मत्स्यतलावातील पाणी व्यवस्थापन

कोणत्याही जलचराचे संवर्धन करताना पाण्याची गुणवत्ता हा एक महत्त्वाचा घटक असतो. इष्टतम पाण्याची गुणवत्ता प्रजातीनुसार बदलते. त्यांच्या वाढीवर व जगण्यावर काय बदल दिसतात त्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहे.
मत्स्यतलावातील पाणी व्यवस्थापन
Fish FarmingAgrowon

किरण वाघमारे

माशांची चांगली वाढ आणि उत्पादन हे चांगल्या दर्जाचे खाद्य तसेच पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. पाण्याचे भौतिक-रासायनिक गुणधर्म हे संवर्धन होत असलेल्या प्रजातींच्या सहनशीलतेच्या मर्यादेत असले पाहिजेत. मातीच्या तलावात मुख्यत: भौतिक व रासायनिक घटक आणि त्यांची वैशिष्ट्ये ही मत्स्य उत्पादनात खूप मोलाची भूमिका बजावत असतात. संवर्धनासाठी वापरण्यात येणारे पाणी कसे आहे हे समजल्यास तलावातील पाण्याचे व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करण्याची कल्पना येते. माशांचे उत्पादनही चांगले मिळते.

पाण्याच्या गुणधर्मा नुसार मत्स्यशेतीचे प्रकारः

अ.क्र---मत्स्यशेती प्रकार---गुणधर्म/ क्षारता

१---गोड्या पाण्यातील मत्स्यशेती---०.१ ते ०.५

२--- निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती---०.५ ते ३५

३--- खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती ---३५च्या वर

गोड्या पाण्यातील मत्स्यशेती :

गोड्या पाण्यात प्रामुख्याने भारतीय प्रमुख कार्प, चायनीज प्रमुख कार्प, तिलापिया, पंगस, शिफारशीत देशी मांगूर, कोळंबी इत्यादींचा समावेश होतो.

पाणी व्यवस्थापनः

१) माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्त्वाचे असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर मासळीची वाढ अवलंबून असते. यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते.

२) सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप्त खोली १-१.५ मीटर असावी. यापेक्षा अधिक खोली असल्यास पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता अडचण निर्माण होते. संवर्धन तळ्याकरिता पाण्याचे नियमित बारमाही स्रोत असल्यास पाणी व्यवस्थापन करणे सोपे होते.

३) विहीर, कूपनलिका असल्यास पाण्याचे नियोजन करण्यास उत्तम तसेच सभोवतालच्या परिसरात नदी असल्यास त्याचे पाणी सुद्धा वापरता येते. पाण्यावर प्रक्रिया आणि स्वच्छतेसाठी वेगळे छोटे तलाव असल्यास व्यवस्थापन अतिउत्तम प्रकारे करता येते.

४) पाण्यातील मूलभूत घटक जसे सामू, क्षारता, जडता, पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन, व इतर नायट्रोजीनस पदार्थ इत्यादीचे पाण्यामध्ये योग्य समायोजन असणे अत्यंत लाभकारक असते. इष्टतम गुणधर्म असल्यास माशांचे उत्कृष्ट आरोग्य व जलद वाढ दिसून येते.

५) पाण्यातील घटक गुणधर्म हे सभोवतालचे पर्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळातील माती, पाण्यातील सूक्ष्म जीव इत्यादींवर अवलंबून असते. म्हणजेच पाण्याचे योग्य गुणधर्म टिकवून ठेवण्याकरिता या सर्व बाबीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे असते. तलावात पाणी वाढवण्यासाठी व तलावातील पाणी कमी करण्याकरिता इनलेट दरवाजा व आउटलेट दरवाजाचा वापर केला जातो. त्याचे स्थान यामध्ये महत्त्वपूर्ण असते. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत.

भौतिक गुणधर्म :

१) पाण्याची पारदर्शकता व रंग :

  • पाण्याची पारदर्शकता पाण्यातील धूलिकण व प्लवंगावर अवलंबून असते. अत्यंत पारदर्शक पाणी हे संवर्धनासाठी उपयुक्त नसते.

  • पाण्यात योग्य प्रमाणात वनस्पती व प्राणी प्लवंग असणे आवश्यक असते.

  • साधारणपणे ०-२० सें.मी पाण्याची पारदर्शकता संवर्धनासाठी योग्य नसते. (प्राणी प्लवंग जास्त असतात व सामू मध्ये बदल दिसून येतो)

  • साधारणपणे फिकट हिरव्या रंग ते हिरव्या रंगाच्या पाण्याची पारदर्शकता ४० ते ६० सेंमी असते, तेव्हा सदर पाणी संवर्धनासाठी योग्य आहे असे समजण्यात येते.

  • साधारणपणे ६०-८० सेंमी पाण्याची पारदर्शकता संवर्धनासाठी अयोग्य आहे.

  • पारदर्शकता तपासण्यासाठी सेच्ची डिस्क हे यंत्र वापरतात.

२) तापमान :

- मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे. योग्य तापमान माशाचे आरोग्य आणि वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. तापमान साधारणपणे २५ ते ३२ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास वाढीवर परिणाम दिसतो.

रासायनिक गुणधर्म :

तलावातील पाण्यात/ पाण्याच्या घटकांत होणारे बदलः

- तलावातील पाण्याची वैशिष्ट्ये तलावात सोडलेले पाणी आणि तलावातील मातीवर अवलंबून असतात. तलावातील पाण्यात खालील प्रमाणे काही प्रमुख रासायनिक क्रिया/प्रक्रिया होतात.

श्‍वसन :

- तलावातील वनस्पती व प्राणी हे प्राण वायू घेतात आणि कार्बन डायऑक्‍साइड सोडतात.

प्रकाश संश्‍लेषणः

- पाण्यातील पाण वनस्पती जेव्हा मुबलक प्रमाणात प्रकाश उपलब्ध असतो तेव्हा कार्बन डायऑक्‍साइडचा वापर वनस्पतीसाठी आवश्यक घटक बनवतात, तेव्हा ऑक्सिजन सोडला जातो.

सडणे प्रक्रिया :

- मृत वनस्पती व कुजलेले प्राणी, पशू अवशेष जे जिवाणूंमुळे सडतात. तेव्हा जिवाणू ऑक्सिजनचा वापर खनिज व सेंद्रिय घटक तयार करण्यासाठी वापरतात.

या सर्व प्रक्रिया निरंतर पाण्याच्या घटकांमध्ये बदल करत असतात. उदाहरणार्थ...

दिवसाच्या वेळेतः वनस्पती प्रकाश संश्‍लेषणाद्वारे स्वत:च्या वाढीसाठी कार्बन डायऑक्साइडचा वापर करतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणून दिवसाच्या वेळेत कार्बन डायऑक्साइड कमी असतो.

रात्रीच्या वेळेत : प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया होत नसल्यामुळे जलचर व वनस्पती यांची ऑक्सिजनची मागणी वाढते आणि कार्बन डायऑक्साइड वाढतो.

वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव जेवढ्या प्रमाणात असतील तेवढ्या प्रमाणात पाण्यातील घटकांमध्ये बदल होतात. मोठ्या प्रमाणात संचयीत तलावात असे बदल अधिक होतात. अशा तलावांचे योग्य व्यवस्थापन करणे अधिक गरजेचे असते. वरील सर्व रासायनिक प्रक्रिया पाण्याच्या तापमानामुळे प्रभावित होतात. जेवढे तापमान वाढते, तेव्हा सर्व प्रक्रिया वाढतात. त्यामुळे पाण्याच्या घटकांमध्ये मोठे बदल दिसतात. या प्रक्रियेमुळे तलावातील पाण्याच्या वैशिष्ट्ये बदलाचे नियंत्रण आणि नियोजनाचे व्यवस्थापन करण्याकरिता वेळोवेळी पाण्याचे नमुने घेऊन सर्व महत्त्वाच्या घटकांची तपासणी करावी.

गोड्या पाण्यातील रासायनिक घटकांचे मानक श्रेणी मर्यादा आवाक्यात ठेवल्यास पाण्याचे योग्य रासायनिक गुणधर्मः

अ.क्र---रासायनिक बाबी---श्रेणी

१---पाण्याचा सामू---६.५-८.५

२--- विद्राव्य प्राणवायू--- > ५ पीपीएम

३---पाण्याची क्षारता ---०.१-०.५ पीपीएम

४ अल्कनिटी--- ५०-१५० मिलिग्रॅम प्रति लिटर

५---जडता --- ७५-२०० मिलिग्रॅम प्रति लिटर

६--- नायट्राइड --- <०.५

७---- नायट्रेड --- <०.५

८---- अमोनिया--- <०.१

पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायूः

- पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू यांचे सर्व रासायनिक गुणधर्म एकमेकांवर अवलंबून असतात. या दोन बाबी व्यवस्थित राखल्यास बाकी घटक आपोआप व्यवस्थित राखता येतात.

- पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राण वायू सहजरीत्या तपासू शकतो आणि नोंदी ठेवू शकतो.

अ.क्र---सामू गुणधर्म/ प्रकार---श्रेणी (Range)

१---आम्लयुक्त सामू---०-७

२---उदासीन सामू---७

३---अल्कलीयुक्त सामू---७-१४

टीपः ६.५ - ८.५ हा संवर्धन योग्य सामू आहे.

सामू मोजण्याचे उपकरण : इंडिकेटर, पीएच पेपर, युनिव्हर्सल इंडिकेटर, इलेट्रॉनिक डिजिटल पीएच मीटर.

क्षारता, अल्कनिटी आणि जडताः

- गोड्या पाण्याची क्षारता ही ०.१-०.५ पीपीटी असते.

- अल्कनिटी पाण्यामध्ये असणारे कॅल्शिअम, कार्बोनेट, बायकार्बोनेट आयन्सवर अवलंबून असते.

- अल्कनिटी रेंज २० ते १५० मिलिग्रॅम/ लिटर

- अल्कनिटी मापन यंत्र- स्पेक्ट्रोफोटो मीटर

जडताः

- पाण्यातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आयन्सच्या आधारावर जडता मोजता येते.

- जडतेचे प्रमाण २०-३०० मिलिग्रॅम/लिटर

- जडता आणि अल्कनिटी सम-समान प्रमाणात असल्यास पाणी संवर्धनासाठी उपयुक्त असते.

- जडता आणि अल्कनिटी विशिष्ट पातळी राखण्यासाठी चुन्याची मात्रा देऊन योग्य प्रमाण राखता येते. वाढीवर चांगला फरक दिसतो.

पाण्यातील जैविक गुणधर्म (पाण्याची उत्पादकता) :

- पाण्यातील वनस्पती व प्राणी प्लवंगावर पाण्यातील उत्पादकता अवलंबून असते.

- वनस्पती व प्राणी प्लवंगाचे योग्य प्रमाण राखण्याकरिता शेणखत इत्यादी वापरण्यात येते.

माशांची मरतूक टाळण्यासाठी उपाययोजना :

१) तलावात इष्टतम प्रमाणात मत्स्यबीज संचयन करावे.

२) तलावात इष्टतम प्रमाणाच्या वर संचयन झाल्यास मत्स्य वाढीवर परिणाम होतो. उदा. हालचालीसाठी लागणारी जागा न भेटल्यामुळे वाढीवर परिणाम दिसतो.

३) मत्स्यबीजांच्या इष्टतम प्रमाणाच्या वर संचयन झाल्यास अनावश्यक असलेल्या रासायनिक बाबींमध्ये वाढ होऊन ऑक्सिजन कमतरता होते.

४) विविध गॅस आणि अमोनिया वाढतो. तसेच जिवाणू, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

५) मत्स्यबीजांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या संचयनामुळे बीजांना मोठ्या प्रमाणात खाद्याची आवश्यकता असते. मत्स्यखाद्याच्या सेवनामुळे त्यांची विष्ठा पाण्यातील अमोनिया आणि इतर घटक वाढून पाणी दूषित होते. त्यांची प्रत खराब होऊन माशांना विविध आजार होतात.

६) दररोज माशांच्या वाढीवर नजर ठेवावी. नोंदी ठेवल्यास मरतुक टाळता येते.

७) पाण्याच्या भौतिक, रासायनिक, जैविक बाबी तपासणी करून नोंदी ठेवावे.

महत्त्वपूर्ण बाबीः

१) माशांची वाढ होण्याकरिता पाण्याची प्रत योग्य असावी.

२) पाण्यातील योग्य प्रमाणात वनस्पती प्लंवग आणि प्राणी प्लवंग असल्यास खाद्य खर्चात बचत होते.

३) पाण्याची पारदर्शकता जास्त असल्यास पाणी संवर्धनास अयोग्य असते.

४) पाण्यात तरंगते धुळीकण असल्यास संवर्धनाकरीता पाणी योग्य नसते, कारण मासे श्‍वासोच्छ्वास घेताना तोंडातून पाणी आत घेतात, या वेळी धूलिकणांमुळे कल्ले जाम होऊन अडकतात.

५) पाणी खूप हिरवट असल्यास किंवा गडद हिरवे असल्यास संवर्धनास अयोग्य असते.

६) वास येणारे पाणी हे अयोग्य असते.

संपर्कः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(लेखक पुणे येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com