Grape : अतिवृष्टीचा द्राक्षबागांवर परिणाम

गेल्या काही दशकांत द्राक्ष भागांत अतिवृष्टी, दुष्काळ आणि तापमानवाढ या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठे नुकसान झाले आहे. मागील ३-४ वर्षांत आकस्मित झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
Grape
Grape Agrowon

डॉ. ज.मा. खिलारी

गेल्या काही दशकांत द्राक्ष भागांत (Grape Belt) अतिवृष्टी (Heavy Rain), दुष्काळ (Drought) आणि तापमानवाढ (Heat) या नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamity) मोठे नुकसान झाले आहे. मागील ३-४ वर्षांत आकस्मित झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान (Vineyard Damage Due To Heavy Rain) झाले आहे. या सर्व बाबींचा एकूण परिणाम हा वेलींवर दिसून येतो. चालू वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेला पाऊस अद्यापही चालूच आहे. त्यामुळे द्राक्ष बागेत दिवसेंदिवस नवनवीन समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. काही समस्या दृश्य तर काही अदृश्य स्वरूपात दिसून आहेत. बऱ्याचवेळा अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेत दलदली सारखी स्थिती निर्माण होते. याचा बागेवर काय परिणाम होतो, याची योग्य माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याबाबत खाली लेखात माहिती घेऊ.

Grape
Grapes : द्राक्ष बागेत रोगनियंत्रणाकडे लक्ष देणे गरजेचे

सद्यःस्थितीत द्राक्ष बागेत उद्भवणाऱ्या समस्या ः

- सध्या बागांमध्ये सततचा पाऊस, ढगाळ हवामान तसेच दलदलीमुळे झालेल्या ओल्या गच्च जमिनी अशी स्थिती दिसत आहे. यामुळे विशेषतः करपा, भुरी, डाऊनी, तांबेरा, जीवाणूजन्य करपा, मूळकूज तसेच तुडतुडे, मिलीबग या सारख्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच तणांचा वाढता प्रादुर्भाव, प्रतिकूल हवामानामुळे मशागतीसाठीच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. या शिवाय दरवर्षीच्या तुलनेत यंदा नवीन फुटी, बगल फुटींची वाढ जोमाने झाल्यामुळे बागेत गर्दी झाल्याचे चित्र आहे. अगोदरच ढगाळ हवामान त्यात गर्दीमुळे सावली सारखी स्थिती पाहायला मिळते. त्यामुळे आधीच अतिमंदगतीने सुरु असलेली काडीची पक्वता आणखीन मंद गतीने होत आहे. द्राक्ष उत्पादनामध्ये घडनिर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. त्यात असे प्रतिकूल हवामान द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढविणारी नक्कीच आहे.

काही बागांतील वेलीवर आगंतुक मुळ्या फुटल्या आहेत . बागेतील जमिनीमध्ये अतिप्रमाणात दलदल झाल्यामुळे जमिनीतील मुळ्या खोलपर्यंत ओल्या चिंब झाल्या आहेत. हलक्या पोताच्या जमिनी उपळल्या आहेत. तर मध्यम भारी ते भारी जमिनीमध्ये कोणतीही कामे करता येत नाहीत. पाऊस आणि उघडीप अशा विषम स्थितीमध्ये बागेतील जमिनी अतिशय घट्ट आणि कडक होतात. अशा परिस्थितीमध्ये बागेत कोणत्याही उपाययोजना करणे शक्य होत नाही.

द्राक्ष बागेच्या जमिनी अधिक कार्यक्षम राहण्यासाठी जमीन वाफसा स्थितीत असणे आवश्यक आहे. जमिनीच्या एकूण आकारमानाच्या किमान १५ टक्के आकारमान हवेने व्यापलेले असायला हवे. भरपूर पाऊस झाल्यावर किंवा जमिनीस पाणी दिल्यानंतर २ ते १२ तासांत सर्व पाण्याचा निचरा होऊन वाफसा येणे गरजेचे असते. त्यासाठी जमिनीत हवा खेळती राहिल्यास ती घट्ट होत नाही.

Grape
Grape : प्लॅस्टिक आच्छादनाने केले द्राक्ष बागेचे संरक्षण

दलदल आणि ढगाळ हवामानाचे परिणाम ः

१) मुळ्यांवरील परिणाम ः

- बागेतील दलदलीचा प्रत्यक्ष परिणाम हा सर्वप्रथम वेलींच्या मुळांवर दिसून येतो. पानांनी तयार केलेल्या अन्नापैकी (कर्बोदके) ३० ते ६० टक्के पर्यंत अन्न मुळ्यांना पुरविले जाते. मुळांमध्ये ते स्टार्च स्वरूपात साठविले जाते. त्याबदल्यात मुळांद्वारे पाणी, अन्नद्रव्ये, संजीवके वेलीला पुरविली जातात. मुळांनी साठविलेल्या अन्नाचा अडचणीच्या वेळी वापर होतो.

- अतिवृष्टी, जास्त पाणी, जास्त ओलावा यामुळे बागेत दलदल तयार होते. जमिनीतील हवेची पोकळी पाण्याने व्यापली गेल्याने ऑक्सिजन जमिनीतून निघून त्याची जागा कार्बन डायऑक्साईड वायू घेतो. अशा स्थितीमध्ये मुळांची श्वसनक्रिया बंद होते.

पाने जेवढे अन्न बनवितात त्याच्या १५ टक्क्यांपर्यंतचे अन्न मुळांचे श्वसन बंद झाल्याने वाया जाते. पानांनी हवेतील कार्बन स्थिर करून त्याचे साखरेत रूपांतर केलेल्या कार्बन पैकी १५ टक्के कार्बन वाया जातो. तेवढी वेलीची शक्ती वाया जाते.

Grape
Grape : द्राक्षशेतीसह ग्रामविकासात ढोराळेची शानदार कामगिरी

२) वेलीच्या अन्न साठ्यात घट ः

सध्याच्या हवामानामुळे वेलींमधील एटीपी (ATP : Adenosine triphosphate) ची निर्मिती थांबते. पानांमध्ये हरितद्रव्य निर्मितीमध्ये जी शर्करा तयार होते, त्यात एटीपी तयार होतो. एटीपी तयार झाला नाही तर हरिद्रव्य निर्मितीत अन्नच तयार होत नाही. दलदलीच्या परिस्थितीमध्ये अन्न तयार होण्याच्या क्रियेत अडथळा

येतो. कारण, या काळात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही. परिणामी, अन्न निर्मितीची क्रिया थांबते. अशातच मुळांमधून पाणी, अन्नद्रव्ये आणि संजीवकांचे वहन पाने, वेलीच्या शेंड्यापर्यंत करण्याच्या मार्गात छिद्रे तयार झाल्यामुळे त्यांच्या वहनाची क्रिया थांबते. त्यामुळे पर्णरंध्र देखील बंद होतात. अशावेळी वेलीद्वारे ग्लायकोलेसीस या नवीन मार्गाने अन्न निर्मितीचे प्रयत्न सुरु होतात. मात्र, ही क्रिया तात्पुरत्या स्वरूपाची असते. थोडक्यात अन्न निर्मितीची क्रिया पूर्णपणे थांबते. मुळे कार्यरत नसल्यामुळे पानांद्वारे अन्न निर्मिती होत नाही. परिणामी वेलींद्वारे साठवलेले अन्न वापरले जाते.

३) सतत वाढणारे खुडे आणि बगलफुटी ः

सध्याच्या परिस्थितीत ओल्या जमिनी, ढगाळ हवामान आणि सूर्यप्रकाशाची कमतरता दिसून येते. सध्याच्या ढगाळ वातावरणात बागेतील वेलींवर पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. ही परिस्थिती मागील दीड महिन्यापासून पाहायला मिळते आहे. अशा वातावरणात डोळे फुटतात, फुटींची वाढ वेगाने होते. एकदा छाटणी केल्यानंतरही पुन्हा त्यांची वाढ जोमाने होतच राहते. या फुटींच्या माध्यमातून ओलांड्यातील काड्यामधील मोठ्या प्रमाणात अन्नाचा ऱ्हास होतो.

४) अधांतरी मुळ्या फुटणे ः

ही समस्या जुनी असली तरीदेखील यावर्षी खूप लवकर आणि जास्त प्रमाणात पाहायला मिळते. ओलांड्यावर, सबकेनच्या ठिकाणी आणि काड्यावरील पेऱ्यांमधून लांब मुळ्या फुटलेल्या निदर्शनास येतात. मुळ्या फुटणे ही स्थिती जमिनीची भौतिक अवस्था बिघडल्यानंतर होणाऱ्या रासायनिक बदलामुळे निदर्शनास येते.

- ज्या वेळी अति पाऊस होऊन तो दीर्घकाळ टिकतो. जमिनीमधून अनेकदा पाणी वाहून जाते, नंतर जमिनी खूप घट्ट आणि कडक होतात. अशा वेळी वेलीवर अधांतरी मुळ्या फुटतात. याचे कारण म्हणजे दलदल, ऑक्सिजनचा अभाव आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये वाढ होय. अशा स्थितीमध्ये मुळे हायपोस्कीक होतात, ताण वाढतो. परिणामी चयापचयामध्ये पुनर्रचना, विषारी घटकांमध्ये वाढ, संजीवकांचा असमतोल तसेच जनुकीय बदल होण्यास सुरुवात होते.

- अधांतरी मुळे फुटण्याचे समस्येत संजीवकांच्या असमतोलामध्ये प्रामुख्याने ऑक्झिन आणि इथिलीन या संजीवकांचा सहभाग दिसून आला आहे. ऑक्झिन सिग्नलिंग आणि ऑक्झिन नियंत्रित इथिलीनची निर्मिती वाढली तर अधांतरी मुळ्यांचे प्रमाण वाढते असे निदर्शनास आले आहे.

काय करता येईल ?

जमिनीचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ विघटनातून जमिनीतील जैविक तसेच भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये खूप बदल होत असतात, मुळाचे सानिध्यातील वातावरण बदलते त्याचे खूप अनिष्ट परिणाम होतात. दलदलीच्या स्थितीमुळे जमिनीतील रासायनिक घटकांचा समतोल बिघडतो. जमिनीत विषारी घटकांची निर्मिती होते उदा. हायड्रोजन सल्फाईड, अतिक्रियाशील ऑक्सिजन प्रजाती (ROS), अन्नद्रव्यांची अनुपलब्धता वाढते. हवा विरहित, ऑक्सिजन विरहित जिवाणूंमुळे सडण्याचे क्रियेत अनेक विषारी घटक तयार होतात.

शेवटी प्रश्न समोर उभा राहतो की ह्या परिस्थितीत उपाययोजना काय करावी?

दलदलीच्या स्थितीमुळे जमिनी पाण्याने संपृक्त, ऑक्सिजन नाही तसेच जमिनी कडक झाल्यामुळे वेलीसाठी अगणित प्रश्न उभे राहतात. अशावेळी नियोजनाची योग्य दिशा ठरवून त्यानुसार कार्यपद्धतीची राबविण्याची आवश्यकता असते.

वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण २१ टक्के असेल तर जमिनीत ते १० टक्क्यांच्या वर असायला हवे. जमिनीचा कडकपणा वाफशात १ एमपीए आणि पाणी झिरपण्याचे प्रमाण दिवसाला ५०० मिमि पेक्षा जास्त, हवेने भरलेली छिद्रे एकूण आकारमानाच्या १५ टक्के पेक्षा जास्त, एकूण उपलब्ध पाणी रुटझोनमध्ये १५० मिमी पेक्षा जास्त, त्वरित उपलब्ध पाणी रुटझोनमध्ये ७५ मि.मी पेक्षा जास्त, वाटरलॉगिंग संपृक्तेनंतर १ दिवस किंवा पाणी दिल्यास १ दिवस इथपर्यंत पोहचण्यास पूर्वनियोजित निचरा असणे आवश्यक आहे. त्यासाठी संकटा आधी नियोजन आवश्यक आहे. या विषयातले जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ ‘‘आल्फ कास’’ म्हणतात, ‘Aeration and drainage are important to root health and vines will die or loose function in saturated soil. Half of the vineyard lies below the surface and is often neglected to a lesser role.’

- डॉ. ज.मा. खिलारी, ९४०५०३४८०९

(लेखक आंतरराष्ट्रीय स्तरावरील द्राक्ष शास्त्रज्ञ व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com