Climate Change : ढगाळ, पावसाळी वातावरणाचे द्राक्ष बागेवर होणारे परिणाम

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये फळछाटणी ही जूनमध्येच केली जात असल्यामुळेच खरडछाटणी फार लवकर होते. अशा ठिकाणी गेल्या आठवड्यातील वातावरणाचा चांगला परिणाम बागेतील फुटींवर होताना दिसून येईल.
Climate Change
Climate ChangeAgrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Climate Change Update : गेल्या काही दिवसात वातावरणात बऱ्यापैकी बदल होत असल्याचे दिसून येते. यात विशेषतः ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होते. त्यामुळे तापमानातही घट झाली. काही ठिकाणी पाऊस व गारपीटही झाल्यामुळे आर्द्रता वाढली आहे.

द्राक्ष लागवड विभागामध्ये फळकाढणी बऱ्यापैकी संपलेली आहे. काही ठिकाणी उशिरा फळछाटणी केलेल्या बागेत फक्त काही ठिकाणी (विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील पुळूज आणि कासेगाव) फळकाढणी बाकी असेल.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये फळछाटणी ही जूनमध्येच केली जात असल्यामुळेच खरडछाटणी फार लवकर होते. अशा ठिकाणी गेल्या आठवड्यातील वातावरणाचा चांगला परिणाम बागेतील फुटींवर होताना दिसून येईल.

सध्या उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बागेत वाढीच्या विविध अवस्थांमध्ये या वातावरणाचा परिणाम व त्यानुसार करावयाचे व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.

Climate Change
Grape Crop Damage : ‘वादळी’ने सांगोल्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत

१) नवीन बाग

रिकट घेतल्यानंतर बागेत या वेळी खोड तयार झालेले असेल. यानंतर ओलांडा तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू असेल. सध्याच्या वातावरणाचा विचार करता जर बागेत तापमान कमी होऊन आर्द्रता वाढलेली असल्यास वाढ जोमात होत असल्याचे दिसून येते. याचा फायदा ओलांडा तयार करण्यासाठी होईल.

एकदा तयार झालेला ओलांडा हा जवळपास चौदा ते पंधरा वर्षापर्यंत तसाच असतो. याच ओलांड्यावर फलधारित काड्या तयार होतात, त्या काड्यांपासून चांगल्या प्रतीची द्राक्षे घेतली जातात. कॅनोपी व्यवस्थापनाचा विचार करता ओलांड्यावर निघालेली फुटींची विरळणी महत्त्वाची असते.

सुरुवातीस तयार केलेल्या ओलांड्याची वाढ जर जोमात असल्यास दोन पेऱ्यातील अंतर वाढलेले असेल. अशा परिस्थितीत पुढील काळात फुटींची विरळणी करण्याची गरज पडणार नाही.

त्याकरिता ओलांडा तयार करतेवेळी निघालेल्या फुटींचा जोम जितका जास्त असेल तितका त्याचा फायदा होईल. दोन पेऱ्यातील अंतर अडीच ते तीन इंच राहण्यासाठी खत व पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असेल.

नत्रयुक्त खतांचा वापर यावेळी जास्त महत्त्वाचा असेल. युरिया आणि अमोनिअम सल्फेट हाच चांगला पर्याय असेल. भारी जमीन असलेल्या बागेत आर्द्रतेचे प्रमाण थोडेफार जास्त असते व त्याचा वाढीसाठी फायदा होतो. अशा परिस्थितीत नत्राचा वापर जास्त करण्याची गरज नसेल.

हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे आर्द्रताही कमी असते. त्यामुळे नत्राचा वापर गरजेचा असेल. ओलांड्याच्या फुटीचा पेरा वाढविण्यासाठी युरिया सव्वा ते दीड किलो प्रति एकर प्रति दिन या प्रमाणे ८ ते १० दिवस ठिबकद्वारे द्यावे.

ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण ८ टक्क्यांपेक्षा जास्त असून आणि जमिनीचा सामू ७.५ पेक्षा अधिक आहे, अशा ठिकाणी युरियाचा वापर न करता अमोनिअम सल्फेट एक ते सव्वा प्रति एकर या प्रमाणात आठ ते दहा दिवस प्रति दिन करावा.

चुनखडी असलेल्या जमिनीत बोदामधील शेणखतामध्ये सल्फर मिसळून द्यावे. यामुळे कालांतराने जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होते. दोन पेऱ्यातील अंतर जर कमी वाटत असल्यास नत्रयुक्त खतांचा वापर वाढवावा. तर पेरा जास्त वाढत असलेल्या परिस्थितीत ही खते बंद करून पाण्यावरही नियंत्रण ठेवावे.

ज्या भागात पाऊस झालेला नाही, अशा ठिकाणी तापमानात वाढ होऊन आर्द्रता कमी झाली असेल. अशा परिस्थितीत पाण्याचा वापर जास्त महत्त्वाचा असेल. पाणी कमी असलेल्या ठिकाणी वेलीचे पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे करावे.

ठिबक नळ्या एकतर जमिनीवर किंवा बोदावर घ्याव्यात. जमिनीपासून दोन फूट वर असलेल्या ठिबकनळ्यातून पडणारे पाणी वाऱ्यामुळे एका ठिकाणी पडत नाही. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे मुळांच्या कक्षेत पाणी मिळत नाही.

ठिबकनळ्या खाली घेतल्यामुळे मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पाणी मिळून मुळांची कार्यक्षमता वाढेल. बोदावर मल्चिंग केल्यास पाणी निघून जाण्याची शक्यता कमी होते. एकतर सकाळी लवकर किंवा रात्री थोडे उशिरा पाणी दिल्यास पाण्याचा पुरेपूर फायदा होईल.

Climate Change
Exportable Grape Damage : पावसाचा निर्यातक्षम द्राक्षाला फटका

२) जुनी बाग

खरडछाटणी झालेल्या या बागेत गेल्या आठवड्यातील वातावरणाच्या बदलामुळे वाढ जोमात होताना दिसेल. या वेळी बऱ्याचशा फुटी ओलांड्यावर निघालेल्या दिसतील. चांगल्या प्रतीच्या प्रत्येक फलधारित काडीही साधारणपणे ८ ते १० मि.मी. जाडीची असावी.

वेलीला मिळालेल्या सुमारे १ वर्गफूट अंतराकरिता अर्धी काडी असणे गरजेचे समजावे. या करिता काडी विरळणीचे महत्त्व असते. चार ते पाच पाणी अवस्थेत फुटीची विरळणी करून घ्यावी.

विरळणी करतेवेळी जास्त जोमात निघालेल्या फुटी (जवळपास १० टक्के) व उशिरा निघत असलेल्या अशक्त अशा फुटी (१० टक्के) काढून घेतल्यास एकसारख्या वाढीच्या फुटी (७० ते ८० टक्के) या पैकी विरळणी अशा प्रकारे करावी की ओलांड्यावर प्रत्येक फुटीतील अंतर अडीच ते तीन इंच इतके राहील.

फुटींची वाढ करून घेण्यासाठी नत्र आणि पाणी शिफारशीप्रमाणे द्यावे. जुन्या वेलीच्या ओलांड्यामध्ये अन्नद्रव्याचा पुरेसा साठा राहत असतो. त्यामुळे सुरुवातीला फुटी निघण्यास उशीर होतो, परंतु नंतर वाढ जोमात होते. तेव्हा वाढीचा जोम विचारात घेऊन नत्र आणि पाण्याचा योग्य वापर करावा.

वाढत्या तापमानात या पूर्वी ओलांड्याच्या सालीखाली असलेला मिलीबग या वेळी कार्यरत होताना दिसेल. काही कोवळ्या पानांची वाटी झालेली तर काही ठिकाणी पूर्ण फूट गुंडाळल्यासारखी दिसेल. अशा फुटींची वाढ होत नाही व जाडीही मिळत नाही.

वाढत्या तापमानामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे शिफारशीत कीडनाशकांचा वापर करून ही कीड नियंत्रणात आणावी. प्रादुर्भावग्रस्त फुटी काढून टाकल्या तरी चालतील.

ज्या बागेत विरळणी होऊन फुटींचा जोम टिकून आहे, अशा ठिकाणी सबकेन करणे गरजेचे असेल. वाढत असलेली फूट नऊ पानांच्या अवस्थेत सातव्या पानावर खुडून घ्यावी. काही ठिकाणी बागायतदार पाचव्या पानावरही पहिला सबकेन करतात.

कोणत्या डोळ्यामध्ये चांगला घड असेल, याची शंका शेतकऱ्यांच्या मनात तयार होते. सबकेनकरिता पिंचिंग केल्यानंतर (पाचवा, सहावा किंवा सातवा डोळा) निघालेल्या बगलफूटीच्या जवळ गाठ तयार होते.

कालांतराने निघालेल्या बगलफूटीला सुरुवातीला पेऱ्यातील अंतर कमी असते. कालांतराने हा डोळा जाड होतो व त्यालाच ‘टायगर बड’ असेही म्हटले जाते. या डोळ्यामध्ये चांगल्या प्रकारची सूक्ष्मघड निर्मिती झाल्याची खात्री होते.

काही वर्षापूर्वी केलेल्या अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष पुढील प्रमाणे...

- थॉमसन आणि तास- ए- गणेश या जातींमध्ये सहाव्या आणि सातव्या डोळ्यावर पिंचिंग केल्यास सूक्ष्म घड निर्मिती चांगली झाली.

-सबकेन केलेल्या निघालेल्या बगलफुटीवर झिंक सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर आणि मॅग्नेशिअम सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन दिवसाच्या अंतराने वेगवेगळी फवारणी करावी. सायंकाळी फवारणी केल्यास पानांची रसायन शोषण्याची क्षमता चांगला असते.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com