Agriculture Education : कृषी शिक्षणात भू-सूक्ष्म जीवशास्त्रावर द्या भर

भू-सूक्ष्म जीवशास्त्र ही स्वतंत्र शास्त्र शाखा प्रत्येक विद्यापीठात असणे गरजेचे आहे. या शास्त्र शाखेचा शेतीच्या बाकी सर्व शास्त्र शाखांशी अन्योन्य संबंध आहे.
Agricultural Education
Agricultural EducationAgrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठातून (Mahatma Phule Agricultural University) मी १९७० मध्ये प्रथम श्रेणीत कृषी पदवी उत्तीर्ण होऊन पूर्ण वेळ शेतकरी झालो. महाविद्यालयात चार वर्षे जे शिकायला मिळाले त्याचा वापर करून शेती (Agricultural) केली. तो हरितक्रांतीचा (Green Revolution) सुरुवातीचा काळ होता.

१५ ते २० वर्षे शेती चांगली पिकली, त्यानंतर उत्पादन पातळी घटू लागली. घटण्यामागील कारणांचा शोध घेण्यापोटी अनेक तांत्रिक ग्रंथांचे वाचन केले.

त्यापैकी भू-सूक्ष्म जीवशास्त्राच्या (Soil Micro Organism) ग्रंथातून उत्पादन घटीमागील कारणांचा शोध लागला. त्यावरील उपायांचा शोध लागला. शेती परत पूर्वीसारखी उत्तम पिकू लागली.

भू-सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासाने जी नवीन दिशा दिली त्याचा जगभरच्या शेतीशास्त्राच्या अभ्यासक्रमात समावेश नाही. हे सर्व संदर्भ आजतागायत अंधारात आहेत. बागायतीच्या सुविधा मोठ्या प्रमाणात या काळात उपलब्ध झाल्याने नगदी शेतीखालील प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले.

कृषिशास्त्राच्या अभ्यासक्रमात भू-सूक्ष्म जीवशास्त्र विषय फारशा मोठ्या प्रमाणात समाविष्ट नाही. यामुळे तो अडाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग खुंटतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कालसापेक्ष बदल होऊन सुधारणा होत गेल्या शेतीत मात्र काही अपवाद सोडता आपण परंपरागत तंत्राला चिकटून आहोत.

काही महिन्यांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडून अभ्यासक्रमात काही बदल करणे गरजेचे आहे. याबाबत कोणाला काही सूचना सुचवायच्या असल्यास पाठवाव्यात, असे निवेदन प्रसिद्ध झाले होते.

त्यानुसार मी वरील विषयाला अनुसरून काही बदल सुचविले होते. अभ्यासक्रमात बदल करणे न करणे, हा खूप क्‍लिष्ट विषय असावा. तूर्त यावर कोठे तरी चर्चा सुरू व्हावी. आजच्या शेतीसंबंधित सर्व प्रश्‍नांचे उत्तर अपवाद वगळता हे शास्त्र देऊ शकते.

Agricultural Education
समजाऊन घ्या भू सूक्ष्म जीवशास्त्र...

भू-सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास ः

कृषी विद्यापीठात वनस्पती विकृतिशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र अशी विद्याशाखा विकसित केली गेली ती आजतागायत तशीच आहे. यामुळे सर्वसामान्यपणे सूक्ष्मजीव म्हणजे पिकावर रोग आणणारे जीव अशी ओळख या सूक्ष्मजीवांची सर्वत्र आहे.

मात्र या विषयाच्या अभ्यासानंतर असे लक्षात आले, की रोग निर्माण करणारे जिवाणू नाममात्र आहेत. त्यामानाने शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंची गणती करता येणार नाही. कृषी पदवीधर या विषयाचा अभ्यास करीत नाही.

मी अपघाताने या विषयाकडे वळलो, त्याची शेतकऱ्यासाठी उपयुक्तता लक्षात आली. शेतीत सुधारणा करावयाची असेल, तर या शास्त्राची मदत घेणे गरजेचे आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

भू-सूक्ष्म जीवशास्त्र ही स्वतंत्र शास्त्रशाखा प्रत्येक विद्यापीठात असणे गरजेचे आहे. या शास्त्रशाखेचा शेतीच्या बाकी सर्व शास्त्र शाखांशी अन्योन्य संबंध आहे. त्यावर एकात्मिक अभ्यास होणे गरजेचे आहे.

शेतीशास्त्राच्या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली, त्या वेळी हे शास्त्र जन्माला आले नव्हते. १९१० नंतर या शास्त्राचा विकास होत गेला. पुढे या शास्त्रातील शोधाची दखल घेण्याची गरज कोणालाच वाटली नाही. त्या काळात कृषी विद्या व कृषी रसायनशास्त्राचा प्रभाव जो कृषी अभ्यासक्रमावर आहे तो आजही कायम आहे.

पीकवाढीसंबंधात आपण शेतकरी या नात्याने जी कामे करतो, त्या तुलनेत हे सूक्ष्मजीव कित्येक पटीने जास्त काम करतात. केवळ उघड्या डोळ्यांना ते दिसत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांना त्यांचे कार्य अभ्यासता येत नाही. या शास्त्राची एक स्वतंत्र तांत्रिक भाषा आहे.

ती अवगत असल्यासच हे शास्त्र अभ्यासता येते. केवळ इंग्रजीचे ज्ञान आहे म्हणून या विषयाचा अभ्यास करता येत नाही. या विषयाचा अभ्यास आज केवळ पुस्तकी स्वरूपाचा होत आहे. हा अभ्यास शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात मदत करू शकतो; याची कल्पनाच नसल्याने या अभ्यासापासून शेतकरी वंचित आहे.

भू-सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासातून शेतकऱ्यांना मदत ः

पूर्वमशागत ः

१) पारंपरिक पद्धतीत चांगली पूर्वमशागत करण्याची शिफारस आहे. यात उभी-आडवी नांगरणी, मेलपट व कुळवाच्या पाळ्या मारून जमीन पेरणीयोग्य करण्याचे काम केले जाते. पूर्वी बैलाने व पुढे पॉवर टिलर, ट्रॅक्‍टरने हे काम केले जाते. या कामासाठी पीकवार ५,००० पासून ८-१० हजार रुपयांपर्यंत ४० आरसाठी खर्च येतो.

२) जमिनीच्या पृष्ठभागावर सेंद्रिय पदार्थ कुजत ठेवला, तर सर्व पूर्वमशागतीची कामे आपोआप होतात. कोणत्याही सुधारित अवजाराने केलेल्या मशागतीच्या तुलनेत ही मशागत कित्येक पटीने उजवी असते. हे वाचून लक्षात येणार नाही. प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकणे गरजेचे आहे.

३) सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे खतात रूपांतर करण्याचे काम सूक्ष्मजीवांकडून होते. सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ खातात, मरताना मातीच्या दोन कणांमध्ये जाऊन मरतात. हा मृत सूक्ष्मजीव म्हणजेच सेंद्रिय खत. नवीन पिढीतील सूक्ष्मजीव नवीन जागेत जाऊन मरतो.

अशाप्रकारे संपूर्ण पिकाच्या मुळे वाढणाऱ्या भागात जमिनीत सेंद्रिय खत मिसळले जाते, यालाच जमिनीची जैविक मशागत असे म्हटले जाते.

४) यांत्रिक मशागतीसाठी अवजारे, इंधन, वंगण वगैरे अगर मशागतीचे भाडे असा थेट खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. जैविक मशागतीसाठी शेतामध्ये आपोआप उपलब्ध होणारा सेंद्रिय पदार्थ यावर सर्व काम चालत असल्याने ही मशागत शेतकऱ्याला फुकटात करून मिळते.

एकूण उत्पन्नापैकी खूप मोठा भाग मशागतीवर खर्च होतो. हा खर्च वाचल्यास उत्पादन खर्चात बचत होते. याला शून्य मशागत तंत्र असे म्हणतात. जगभर या तंत्रावर संशोधन व प्रत्यक्ष शेती केली जाते.

दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे व पॅराग्वे या चार देशात एकूण शेतीच्या ८० टक्के शेती या तंत्राने केली जाते. भारतातील शेतकऱ्यांना हे तंत्र शिकविणे गरजेचे वाटते.

Agricultural Education
Soil Testing : नव्या फळबाग लागवडीपूर्वी मातीचे परीक्षण गरजेचे

सेंद्रिय खत व्यवस्थापन ः

१) ज्या मानाने रासायनिक खत व्यवस्थापनाबाबत प्रबोधन केले जाते, त्या तुलनेत सेंद्रिय खत व्यवस्थापनासंबंधी फारसे बोलले जात नाही. पारंपारिक पद्धतीत एकरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले खत टाकण्याची शिफारस आहे. हे शक्‍य नसेल, तर ताग अगर धैंचाच्या हिरवळीच्या खताची शिफारस आहे. कालौघात या दोन्ही प्रमुख शिफारशीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

२) आजच्या परिस्थितीत कोणताही शेतकरी वरील शिफारशीप्रमाणे सेंद्रिय खत वापरू शकणार नाही. मग त्याला योग्य पर्यायी मार्गांची शिफारस करणे गरजेचे आहे. शिफारस अशी असावी की ती लहानापासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत कोणीही शेतकरी सहज वापरू शकला पाहिजे.

रासायनिक खत हे सेंद्रिय खताला पर्याय होऊ शकत नाही. सेंद्रिय खताचा जमीन सुपीकता व पिकाच्या वाढीत नेमका काय सहभाग आहे याबाबत आज जी माहिती दिली जाते ती फार अपुरी आहे.

३) सेंद्रिय खत नेमके कशासाठी वापरले जाते, ते कसे संपते? याची माहिती दिली जात नसल्याने त्याचे महत्त्व लक्षात येत नाही. सेंद्रिय खतात ७० ते ८० टक्के कर्ब असतो. पीक कधीही जमिनीतून कर्ब घेत नाही.

पीक प्रकाश संश्‍लेषण क्रियेत केवळ हवेतील कर्बवायूतून कर्ब घेत असते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा केवळ सूक्ष्मजीवाकडून पीकविषयक अनेक कामे करीत असता वापरला जाऊन संपतो.

४) सूक्ष्मजीवांनी सेंद्रिय खताअभावी ही कामे केली नाहीत, तर पिकाचे उत्पादन मिळू शकत नाही. आज सर्वत्र शेतीची अशीच परिस्थिती आहे. याबाबत मी तळापर्यंत जाऊन अभ्यास केला असता काही नवीन मुद्दे समोर आले.

धान्ये, कडधान्याच्या शेतीतून वैरण व पुढे शेणखत निर्माण होते; परंतु ते सर्व नगदी पिकाकडे वापरले जाते. धान्ये, कडधान्याला कधीच मिळत नाही. ही प्राधान्य क्रमाची त्रुटी संपवायची असेल तर जमिनीचा प्रत्येक तुकडा सेंद्रिय खतांबाबत स्वयंपूर्ण केला पाहिजे.

५) आजपर्यंत आपण पिकाच्या जमिनीवरील भागापासूनच सेंद्रिय खत करीत आलो आहोत, हे खत हलक्‍या दर्जाचे असते. जमिनीखालील भागापासून खत तयार करण्याची तंत्रे शेतकऱ्यांपुढे आणणे गरजेचे आहे. आमचे विना नांगरणीची शेती तंत्र याच पद्धतीचे आहे.

या खताचा दर्जा सर्वोत्कृष्ट असल्याने जमिनी जलद सुपीक करता येतात. आजपर्यंत शेतकऱ्यांना फक्त शेणखताचे महत्त्व शिकविले गेले. यासाठीचा कच्चा माल आपण पाळलेली जनावरे काय खाऊ शकतात तेथेच मर्यादित राहतो.

वनस्पती अगर प्राण्यांनी निर्माण केलेला कोणताही पदार्थ अशी व्याख्या बदलल्यास खूप मोठ्या प्रमाणावर कच्चा माल उपलब्ध होऊन सेंद्रिय खत टंचाई हा प्रश्‍न मुळातून संपून जाऊ शकतो.

Agricultural Education
Organic Farming : हिरवळीच्या खताचा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवा

६) सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी खूप मोठे मनुष्यबळ लागते. मनुष्यबळ टंचाई हा भावी काळात (आजही) शेतीपुढील सर्वांत ज्वलंत प्रश्‍न असणार आहे. कमीत कमी अगर शून्य मनुष्यबळात हे काम पार पाडणारी तंत्रे शेतकऱ्यांपुढे येणे गरजेचे आहे. चांगले कुजलेले खत टाकणे ही आपली शिफारस. या तंत्रात जमिनीबाहेर कुजण्याची क्रिया पूर्ण होते.

कुजण्याची क्रिया पीक वाढत असता जमिनीत चालू ठेवली पाहिजे. आपण उष्ण कटिबंधात शेती करतो. आपल्याकडे चांगले कुजलेले खत न वापरता कुजणारा पदार्थ शेतात मिसळणे गरजेचे आहे. दररोज नवीन खत तयार व्हावे आणि ते वापरलेही जावे.

जास्त तापमान व पूर्वमशागतीची कामे यामुळे सेंद्रिय खतांचा व्यर्थ नाश होतो. उष्ण कटिबंधासाठी खास स्वतंत्र सेंद्रिय खत व्यवस्थापनाची तंत्रे विकसित होणे गरजेचे आहे.

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८, (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com