुले माही १२० × ४५ सें.मी. ७,४०७ झाडे / एकर ८०० ग्रॅम / एकर

फुले चेतना १२० × ३० सें.मी. ११,०१९ झाडे / एकर ९०० ग्रॅम / एकर

फुले प्रभा १२० × ६० सें.मी. ५,५५५ झाडे / एकर ५०० ग्रॅम / एकर

फुले धारा १२० × ६० सें.मी. ५,५५५ झाडे / एकर ५०० ग्रॅम / एकर

सरळ वाण पेरणीचे अंतर झाडांची संख्या / एकर बियाणाचे प्रमाण

फुले - ६८८

९० × ३० सें.मी. १४,८१४ झाडे / एकर १.५ किलो / एकर

६० × ३० सें.मी. २२,२२२ झाडे / एकर २ किलो / एकर

६० × ४५ सें.मी. १४,८१४ झाडे / एकर १.५ किलो / एकर

९० × ४५ सें.मी. १०,००० झाडे / एकर १.२५ किलो / एकर

फुले रुखमाई ९० × ३० सें.मी. १४, ८१४ झाडे / एकर १.५ किलो / एकर

फुले यमुना ९० × ३० सें.मी. १४,८१४ झाडे / एकर १.५ किलो / एकर

एकात्मिक कीड व्यवस्थापन

लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली फवारणी करावी. त्यामध्ये निबोंळी अर्क, तसेच फुले बगीसाईड यांचा वापर करावा.

पेरणीच्या वेळी

बीजप्रक्रिया ः इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यूएस) ९ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान (२५ डीएस) ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.

 मिश्र पीक, आंतरपीक (मूग, उडीद, सोयाबीन)

 सापळा पिके म्हणून मका, चवळी, ज्वारी, राळा यांची लागवड करावी.

 बीटी कपाशी भोवती ५ टक्के बिगर बीटी वाणाची लागवड करावी.

पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी

रसशोषक किडींचे नियंत्रण

 क्रायसोपा अंडी ५० हजार प्रति हेक्टर शेतामध्ये सोडावीत.

 ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.

शेंडे अळी व बोंडे अळीसाठी (दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी करावी.)

 बीटी कुरस्टाकी (जिवाणूजन्य कीटकनाशक) १ किलो प्रति हेक्टरी फवारणी.

 ट्रायकोग्रामा अंडी १.५ लक्ष प्रति हेक्टर प्रसारण.

 फेरोमोन सापळे आणि पक्षिथांबे शेतामध्ये लावावेत.

रस शोषक किडीसाठी तिसरी फवारणी

(दुसऱ्या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी) प्रमाण प्रति लिटर पाणी ः

 ॲसिटामिप्रिड (२० एस.पी.) ०.२ ग्रॅम किंवा

 फ्लोनिकॅमिड (५० डब्ल्यू.जी.) ०.२ ग्रॅम

सर्वप्रकारच्या बोंड अळ्या

(शेंडे अळी, अमेरिकन व गुलाबी बोंड

अळी) प्रमाण प्रति लिटर पाणी ः

 एचएनपीव्ही. ५०० एल.ई. प्रति हेक्टर किंवा

 लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.८ मि.लि. किंवा

 स्पिनोसॅड (४५ एस.सी.) ०.३५ मि.लि. किंवा

 प्रोफेनोफॉस (५० ई.सी.) ३ मि.लि.

किंवा

 इंडोक्झाकार्ब (१५.८ ई.सी.) १ मि.लि.

- डॉ. अनंत इंगळे , (संशोधन सहयोगी),

: ९६८९६ ५३८५४

डॉ. नंदू भुते, (सहा. कीटकशास्त्रज्ञ),

: ७५८८०८२०३३, (कापूस सुधार प्रकल्प,

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com