शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शेतमाल विक्री व्यवस्थापन

कृषिमाल विक्री करिता पुरवठा साखळीतील बाजारपेठांचे जाळे व व्यवस्था यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतीमालाच्या बाजार भावाकरीता ग्राहक ते शेतकरी आणि शेतकरी ते ग्राहक अशा दोन्ही परिस्थितीचा किंवा त्यातील पुरवठा साखळीचा सुद्धा विचार होणे गरजेचे असते.
Farmer Producer Company
Farmer Producer CompanyAgrowon

शेतीमाल विक्री व्यवस्थापन हा अत्यंत जिव्हाळ्याचा तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. विक्री कौशल्य, मूल्य साखळी व त्यानुसार अंगभूत कौशल्य निर्मिती याकरिता व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

१) शेतमाल विक्रीसाठी विविध साखळ्या उपलब्ध आहेत, जसे की अन्न व कृषी प्रक्रिया उद्योग, घाऊक व किरकोळ विक्री इतर ग्राहकाभिमुख वितरण साखळ्या, संस्थात्मक विक्री इ. शेतकरी वर्गाची प्राथमिक उत्पन्न मिळविण्याची संधी ही सुरवातीच्या विक्रीच्या टप्प्यापर्यंतच मर्यादित असते. म्हणजेच एजंट किंवा जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या परंतु ही विक्री व्यवस्था नेहमीच विक्रीचा चांगला किंवा योग्य पर्याय असू शकत नाही.

२) शेतकऱ्यांनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी किंवा सहकारी संस्थांनी यापुढील टप्प्यात म्हणजेच घाऊक बाजारात थेट विक्री किंवा प्रक्रिया उद्योगाला थेट विक्री असा पर्याय निवडणे किंवा सद्यःस्थितीत ज्या टप्प्यावर शेतमाल विकला जातो, त्याच्या पुढील टप्प्यावर शेतमाल विक्रीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

३) कृषिमाल विक्री करिता पुरवठा साखळीतील बाजारपेठांचे जाळे व व्यवस्था यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी रचना केलेल्या बाजारपेठा वर्तमानातील परिस्थिती आणि या पुढील काळात उदयोन्मुख अर्थव्यवस्था या करिता कमी पडल्याचे दिसून येत आहे. शेतमाल काढणीनंतर योग्य बाजार भावाच्या अनुषंगाने पारंपरिक बाजाराव्यतिरिक्त शेतकरी वर्गाला पर्यायी बाजार व्यवस्था उपलब्ध नसल्याने कमी बाजार भाव असेल तरीही शेतमाल विक्री करावी लागते. याकरिता स्पर्धा निर्माण होण्याच्या अनुषंगाने पर्यायी बाजार व्यवस्था व त्याकरिता आवश्यक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे.

४) सद्यःस्थितीतील मार्केट यार्ड किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्या परिपूर्ण व परिणामकारक नसून त्यांच्या मार्फत दूरस्थ ठिकाणांवरील शेतकरी वर्गाला विक्रीच्या सेवा मिळू शकत नाहीत. याकरिता नवीन बाजारपेठांची निर्मिती करणे आवश्यक असून राष्ट्रीय कृषी बाजार उभारून बाजारपेठांची संकुचित अवस्था दूर करणे आवश्यक आहे.

५) शेतमाल विक्रीच्या या पुढील अध्यायात ग्राहकाच्या बदलत्या खाण्याच्या सवयी, बाजाराभिमुख विक्री व्यवस्थापन, बाजाराभिमुख उत्पादनासोबतच जीवनसत्त्व पुरविणाऱ्या किंवा पोषण देणाऱ्या शेतमालाचा पुरवठा करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यापुढील काळात बाजार व्यवस्थापनामध्ये शेतकरी वर्गाची शेतमाल लागवडी सोबतच निर्णय घेण्याची क्षमता बाजारपेठेतील उपलब्ध माहितीवर अवलंबून असल्याने अशा माहिती पुरवठादार यंत्रणांची निर्मिती होत असून त्यावर आणखी मोठया प्रमाणावर कामकाज होणे ‍अपेक्षित आहे. शेतकरी वर्गाने काय पिकवावे, केव्हा पिकवावे, कोठे विकावे आणि त्यानुसार त्याला लागवड व विक्री यासाठी येणारा खर्च यामध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी बाजार व्यवस्थापन व क्षमता बांधणी यंत्रणेची आवश्यकता भासणार आहे. पुढील काळात विक्री व्यवस्थापन हा कृषी क्षेत्रातील शेतमाल लागवडीपेक्षा महत्त्वाचा व कळीचा मुद्दा मानला जाणार आहे.

६) शेतमाल उत्पादनानुसार विक्रीपेक्षा मागणीनुसार गुणवत्तापूर्ण कृषी मालाचे उत्पादन करणे अत्यंत आवश्यक असून तीच आजची गरज आहे. भारत ही शेतीमालासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उपलब्ध आहे आणि बाजारपेठेने देशातील सर्व उपभोक्ता व शेतकरी यांना एक विक्री व्यवस्था / प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करणे आवश्यक आहे.

७) कृषी विपणन या संज्ञेची व्याप्ती मोठी असून यामध्ये कृषी निविष्ठा व शेतीमाल यांचा पुरवठा यांचा विचार केलेला आहे. यामध्ये संपादन, संकलन, प्रतवारी, साठवणूक, अन्न आणि शेतमाल प्रक्रिया, वाहतूक, आर्थिक साहाय्य आणि शेतमाल विक्री यांचा समावेश होतो. कृषी विपणनामध्ये शेतमाल लागवडीपूर्वी आणि लागवडी नंतरच्या सर्व कार्याचा समावेश होतो जसे की, कृषी निविष्ठा व शेतमाल पुरवठा साखळी, वाहतूक, अन्न आणि अन्नाव्यतिरिक्त प्रक्रिया, वितरण, किरकोळ विक्री इत्यादी सर्व प्रकारचे कृषी व्यवसाय यामध्ये सद्यःस्थितीत वेगवेगळ्या स्वरूपात स्वतंत्र व्यवसाय निर्मिती झालेली आहे.

८) शेतीमालाचे बाजारभाव शेतकरी वर्गाला समजण्याच्या अनुषंगाने मार्केटिंग इंटेलिजन्स सारख्या व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. कारण शेतीमालाच्या बाजार भावाकरिता ग्राहक ते शेतकरी आणि शेतकरी ते ग्राहक अशा दोन्ही परिस्थितीचा किंवा त्यातील पुरवठा साखळीचा सुद्धा विचार होणे गरजेचे असते.

९) शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बाजारपेठ उभारणीच्या अनुषंगाने कृषी विपणन व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी वर्ग/ सभासदांना शेतमाल पिकविण्यासाठी योग्य माहितीचे सादरीकरण करणे आवश्यक आहे. यामध्ये मागणी असणाऱ्या शेतमालाची गुणवत्ता, प्रतवारी व बाजारास आवश्यक शेतमालाचे वर्णन सादर करावे. यासोबतच या शेतमालाची पुरवठा साखळी कशाप्रकारे असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती देऊन त्याप्रमाणे नियोजन कंपनी व्यवस्थापनाने शेतकरी वर्गाकडून करून घ्यावे.

१०) कृषी विपणनाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत जसे की, करार शेती, शेती जमीन भाड्याने घेणे, कमोडिटी फ्युचर व ऑप्शन्स इत्यादीचे व्यवहार वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांचे फेडरेशन्स, इंडस्ट्रिअल शेतीतील कार्यरत संस्था करू शकतात.

संपर्क ः प्रशांत चासकर,९९७०३६४१३०

(राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ञ,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com