असे करा सीताफळ लागवडीचे नियोजन

माझ्याकडे तीन हेक्टर २० आर क्षेत्रावर सीताफळ लागवड आहे. त्यातील हजार झाडे (३ एकर बाग) ही बारा वर्षापूर्वी लावली आहेत.
असे करा सीताफळ लागवडीचे नियोजन
Custard Apple Agrowon

शेतकरी नियोजनः रमेश निकस

माझ्याकडे तीन हेक्टर २० आर क्षेत्रावर सीताफळ लागवड (Custard Apple Cultivation ) आहे. त्यातील हजार झाडे (३ एकर बाग) ही बारा वर्षापूर्वी लावली आहेत. त्याचे सुमारे १० वर्षांपासून दरवर्षी उत्पादन (Custard Apple Production) मिळत आहेत. तीन वर्षापूर्वी (२०१८ मध्ये) १५०० झाडे ८ बाय १६ फूट अंतरावर या प्रमाणे पाच एकर क्षेत्रामध्ये लावली आहेत. या काटक अशा फळ पिकाचा उत्पादन (Fruit Crop Production) खर्च तुलनेने कमी आहे. योग्य वेळी विश्रांती आणि छाटणी यांचे गणित बसवले आहे. मागील सहा महिन्यांपासून बाग विश्रांती अवस्थेत होती. मे महिन्यात छाटणी केली. त्यानंतर आता पाऊस होताच बागेत पालवी दिसू लागली.

बागेची साफसफाई

३० डिसेंबरपासून सीताफळाची बाग विश्रांतीवर सोडली होती. यामध्ये मागील सहा महिने कुठलेही काम केले नाही. या वर्षी १८ मे रोजी सीताफळ बागेच्या छाटणीचे काम सुरू केले. जवळपास २० दिवस छाटणी चालली. छाटणीनंतर ताबडतोब बागेत ट्रॅक्‍टरच्या साह्याने आंतरमशागत करून घेतली. बागेतील सर्व काडीकचरा रोटाव्हेटरच्या साह्याने बारीक करून घेतला. जास्त जाड असलेल्या काड्या वेचून घेतल्या. बाग एकदम स्वच्छ करून घेतली. आमच्या भागात नऊ जूनला आता पहिला पाऊस झाला. हा पाऊस झाल्याबरोबर मी प्रत्येक झाडाला १९-१९-१९ नत्र स्फुरद पालाश घटक असलेल्या रासायनिक खताची मात्रा १२५ ग्रॅम या प्रमाणात दिली. सोबत प्रत्येक झाडाला दोन पाट्या शेणखत दिले. दरवर्षी तीन एकर बागेसाठी दहा ते पंधरा ट्रॉली शेणखताचा वापर करतो. ९ ते १६ जूनपर्यंत साधारण ३४ मिलिमीटर पाऊस नियमित झाला. परिणामी झाडांना पालवी फुटणे सुरू झाले आहे.

आगामी कामाचे नियोजन

- सीताफळ बहार धरण्यापूर्वी झाडाची छाटणी झाल्याबरोबर झाडावर एक बुरशीनाशक औषधाची फवारणी केली होती. आता बागेत पालवी दिसू लागली आहे. त्यावर रसशोषक किडींसोबतच पावसाळी वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची एक फवारणी येत्या एक-दोन दिवसात घेण्याचे नियोजन आहे.

- त्यानंतर एकूण नत्र, स्फुरद आणि पालाश खताचे डोस विभागून २० दिवसाच्या अंतराने तीन वेळा देणार आहे. पुढील डोस आता जुलै- ऑगस्ट- सप्टेंबर या महिन्यात येतील.

- सीताफळ झाडावर मावा, तुडतुडे अशा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याकडे सध्या लक्ष ठेवून आहे. पिकाच्या संरक्षणासाठी फवारणी करावी लागते.

- पुढील काळात फळधारणेनंतर मालाची काढणी साधारणपणे १५ ऑक्टोबरपासून होईल, असे व्यवस्थापन करीत आहे.

संपर्क ः रमेश निकस, ९४२०३३६५१५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com