Weedicide : शेतकऱ्यांनो, तणनाशकांचा अभ्यास करा...

एखादे रसायन कितीही चांगले असले तरीही त्याच्या वापरातून मानवी आरोग्याला धोका नाही अशी पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्या रसायनाला बाजारात विक्रीचा परवाना दिला जात नाही.
Herbicide
Herbicide Agrowon

एखादे रसायन कितीही चांगले असले तरीही त्याच्या वापरातून मानवी आरोग्याला धोका नाही अशी पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्या रसायनाला बाजारात विक्रीचा परवाना दिला जात नाही. तणनाशके (Weedicide ) ही याला अपवाद नाहीत. तणनाशकांचा वापर (Use Of Weedicide) करताना शेतकऱ्यांनी अनुभवातून काही गोष्टी शिकणे गरजेचे आहे.

Herbicide
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

तण विज्ञान शास्त्र विषयाच्या माध्यमातून तणविषयक संशोधन चालू असते. पूर्वी तणनियंत्रण मजूर लावून केले जात होते. आता परदेशात फक्त दोन टक्के लोक शेती करतात. त्यांच्या शेतीचे क्षेत्र प्रचंड मोठे आहे. यामुळे प्रथम यंत्राने आणि आता रसायनांच्या वापरातून तणनियंत्रणाचा शोध लागला.

रासायनिक तणनियंत्रणाला २,४ डी च्या शोधाने १९४६ मध्ये सुरुवात झाली असे म्हटले जात असले, तरीही त्यापूर्वी काही असेंद्रिय रसायनांचा वापर तण नियंत्रणासाठी करण्यात आले होते. १९४६ नंतर सेंद्रिय तणनाशकांचा वापर सुरू झाला. ही तण नियंत्रणाची सर्वांत सोपी सुलभ पद्धत असल्याने या तंत्रावर पुढे वेगाने संशोधन होत गेले. पुढे रसायनांच्या वापराचे दुष्परिणाम मानवाचे आरोग्यावर होतात असे लक्षात आल्यानंतर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक रसायनांच्या अभ्यासाला सुरुवात झाली.

पुढे एखादे रसायन कितीही चांगले असले तरीही त्याच्या वापरातून मानवी आरोग्याला धोका नाही, अशी पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्या रसायनाला बाजारात विक्रीचा परवाना दिला जात नाही. तणनाशके ही याला अपवाद नाहीत. नुकतेच ग्लायफोसेट या तणनाशकावर सरकारने बंदी आणली आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा रसायनांचा कसा अभ्यास केला जातो याची माहिती सर्वसामान्य जनतेचे पुढे येणे गरजेचे आहे. “प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स” या ग्रंथातून याबाबतची माहिती उपलब्ध होते. १९८३ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात ग्लायफोसेट विषयी सर्व माहिती मिळते.

तणनाशकांच्या संदर्भाने रसायनाचे तणातील शोषण, त्याचा तणाचे विविध भागांत प्रसार, शोषण झाल्यानंतर त्यावर होणाऱ्या प्रक्रिया, सूर्यप्रकाशामुळे होणारे विघटन, सूक्ष्मजीवांमुळे होणारे विघटन, रासायनिक विघटन, तणनियंत्रणाचे कार्य आणि तणनाशकाचा वेगवेगळ्या वनस्पतीवर होणारे परिणाम याचा अभ्यास केला जातो.

विविध चाचण्यांत उत्तीर्ण झाल्यानंतर रसायन बाजारात प्रवेश करू शकते. १९७६ मध्ये अमेरिका आणि १९८५ च्या दरम्यान भारतीय बाजारपेठेत त्याचा प्रवेश झाला. प्रवेश झाल्यानंतर परदेशात ४७ आणि भारतात ३७ वर्षांनंतर या तणनाशकाचे मानव व जमिनीवर वाईट परिणाम होतात असे लक्षात आल्याने त्यावर बंदी फक्त भारतात घालण्यात आली, जगात इतरत्र कोठेही नाही. आता वरील अभ्यासाची ओळख करून घेऊयात.

Herbicide
Zero tillege : नांगरणीविना शेतीमधील तणनाशक वापराचे अनुभव

तणनाशकाचे शोषण आणि प्रसार

ग्लायफोसेट तणावर फवारल्यानंतर प्रामुख्याने त्याचे पानातून शोषण होते. त्यातही पूर्ण वाढ झालेल्या पानातून जास्त शोषण होते. तेथून पानात तयार झालेली अन्नद्रव्य इतरत्र पसरण्याच्या प्रक्रियेतून सर्व वनस्पतीत तणनाशक पसरते. ते मूळ आणि त्यातही कंद असल्यास त्यात जास्त प्रमाणात साठवले जाते. दमट हवा व सामान्य तापमानात यांचे शोषण जास्त चांगल्या प्रकारे होते. मुळे, खोड, पाने, या क्रमाने वनस्पतीची वाढ खुंटते आणि ती मरते.

शोषणानंतरच्या प्रक्रिया

ग्लायफोसेट शोषणानंतर त्याचे अमिनो मिथाईल फॉस्फोनिक आम्ल या स्वरूपात वनस्पतीमध्ये भिनते. संशोधन असे सांगते, की पीक उत्पादनात (फळे अगर धान्ये, कडधान्ये) वनस्पतीचा इतर भागांच्या तुलनेत याचे अंश अत्यल्प राहतात. या आम्लाचे पुढे विघटन होऊन कर्ब वायू अधिक पाणी या स्वरूपात त्याचे अंश संपून जातात.

सूर्यप्रकाशामुळे होणारे विघटन

सूर्यप्रकाशामुळे ग्लायफोसेटचे विघटन फारसे होत नाही, असे निष्कर्ष असले तरीही या तत्त्वाचा परिणाम समशीतोष्ण व शीत कटिबंधात जास्त होतो. त्या मानाने उष्णकटिबंधात सूर्यप्रकाशामुळे विघटनाचा वेग तुलनात्मक जास्त असतो. हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

Herbicide
Glyphosate : ग्लायफोसेट जगभरात चर्चेत राहिलेले तणनाशक

सूक्ष्मजीवांमुळे होणारे विघटन

ग्लायफोसेटचे विघटन होऊन कर्बवायू आणि पाणी होते. ही क्रिया प्रामुख्याने सूक्ष्मजीवांकडून पार पाडली जाते. जमिनीचा सामू, आर्द्रता, तापमान, विघटन होऊ शकणारे पदार्थ आणि सूक्ष्मजीवांच्या अन्नाच्या उपलब्धतेचा ग्लायफोसेटच्या विघटनावर परिणाम होतो. या ठिकाणी विघटन होऊ शकणारे पदार्थ याचा अर्थ कुजलेले खत नव्हे. कुजणारा पदार्थ असा आहे. पुस्तकात सबस्ट्रेट असा उल्लेख आहे म्हणजे जिवाणूंचे खाद्य. कुजविणाऱ्या जिवाणूंच्या खाद्याच्या कुजविण्याच्या क्रियेतून अनेक सेंद्रिय आम्ल तयार होतात. त्यातून जमिनीतील बहुतेक अपविष्ट पदार्थांचे विघटन होऊन ती संपून जातात.

संशोधनाचे संदर्भ असे आहेत, की पहिल्या ३२ दिवसांत हलक्या जमिनीत ४० टक्के, मध्यम ९.५ टक्के, तर जड जमिनीत ३ टक्के ग्लायफोसेटचे कर्ब वायू आणि पाणी असे रूपांतर होते. लोह व अल्युमिनियमच्या कणांवर ग्लायफोसेटचे कण चिकटून राहिल्याने विघटनाचा वेग मंदावतो. सर्वांत जास्त विघटन सूक्ष्मजीवांमुळेच होते, १२० दिवसांत अंदाजे ९० टक्के ग्लायफोसेटच्या विघटनामुळे जमिनीत कर्बवायू, नायट्रेट व फॉस्फरिक आम्लाचे प्रमाण वाढते

रासायनिक विघटन

ग्लायफोसेटचे रासायनिक विघटन होऊन कर्बवायू, अमोनिया व फॉस्फरिक पाणी असे पदार्थ तयार होतात. ज्या जमिनीत रसायनांचे स्थिरीकरण व विजातीय विद्युत भारामुळे चिकटून राहण्याचे प्रमाण जास्त असते तेथे विघटनाचा वेग कमी राहतो. कमी सामू व सेंद्रिय कर्ब भरपूर असणाऱ्या जमिनीत वरील कारणाने विघटनाचा वेग कमी राहतो. जमिनीत असणाऱ्या सोडिअम व कॅल्शिअमचाही विघटनावर परिणाम होतो.

तण मारण्याचे कार्य

ग्लायफोसेटमुळे पानांच्या आतील पेशी आणि हरितद्रव्यावर परिणाम होतो. पाने पिवळी पडू लागतात. हरितद्रव्याबरोबर त्याचा जोडीदार कॅरोटीनवर परिणाम होतो. कॅरोटीनचे प्रमाण हरितद्रव्याच्या तुलनेत जास्त वेगाने कमी होते. वनस्पतीच्या सर्व शरीर क्रियांवर परिणाम होतो. कर्बवायूचे शोषण बंद होते, तसेच प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते. प्रथिने तयार होणे, आरएनए, लिपिड, श्‍वासोच्छ्ववास अशा सर्व क्रिया मंदावतात. पानात शोषले गेलेले तणनाशक अन्नरसाद्वारे सर्व भागांत तसेच प्रामुख्याने मुळापर्यंत जाते. यामुळे अन्नशोषणाचे कार्य थांबते. यामुळे वनस्पती (तण) मरते.

वेगवगळ्या वनस्पतीवर होणारे परिणाम

वेगवेगळ्या तणनाशकाचे परिणाम वेगवेगळ्या वनस्पतीवर बदलत जातात. एकच पीक अगर तणाचे वेगवेगळ्या जातीवरील परिणाम वेगवेगळे असतात. निसर्गातील काही घटकांच्या परिणामामुळेही हे घडू शकते. काही आनुवंशिक गुणधर्मामुळे देखील परिणाम बदलू शकतात. एकच तणनाशक सतत वापराने पीक अगर तणामध्ये प्रतिकारता निर्माण होऊ शकते. यासाठी एकाच प्रकारच्या तणनाशकाचा वापर सातत्याने करू नये.

ग्लायफोसेटसारखे अनिवडक गटातील मुळापर्यंत काम करणारे एकमेव तणनाशक असल्याने त्याच्या परिणामकारकतेमध्ये कमी होणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यासाठी शेतकऱ्यांनी अनुभवातून काही गोष्टी शिकणे गरजेचे आहे. भारतात तणावर संशोधन करण्याचे काम जबलपूर (मध्य प्रदेश) येथील संशोधन संस्थेमध्ये चालते. तेथून तणनियंत्रणावरील संशोधनाबाबत मार्गदर्शन केले जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com