भातशेतीसह मत्स्यशेती तंत्रज्ञान

भात आणि मासे एकमेकांना पूरक आहेत. भाताच्या खाचरातील पाण्यामध्ये मासे वाढू शकतात. भात शेतीच्या बांधामध्ये साधारणपणे ९ ते १२ इंचापर्यंत पाणी कायम ठेवण्याची पद्धत आहे. या पाण्याचा उपयोग मत्स्य शेतीकरिता केल्यास भात शेतीतील उत्पन्नासोबत मत्स्य उत्पादन घेता येते.
Paddy With Fish Farming
Paddy With Fish FarmingAgrowon

किरण वाघमारे, जयश्री शेळके

जपान, चीन, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये भातशेती खाचरातील पाण्यात मस्त्यपालन (Fish Farming) केले जाते. अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी भातासोबत मत्स्यपालन केले जाते. केरळ आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, ओरिसा, पश्‍चिम बंगाल या राज्यामध्ये भातशेती सोबत मत्स्यशेती पद्धत थोड्याफार फरकाने मोठ्या प्रमाणात वापरात आहे. या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केल्यावर असे दिसून आले आहे, की काही विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये भाताच्या खाचरात मासे पाळणे हा अत्यंत किफायतशीर उपक्रम होऊ शकतो.

महाराष्ट्रातील कोकणात व विदर्भातील गडचिरोली, भंडारा हे मोठ्या प्रमाणात भात उत्पादक (Paddy Producing) प्रदेश म्हणून ओळखले जातात. कोकण व विदर्भातील काही ठिकाणी दुबार भात पीक घेतले जाते. तसेच पुणे व इतर जिल्ह्यांतील काही भागांत भात शेती केली जाते. कोकण व विदर्भातील सरासरी पावसाचे प्रमाण जास्त आहे. भात आणि मासे एकमेकांना पूरक असून, भाताच्या खाचरामध्ये साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये मासे वाढू शकतात. भात शेतीच्या बांधामध्ये साधारणपणे ९ ते १२ इंचापर्यंत पाणी कायम ठेवण्याची पद्धत आहे. या पाण्याचा उपयोग मत्स्य शेतीकरिता केल्यास भात शेतीच्या उत्पन्नासोबत मत्स्य उत्पादन घेता येते.

भातशेतीमध्ये मत्स्यपालनः

१) बाह्य चौकोन चर पद्धती :

- शेताच्या चारही बाजूंनी जागा करून त्यामध्ये पाणी साठवून मासे सोडले जातात. मध्य भागात भाताची लागवड केली जाते.

२) अंतर्गत चौकोन पद्धती :

- शेतीच्या मधल्या भागात लहान तळ्यासारखा आकार देऊन बाकीच्या शेतीचे चार भागामध्ये विभाजन करून त्यात भात लागवड केली जाते.

३) बाजू चर पद्धती :

- हा प्रकार पहिल्या प्रकाराशी बराच साम्य आहे. यात शेतीच्या चार पैकी दोन बाजूंस चर (खड्डा) खोदून त्यात मासे सोडले जातात. आतील भागांत भात लागवड केली जाते.

भात आणि माशाच्या जातींची निवडः

१) भात आणि माशाची जात ही संबंधित ठिकाणांवरील हवामानानुसार ठरवावी. शेतामध्ये भाताची घनता ही ४० ते ६० किलो प्रति हेक्टर इतकी आहे. लागवड करताना भाताच्या रोपांमध्ये प्रत्येकी १५ ते २० सेंटिमीटर इतके अंतर ठेवावे.

२) मत्स्य बोटुकलीची घनता ४,००० ते ६,००० प्रति हेक्टरी इतकी असावी.

३) भात आणि मासे संवर्धन पद्धतीचा कालावधी हा साधारणतः चार ते सहा महिन्यांचा असतो.

४) भाताचे दुसरे पीक घेताना जमिनीची नेहमी प्रमाणे मशागत काळजीपूर्वक करून रोप लागवडीनंतर पाणी घेतल्यावर खडयातील मासे परत सर्वत्र भात शेतीत मुक्तपणे फिरू शकतात. भात कापणीच्या वेळी पाणी कमी करावे लागते अशावेळी मासे परत खड्यात सोडावेत.

५) भाताची दोन्ही पिके साधारणपणे १२० ते १४० दिवसांची असावी. माशांच्या वाढीकरिता हा काळ चांगला आहे. दरम्यान, माशांची वाढ साधारणतः १ ते १.५ किलोपर्यंत होते.

६) भात शेतीमध्ये मत्स्यपालनासाठी सायप्रिनस जातीचे मासे निवडावेत. या माशांची जमीन पोखरण्‍याची सवय असते. भाताच्या मुळाशी सतत माती उकरल्याने मुळांना भरपूर प्रमाणात खतासोबत प्राणवायू मिळून वाढ झपाट्याने होते.

७) आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यात केलेल्या प्रयोगानुसार भात आणि मत्स्यशेतीमुळे भाताच्या उत्पन्नात २ ते ३ पटीने वाढ झाल्याचे दिसून येते.

८) पावसामुळे खाचरामध्ये जास्त पाणी भरल्यास बांधाला धोकादायक असते त्यामुळे बांधाचे नुकसान होऊ नये याकरिता पाणी बाहेर काढण्याच्या ठिकाणी जाळी लावून घ्यावी. तसेच पाणी आत घेण्याच्या व बाहेर काढण्याच्या ठिकाणी जाळीची चौकट बसवावी म्हणजे भात खाचरातील मासे बाहेर जाणार नाहीत.

भात मत्स्यशेतीसाठी उपयुक्त मासे-

१. सायप्रिनस, तिलापिया, मृगळ किंवा भारतीय प्रमुख कार्प (कटला, रोहू, मृगळ) मासे उपयुक्त ठरतात.

२. ५० ते १०० मि.मी. बीजाची साठवणूक करणे अतिशय योग्य आहे.

३. प्रति हेक्टरी ५००० नग बीजाची साठवणूक करू शकतो.

भात मत्स्यशेतीचे फायदेः

१. भात उत्पादनात २ ते ३ पटीने वाढ.

२. भात उत्पन्नाबरोबरच मत्स्योत्पादन.

३. अत्यंत कमी खर्चात पौष्टिक आणि प्रथिनयुक्त खाद्याची निर्मिती करता येते.

४. मासे वाढीकरिता वेगळे खत टाकावे लागत नाही. माशांच्या विष्टेमुळे इतर खताची जास्त गरज नसते. मासे किडे आणि अळी खात असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात रहातो.

भात मत्स्यशेतीत महत्त्वाच्या बाबीः

१. भाताच्या रोपांची लागवड पूर्ण झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी भात खाचरात बोटुकली सोडावी.

२. शक्य असल्यास माशांना पूरक खाद्य वजनाच्या २ टक्के या प्रमाणात दररोज २ वेळा देण्यात यावे.

३. वापरण्यात येणाऱ्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असावी.

४. त्या भागातील पाऊस हा ८०० मिमी पेक्षा जास्त असावा किंवा आवश्यक अतिरिक्त पाण्याची व्यवस्था असावी.

५. नदी, मोठे तलाव/जलाशय /ओढा, यातून भातशेतीसाठी अतिरिक्त लागणारे पाणी घेताना बाहेरून संवर्धन अयोग्य मासे येणार नाही तसेच प्रदूषित पाणी वापरात येणार नाही याची खबरदारी द्यावी.

भात मत्स्यशेती करताना काळजीः

१. कीटकनाशकाचा वापर करू नये.

२. निंदणीच्यावेळी तणनाशकांचा उपयोग करू नये.

३. भात काढून घेतल्यानंतर दुबार पिकाच्या मशागतीसाठी जास्त वेळ लावू नये.

४. भाताचे उत्पादन घेतल्यानंतर त्वरित मासेमारी करू नये.

संपर्कः - किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(वाघमारे हे पुणे येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत. जयश्री शेळके या

मत्स्यविज्ञान महाविद्यालय, लेंबुचेरा (केंद्रीय कृषी विद्यापीठ), त्रिपुरा येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com