तुरीमधील वांझ रोग बाधित क्षेत्रातील निष्कर्ष...

गेल्या वर्षी खरीप हंगामात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये तूर पीक स्टरिलिटी मोझॅक रोगाच्या मोठा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे पीक उत्पादनात घट झाली. येरळा प्रकल्प सोसायटीने या रोगामुळे तूर उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यातील काही महत्त्वाचे निष्कर्ष यंदाच्या हंगामासाठी मार्गदर्शक ठरमारे आहेत.
Tur
TurAgrowon

डॉ. बी. एम. जमदग्नी, डॉ. बी. पी. पाटील

---------------------

जत तालुक्यातील (जि. सांगली) सोळा गावामध्ये गेल्यावर्षी तूर पिकाचे स्टरिलिटी मोझॅक रोगाचा प्रादुर्भावाने मोठे नुकसान झाले. या रोगाच्या सर्वेक्षणासाठी सोळा गावातील १२० शेतकरी निवडण्यात आले. यामध्ये सर्वाधिक बाधित शेतकरी हे तिकोंडी गावातील (१३) होते. त्या खालोखाल पाठोसरी (११), लवंगा आणि जालिहाळ (१०), करजगी, बेलोडगी आणि बोर्गी (खू) (२०) तसेच बोर्गी (बू), लवंगा, गिरगाव (२०) अशी शेतकऱ्यांची संख्या होती. याचबरोबरीने आक्कलवाडी, पाठोसरी, मोटेवाडी, खंदणाळ, जालिहाळ येथील एकूण ४२ (३४.९९%) तसेच तिकोंडी, करेवाडी, आसन्गी तुर्क, को. बोबलाद आणि कोनबगी मिळून ३८ (३१.६%) शेतकरी संख्या होती. या सर्वेक्षणासाठी नारायण देशपांडे, मुकुंद वेलापूरकर, अपर्णा कुंटे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांची चांगली मदत झाली.

१) बाधित तूर क्षेत्राचे विश्‍लेषण ः

- बाधित क्षेत्रापैकी २१.६६ टक्के शेतकरी दोन एकरांपेक्षा कमी आणि ६५.७३ टक्के शेतकरी २ ते ४ एकर आणि १२.४९ टक्के शेतकरी ४ एकरांपेक्षा अधिक क्षेत्रधारक होते.

२) क्षेत्रातील जातींची लागवड ः

- बाधित क्षेत्रामध्ये ६२.४९ टक्के पिंक जात, ३४.९९ टक्के गुल्ल्याळ जातीची लागवड होती. याचबरोबरीने कावेरी, दुर्गा, पीकेव्ही या जातींची लागवड या भागात दिसून आली.

- रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी येत्या काळात रोगप्रतिकारक जातींची लागवड करणे आवश्यक आहे.

३) पेरणीचा कालावधी ः

- रोग बाधित क्षेत्रात १५ टक्के पेरणी १५ जूनपूर्वी आणि ५१.६६ टक्के पेरणी १६ ते ३० जून दरम्यान झाली होती.

- एक जुलै ते १५ जुलैमध्ये १९ टक्के आणि १६ जुलै नंतर १९ टक्के पेरणी झाली.

- सुमारे ६६ टक्के पेरणी जून महिन्यात आणि ८६ टक्के पेरणी १५ जुलैपूर्वी झाली.

४) बीजप्रक्रिया आणि पेरणी ः

- केवळ २३ टक्के शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केली होती.

- रोगबाधित क्षेत्रामध्ये ८५ टक्के शेतकऱ्यांनी ३ ते ४ फूट अंतराने पेरणी केली होती.

५) रासायनिक खतांचा वापर ः

- सर्वेक्षण केलेल्या गावातील ५२ टक्के शेतकरी डीएपी, १८ टक्के शेतकरी डीएपी अधिक युरिया, १६ टक्के शेतकरी डीएपी अधिक १०:२६:२६ आणि ८ टक्के शेतकरी डीएपी अधिक १९:१९:१९ खतांचा वापर करतात.९ टक्के शेतकरी तुरीला खते वापरत नाहीत,असे दिसून आले.

६) पाणी व्यवस्थापन ः

- सर्वेक्षण केलेल्या भागातील सुमारे ४२ टक्के शेतकरी तुरीला पाणी देत नव्हते.

- २१ टक्के शेतकरी एक वेळ आणि २५ टक्के शेतकरी दोन वेळा पाणी देतात.

७) कीड, रोग नियंत्रणासाठी अवलंब ः

- बाधित क्षेत्रात ४४ टक्के शेतकऱ्यांनी एक वेळ, ३४ टक्के शेतकऱ्यांनी दोन वेळा कीडनाशकांची फवारणी केली होती.

- नऊ टक्के शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी केली नव्हती.

८) रोग प्रादुर्भाव होण्याची कारणे ः

- सुमारे ४२ टक्के शेतकऱ्यांनी सतत पडणारा पाऊस, जमिनीतील ओलावा, अधिक आद्रता तसेच इरियोफाईड कोळी आणि विषाणू प्रसारक किडींसाठी पोषक हवामान झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले.

- २१ टक्के शेतकऱ्यांनी बियाणे दोष, १४ टक्के शेतकऱ्यांनी धुके आणि दव तसेच ९ टक्के शेतकऱ्यांनी हवामान बदलाचे कारण सांगितले.

- ही निरिक्षणे लक्षात घेता रोग प्रतिकारक जातींची लागवड महत्त्वाची आहे, हे लक्षात आले.

९) रोगाचा प्रादुर्भाव नसताना अपेक्षित उत्पादन

- रोग बाधित तूर क्षेत्रात ६१ टक्के शेतकरी एकरी २ ते ५ क्विंटल आणि ३३ टक्के शेतकरी ५ ते ७ क्विंटल उत्पादन अपेक्षित करीत होते. केवळ ११ टक्के शेतकरी एकरी ७ क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित करीत होते.

- केवळ ८.३३ टक्के शेतकरी रोग बाधित तुरीचे अपेक्षित उत्पादन एकरी एक क्विंटलहून कमी घट दर्शवितात. ४१.६६ टक्के शेतकऱ्यांनी एकरी १ ते २ क्विंटल उत्पादन घट सांगितली.

- ७०.८ टक्के शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा १ ते ४ क्विंटल घट दिसून आली. ९ टक्के शेतकऱ्यांना एकरी ५ ते ७ क्विंटल, ४ टक्के शेतकऱ्यांना एकरी ७ क्विंटलपेक्षा अधिक घट दिसली.

१) पेरणी तारखांचा परिणाम ः

- १ ते १५ जूनदरम्यान पेरलेल्या तुरीचे उत्पादन एकरी ३.१ क्विंटलने घटले. १६ ते ३० जून दरम्यानच्या पेरणीमध्ये एकरी ३.४ क्विंटल घट दिसली. जून पेरणीची सरासरी घट एकरी ३.२५ क्विंटल झाली.

जुलैमधील पेरणीची सरासरी एकरी घट २.३ क्विंटल झाली. लवकर पेरणी केलेल्या पिंक व गुल्याळ जातींमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसला. जुलैमधील पेरणीमध्ये उत्पादनात घट कमी झाली.

- लवकर पेरणीमुळे फुलोरा येताना वाढलेला ओलावा आणि आद्रता रोगास अनुकूल ठरली. उशिरा म्हणजे जुलै पेरणीसाठी ओलावा आणि आर्द्रता फुले येताना कमी होती.

२) लागवडीच्या अंतराचा परिणाम ः

- रोग बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी तुरीची ३,४,५,६ फूट अंतराने पेरणी केली होती. रोपांची संख्या बदलत असल्याने उत्पादनात बदल होतो. पिकाच्या कमी अधिक घनतेमुळे सूक्ष्म हवामान बदलते आणि कीड, रोग प्रादुर्भावाचे प्रमाण बदलते.

- रोगबाधित क्षेत्रात ३ फुटांनी पेरणी केलेल्या क्षेत्रात एकरी सरासरी २.२८ क्विंटल उत्पादनात घट झाली.

- ४ फूट अंतराने पेरणी केलेल्या क्षेत्रात एकरी ३.७७ क्विंटल आणि ३ फुटांपेक्षा जास्त अंतराने पेरणी केलेल्या क्षेत्रामध्ये उत्पादन घट ६५.३ टक्के जास्त होती.

- ५ फूट अंतराने पेरणी केलेल्या क्षेत्रात एकरी ५.८६ क्विंटल उत्पादन घट झाली.

- रोग बाधित क्षेत्रात तुरीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी ३ फुटांपेक्षा अधिक अंतराने पेरणी टाळावी.

- अलीकडे यंत्राने शेंगा असलेल्या फांद्यांची कापणी केली जाते. पक्व अवस्थेत अवकाळी पाऊस झाल्यामुळे अशा कापणी केलेल्या पिकास फुटवे आल्याने रोगवाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले. हे टाळण्यासाठी फुटव्यापूर्वी पीक अवशेषांची पूर्ण काढणी करून शेत नांगरणे आवश्यक आहे.

- रोग प्रतिकारक जाती, जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा एकात्मिक अवलंब, वेळेवर कीड, रोग नियंत्रणातून तुरीचे अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य आहे, असे या सर्वेक्षणात दिसून आले.

---------------------------------

संपर्क ः डॉ.बी.पी.पाटील, ७३५०३६०२१३

(लेखक कृषी तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com