Monsoon In India : भारतातील सामाजिक-आर्थिक विकासाची दिशा मॉन्सून ठरवतो ?

इंडियन प्लेट उत्तर दिशेला युरेशियाच्या प्लेटवर चढू लागली त्यामुळे तिथे हिमालयाची पर्वतरांग तयार झाली. इंडियन प्लेट उत्तर दिशेला सरकते आहे म्हणूनच हिमालयाची उंची वाढते आहे.
Monsoon In India
Monsoon In IndiaAgrowon

इंडियन प्लेट उत्तर दिशेला युरेशियाच्या प्लेटवर चढू लागली त्यामुळे तिथे हिमालयाची पर्वतरांग (Himalayan Mountain) तयार झाली. इंडियन प्लेट उत्तर दिशेला सरकते आहे म्हणूनच हिमालयाची उंची वाढते आहे. हिंदी महासागराचा बहुतांश भाग या इंडियन प्लेटवर आहे. त्याला लागूनच आहे आफ्रिका खंडाची (African Continent) प्लेट. हिमालय आणि हिंदुकुश या दोन्ही पर्वतरांगा भारतीय उपखंडात समाविष्ट होतात.

अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, भूतान, नेपाळ, बांग्ला देश, श्रीलंका, मालदीव असे नऊ देश भारतीय उपखंडात आहेत. इंडियन प्लेट आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. म्हणून या देशांच्या समूहाला म्हणतात दक्षिण आशिया. भारतीय उपखंड आणि दक्षिण आशिया हे आधुनिक शब्द आहेत. इंग्रजी भाषेतील संज्ञांची ती मराठी रुपं आहेत. प्राचीन नाव होतं जंबुद्वीप.

अफगाणिस्तानातल्या महंमद घोरीचा इतिहासकार अल बेरुनी. अरबी, फारशी, संस्कृत इत्यादी भाषांचा त्याचा अभ्यास होता. ग्रीक तत्वज्ञान, शास्त्र याचाही अभ्यास त्याने केला होता. भारतीय ज्योतिष, तत्वज्ञान, विज्ञान याचाही त्याने अभ्यास केला. त्याने असं नोंदवलं आहे की गंगा-यमुनेचं खोरं आणि हिमालय येथे एकेकाळी समुद्र होता. त्यानेही जंबुद्वीप हा शब्द वापरला आहे. काही पाश्चात्य अभ्यासक तिबेटचाही समावेश भारतीय उपखंडात करतात. तर काही अभ्यासक मॉरिशस बेटांनाही भारतीय उपखंडात आणतात.

Monsoon In India
Crop Cutting : राज्य शासनानं महसूल विभागाला पुन्हा वेसण घातली ? | ॲग्रोवन

युरोप आणि आशिया या दोन खंडांना व्यापणारं युरेशियाचं पठार आणि हिंदी महासागर यांच्यामध्ये भारतीय उपखंड वसलेला आहे. उत्तर दिशेला लँण्ड लॉक्ड म्हणजे जमीन असलेला एकमेव महासागर म्हणजे हिंदी महासागर. उन्हाळ्यामध्ये ही जमीन तापते आणि समुद्राचं तापमान तुलनेने कमी असतं त्यामुळे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहू लागतात.

हिवाळा सुरू होतो तेव्हा समुद्राचं तापमान जमिनीच्या तुलनेत अधिक असतं त्यावेळी हे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. येताना ते समुद्रावरचं बाष्प घेऊन येतात आणि पाऊस पडतो. म्हणून फक्त भारतीय उपखंडात मॉन्सूनचं चक्र आहे. वर्षातले चार महिने पाऊस पडतो पण शेती बारा महीने करायची असते, खरीप हंगामात अधिक पाण्याची पिकं घ्यायची तर रब्बी हंगामात कमी पाण्यावर वाढणारी पिकं घ्यायची हे शहाणपण भारतीय उपखंडातील लोकांनी इतिहासपूर्व काळापासून (लिखित इतिहास नसलेला काळ) आत्मसात केलं आहे.

Monsoon In India
Crop Damage : अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात; शेतकरी कोलमडला

मॉन्सूनच्या चक्रामुळे या उपखंडातील संस्कृती प्रामुख्याने कृषि प्रधान राह्यली. नद्यांच्या गाळाचे सुपीक प्रदेश, गवताळ वा झुडपी जंगलांची मैदानं, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारं, समुद्र किनारे अशा विविध भौगोलिक प्रदेशांवर पडणार्‍या मॉन्सूनच्या पावसामुळे जंगल, शेती, पशुपालन, मासेमारी, व्यापार यावर उपजिविका करणारे विविध जनसमूह भारतीय उपखंडात आजही आहेत. जगातील जवळपास सर्व वंश, धर्म, भाषा, संस्कृती भारतीय उपखंडात आहेत. आयन टॉयन्बी या इतिहासकाराच्या मते भारत म्हणजे विविध कप्प्यांमध्ये सामावलेलं संपूर्ण जग आहे. विविध कप्पे म्हणजे सांस्कृतिक वैविध्य. भारतीय उपखंडात सांस्कृतिक ओळख आणि राजकीय ओळख प्राचीन काळापासून वेगळी आहे. युरोपातील नेशन-स्टेट या संकल्पनेत म्हणूनच भारतीय उपखंड सामावला जात नाही. भारत असो की पाकिस्तान वा श्रीलंका किंवा अफगाणिस्तान, भारतीय उपखंडातील प्रत्येक देशापुढे राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा सातत्याने चर्चिला जातो. कारण प्रत्येक देशातील सांस्कृतिक वैविध्य राष्ट्र-राज्य या संकल्पनेमध्ये सामावून घेण्याचा संघर्ष अनेकदा रक्तरंजित होतो.

Monsoon In India
Crop Damage : तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. या दिवशी दुधाच्या सागरात शेषाच्या शय्येवर विष्णू निद्राधीन होतो आणि कार्तिकी एकादशीला तो निद्रेतून उठतो, असं मानलं जातं. या काळाला म्हणतात चातुर्मास. हाच काळ मॉन्सूनच्या पावसाचा. या काळात दैत्यांचं राज्य असतं त्यामुळे व्रत-वैकल्य, उपास करण्याचा हा काळ मानला जातो ( दैत्य म्हणजे ढग असावेत असा साधार दावा विश्वनाथ खैरे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केला आहे). चातुर्मासात म्हणजे पाऊस काळात साधू, संन्यासी, बैरागी इत्यादी श्रमण एका नगरात वा गावात मुक्काम करत. गौतम बुद्धाने चातुर्मासात राजगीरला एका उद्यानात मुक्काम केला होता आणि तिथे तो रोज उपदेश करत असे. आजही अनेक बौद्ध साधू चातुर्मासात तिथे उपदेश वा प्रवर्चनं करतात. जैन धर्मीयांचं पर्यूषण पर्व तेव्हाच सुरू होतं. पंजाब, आसाम इथेही जैन धर्मीय असल्याने तिथेही चातुर्मास साजरा केला जातो. गुरु पौर्णिमा, रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा), गणेश चतुर्थी, नवरात्री, दिवाळी आणि महाराष्ट्रात चंपाषष्ठी हे सण चातुर्मासात म्हणजे मॉन्सूनच्या काळात साजरे केले जातात. मात्र हा काळ दैत्यांचा म्हणून अशुभ समजला जातो. विवाह इत्यादी शुभ कार्ये या काळात होत नाहीत.

आषाढी एकादशीच्या सुमारास नांगरणी, पेरणी झालेली असते. शेतीची ही कामं आटोपून महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरच्या वारीला जातात. भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं तुकारामानेच लिहून ठेवलं आहे. लोकहितवादींनीही वारकरी धर्म असा उल्लेख केला आहे. म्हणजे ब्राह्मणांचा आणि वारकर्‍यांचा धर्म वेगळा असावा असा कयास करता येतो. बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभेचि असतो मेलो, असंही तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या जातीतले लोक वारकरी धर्माचं पालन करतात. अगदी ब्राह्मणही वारकरी वा माळकरी असू शकतात. म्हणजे धर्म, पंथ, जात अशा वेगवेगळ्या ओळखी वा अस्मिता एकत्र नांदत होत्या. कबीर हा तुकारामांचा पूर्वसूरी म्हणता येईल. पंढरपूरला कबीराची पालखीही येते.

तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं. स्वतःचा राज्याभिषेक करवून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला म्हणजे मुघल सत्तेला आव्हान दिलं. हे आव्हान अर्थातच हिंदु राज्याचं होतं (हिंदुत्वाचं नाही). आणि कबीर तर वाराणसीचा. मुघल सत्तेच्या प्रदेशातला. कबीराने देशाटन केल्याचं पुरावा नाही. तुकाराम महाराजही देहू गाव सोडून पंढरपूरला गेल्याचा पुरावा नाही. पण कबीराच्या रचना त्यांच्यापर्यंत पोचल्या होत्या. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय अस्मिता वा ओळख याच्या पलीकडे जाऊन एकमेकांना जोडणार्‍या या धाग्यात मॉन्सून बेमालूनपणे गुंफला गेला आहे. लालडेंगा या मिझो क्रांतीकारकाने भारत देशाशी युद्ध पुकारलं होतं. परंतु पुढे तह वा शांतता करार झाल्यानंतर (भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत) तो मिझोराम राज्याचा मुख्यमंत्री झाला. द्रविड कळहमने हिंदी राष्ट्रवादालाच नाही तर भारतीय राज्यघटनेलाही विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्या अनेक नेत्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. पुढे त्यांनी निवडणुकांच्या राजकारणात उतरण्याचा (म्हणजे भारतीय राज्यघटना स्वीकारण्याचा) निर्णय घेतला आणि तामीळनाडू राज्यातली काँग्रेसची सत्ता गेली. २०१६ सालापर्यंत काँग्रेस वा अन्य कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तामीळनाडूत सत्ता मिळवता आलेली नाही. द्रमुक आणि अण्ण द्रमुक हे दोनच पक्ष तिथे आलटून-पालटून सत्तेवर येतात.

कार्तिकी एकादशीला विष्णू पाताळलोकातून वर येतो. मॉन्सूनचा हा परतीचा काळ आहे. महाराष्ट्रात सप्टेंबरातच मॉन्सून संपतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. खरीपाच्या पिकाची कापणी झालेली असते त्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. अशीही समजूत आहे की या दिवशी वामनाने बळीराजाला पाताळात ढकलले. म्हणून बलिप्रतिपदा साजरी केली जाते. त्या दिवशी नवर्‍य़ाला ओवाळताना बायका म्हणतात—इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो. बळीराजा हा महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचा आयकॉन समजला जातो. वामन हा बटू म्हणजे ब्राह्मण, त्याने बळीराजाचा म्हणजे न्यायी, प्रजाहितदक्ष अब्राह्मण राजाचा नाश केला अशी समजूत आहे. केरळमध्ये आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात ओणम् हा सण साजरा केला जातो. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला भूतलावर येतो. मॉन्सून सर्वप्रथम येतो केरळात त्यामुळे तिथल्या पिकांची कापणी आश्विन महिन्यात होते तर महाराष्ट्रात कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. दोन्हीकडे बळीराजाची दोन वेगळी रुपं दिसतात. या वैविध्यामध्ये मॉन्सूनचा वाटा सिंहाचा आहे.

सिंधु नदीच्या खोर्‍य़ात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेती करण्याचं तंत्र आणि ज्ञान मोहेंजोदारो-हडप्पा संस्कृतीपासून होतं. मॉन्सून येण्यापूर्वी शेतकर्‍यांना कर्ज द्यायचं आणि शेतमालाच्या खरेदीतून कर्जाची व्याजासह रक्कम वसूल करायची. शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी कारागीरांना उचल द्यायची आणि तयार माल बाजारपेठेत पाठवायचा ही पद्धत भारतामध्ये प्राचीन काळापासून आजही सुरू आहे. बलुचिस्तानातील मुलतानमधील हिंदू व्यापार्‍यांनी ही पद्धत सुरू केली असं मानलं जातं. हे व्यापारी मध्य आशियाच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होते. मुसलमानांमध्ये व्याज देण्याघेण्याला बंदी असल्यामुळे हिंदू व्यापार्‍यांनी ही महत्वाची उणिव भरून काढली.

व्यापार आणि शेतीकर्जाची ही व्यवस्था हिंदू व्यापार्‍यांनी अफगाणिस्तान, बुखारा, उझबेकिस्तान या मुस्लिम राष्ट्रांमध्येही रुजवली. एलफिन्स्टनने नोंद केली आहे की पूर्व अफगाणिस्तानातील जवळपास प्रत्येक गावात एका हिंदू बनियाने बस्तान बसवलं आहे. बुखारा, उझबेकीस्तानात हिंदू व्यापारी सरायांमध्ये राह्यचे. तिथे त्यांना मंदिर बांधायलाही परवानगी होती. हिंदू व्यापार्‍यांसाठी तिथे स्मशानं म्हणजे दहनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. चितेची राख आपल्या घरात येते म्हणून स्थानिक मुसलमान या स्मशानांवर हल्ले करत म्हणून स्थानिक राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या स्मशानासाठी खास सैनिकांची व्यवस्था केली होती. दिल्लीचे सुलतान असोत की त्यानंतरचे मुघल सम्राट, सर्वांनी व्यापारी मार्गावर कायदा-सुव्यवस्था नांदेल याकडे बारकाईने लक्ष दिलं होतं. सावकारी आणि व्यापारी यामुळे आपल्या खजिन्यात भर पडते, हे ओळखण्याइतके ते राज्यकर्ते चाणाक्ष होते म्हणूनच काफीरांना संरक्षण देण्यामध्ये त्यांनी हलगर्जीपणा केला नाही. कापड, साखर, मसाले, धान्य, डाळी, गुलाम असा माल भारतातून मध्य आशिया आणि तिथून चीनला जात असे. तर चिनी रेशीम, चिनीमातीची भांडी, घोडे, लोकर, सुकामेवा इत्यादी माल भारतात येत असे. या व्यापार्‍यांनी हुंडी इत्यादी फिनान्शिअल इंन्स्ट्रुमेंटसही तयार केली होती. मॉन्सून नसता तर हा व्यापारच शक्य नव्हता.

तामीळनाडूच्या चोला सम्राटांनी मॉन्सूनच्या वार्‍यांवर शिडं हाकारून चीनपर्यंत मजल मारली होती. इंडोनेशिया, मलाया, श्रीलंका, म्यानमारमध्येही आपल्या राज्याचा विस्तार चोलांनी केला होता. मॉन्सूनच्या वार्‍यांचं व्यापारी आणि सामरिक महत्व सर्वप्रथम ओळखलं चोला सम्राटांनी. सम्राट अशोकाच्या काळापासून (इसवीसनपूर्व ३ रे शतक) ते १३ व्या शतकापर्यंत चोला सम्राटांनी दक्षिण भारतावर राज्य केलं. चोला साम्राज्याचा आर्थिक आधार अर्थातच शेती आणि व्यापार होता. मात्र त्यांची शेती परतीच्या मॉन्सूनवर फुलणारी होती. चोला साम्राज्याचं चिन्ह होता पट्टेरी वाघ. तोच पट्टेरी वाघ लिबरेशन टायगर ऑफ तमिळ एलमचं, म्हणजे लिट्टे वा एलटीटीईचंही चिन्ह बनून श्रीलंकेच्या राष्ट्रवादाला आव्हान देऊ लागला. देशाचे माजी पंतप्रधान, राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी आजपर्यंत का होऊ शकली नसावी, याचं कारण तमिळ जनतेच्या अबोध मनामध्ये वसणार्‍या तमिळ राष्ट्रवादामध्येही असू शकेल.

एकमेकांना पूरक वा छेदणार्‍या अस्मिता, वैविध्य, विषमता या सर्वांना सामावणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीची पायाभरणी भारतीय उपखंडात मॉन्सूनने केली आहे. बांग्ला देश असो की नेपाळ वा पाकिस्तान वा अफगाणिस्तान वा म्यानमार सर्व देशांतील शेतकरी, राज्यकर्ते आणि अर्थतज्ज्ञ मान्सूनकडे नजर लावून असतात. या प्रदेशातील वैविध्याला फक्त लोकशाही व्यवस्थाच सामावून घेऊ शकते आणि आर्थिक, सामाजिक विकासामध्ये मॉन्सूनची भूमिका निर्णायक असेल हे ध्यानी घेऊनच भारतीय उपखंडातील देशांना राष्ट्र-राज्याचं आपलं वेगळं मॉडेल विकसित करावं लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com