शेतकरी नियोजन : संत्रा

शून्य मशागत तंत्रामुळे झाडाची मुळे सुरक्षित राहत असल्यामुळे फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो.
शेतकरी नियोजन : संत्रा
OranageAgrowon

शेतकरीः प्रवीण बेलखेडे

गावः वाघोली, ता. मोर्शी, जि. अमरावती

संत्रा क्षेत्रः ५ एकर

एकूण झाडेः १३०० झाडे

आमच्या कुटुंबाची ७ एकर शेती असून त्यातील पाच एकरांवर संत्रा लागवड आहे. बागेत ६ महिन्यांपासून ते ४९ वर्षे वयाची सुमारे १३०० झाडे आहेत. संपूर्ण लागवड ८ फूट बाय १६ फूट अंतरावर आहे. मी संत्रा बागेत मागील २५ वर्षांपासून शून्य मशागत तंत्राचा अवलंब केला आहे. कारण संत्रा झाडांची मुळे वरच्या भागात विकसित होतात. नांगरट व इतर मशागतीची कामे केल्यास मुळे तुटण्याची शक्यता असते. शून्य मशागत तंत्रामुळे झाडाची मुळे सुरक्षित राहत असल्यामुळे फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. तणनियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार तणनाशकांचा वापर केला जातो.

हंगाम संपल्यानंतर झाडांची छाटणी केली जाते. छाटणी करताना झाडाच्या मध्यभागात सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे यावर कटाक्षाने लक्ष दिले जाते. त्यामुळे वाळलेल्या (सल) फांद्यांचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच प्रकाश संश्‍लेषणासाठी हा पर्याय फायद्याचा ठरतो. त्यामुळे नवीन फळ फांद्यादेखील अधिक प्रमाणात तयार होतात, असा माझा अनुभव आहे.

पाच वर्षांच्या आतील झाडांसाठी बेंड पद्धतीचा अवलंब करण्यात केला आहे. अशा झाडांच्या चारही बाजूस लाकडी खुंट्या ठोकल्या जातात. झाडाच्या वरील बाजूच्या फांद्या कापडी दोरीच्या साह्याने खुंटीला बांधल्या जातात. या फांद्यावर सूर्यप्रकाश पडून त्यामध्ये जिब्रॅलिकचे प्रमाण वाढते. त्यातून नवे फुटवे निघतात. नवीन फळफांद्या वाढून उत्पादनात वाढ होत असल्याचे माझे निरीक्षण आहे.

आंबिया बहराचे नियोजनः

 • बहर धरण्यासाठी साधारण १५ डिसेंबरला बाग ताणावर सोडली. हा ताण ३० डिसेंबरच्या दरम्यान ठिबकद्वारे पाणी देत तोडला.

 • डीएपी ९०० ग्रॅम, पोटॅश ४०० ग्रॅम, कॅल्शिअम नायट्रेट ७५ ग्रॅम, मॅग्नेशिअम ७५ ग्रॅम, फेरस सल्फेट १०० ग्रॅम, झिंक सल्फेट ५० ग्रॅम याप्रमाणे प्रतिझाड मात्रा दिली.

 • फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १९ः१९ः१९ ची ठिबकद्वारे मात्रा दिली.

 • तसेच दर १५ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे २५० ग्रॅम युरियाची प्रतिझाड मात्रा दिली.

 • उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. पाच वर्षांच्या वरील झाडांना १५० ते २०० लिटर आणि त्याखालील झाडांना ५० ते १५० लिटर पाणी ठिंबकद्वारे प्रतिदिन दिले.

 • मागील ८ दिवसांत तणांचा प्रादुर्भाव पाहून आवश्यकतेनुसार तणनाशकांची फवारणी केली आहे.

आगामी नियोजनः

 • सध्या बागेतील झाडांवर लिंबू आकाराची फळे लगडली आहेत.

 • पावसाळा सुरू होण्यापूर्वी फायटोप्थोरा नियंत्रणासाठी झाडांच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावली जाईल.

 • डीएपी ८०० ग्रॅम, पोटॅश ३५० ग्रॅम, कॅल्शिअम नायट्रेट ७५ ग्रॅम, मॅग्नेशिअम ७५ ग्रॅम, फेरस सल्फेट १०० ग्रॅम आणि झिंक सल्फेट ५० ग्रॅम याप्रमाणे प्रति झाड मात्रा दिली जाईल.

 • पाऊस सुरू झाल्यानंतर झाडांवर नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होईल. या काळात कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने सिट्रस सायला, मावा, तुडतुडे आदींचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यासाठी बागेतील झाडांचे वेळोवेळी निरीक्षण करून शिफारशीप्रमाणे फवारणी केली जाईल.

 • पावसाची अंदाज घेत सिंचनाचा कालावधी कमी केला जाईल. साधारणपणे जून महिन्याच्या शेवटी झाडांना ८ दिवसांचा पाण्याचा ताण दिला जाईल. त्यामुळे संपूर्ण बागेत एकाचवेळी नवती फुटण्यास मदत होईल.

 • आवश्यकतेनुसार तणांचा प्रादुर्भाव पाहून तणनाशकांचा वापर केला जाईल.

उत्पादन अन् विक्रीः

 • मागील हंगामात १३०० झाडांपासून सुमारे १८० टन संत्रा फळांचे उत्पादन मिळाले.

 • फळांची तोडणी ५ टप्प्यांमध्ये केली. टप्प्याटप्प्याने फळे तोडल्यामुळे मालाची प्रत चांगली मिळाली.

 • दरवर्षी उत्पादित सर्व फळांची खासगी कंपनीला विक्री केली जाते. या वर्षी प्रतिकिलो सरासरी १८ ते ४० रुपये दर मिळाला.

- प्रवीण बेलखेडे, ९४२००७५२२४

(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com