Floriculture
FloricultureAgrowon

Floriculture : प्रकारानुसार करा निशिगंध जातींची निवड

निशिगंध लागवडीसाठी फुलांच्या प्रकारानुसार जातींची निवड करावी. लागवडीसाठी सरी-वरंबा किंवा सपाट वाफे पद्धतीचा अवलंब करावा.

निशिगंध हे बहुवर्षीय कंदवर्गीय फूलझाड (Nishigandh Flower) आहे. निशिगंधाच्या पिकाला रजनीगंधा किंवा गुलछडी असेही म्हणतात. भारतातील उष्ण आणि आल्हाददायक हिवाळी हवामान पिकास चांगला मानवते. भारतात निशिगंधाची लागवड मुख्यतः पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात होते. महाराष्ट्रात सुमारे ३००० हेक्टर क्षेत्रावर निशिगंधाची लागवड केली जाते. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सांगली, ठाणे व औरंगाबाद जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर निशिगंध फुलांचे उत्पादन घेतले जाते. (Floriculture)

एकदा निशिगंध लागवड केल्यानंतर त्याच लागवडीपासून ३ ते ४ वर्षांपर्यंत फुलांचे उत्पादन मिळते. निशिगंधाच्या कंदापासून असंख्य फुटवे येऊन एका वर्षातच अनेक रोपे उपलब्ध होतात. अत्यंत सोपी लागवड पद्धत, वर्षभर मिळणारी फुले, कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव इत्यादी बाबींमुळे निशिगंधाच्या लागवडीस चांगला वाव आहे. तसेच या फुलांचे उत्पादन बारा महिने मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.

Floriculture
पवना फुल उत्पादक संघाचे दररोज सव्वा लाखांचे नुकसान 

- निशिगंधाच्या झाडाला साधारणतः २० ते २५ पाने फुटून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून लांब असा फुलदांडा निघतो. हा फुलदांडा ५० ते १०० सेंमी उंचीचा असून त्यावर २५ ते ३० जोडफुले येतात.

- निशिगंधाची उमललेली फुले पांढऱ्या रंगाची आणि अत्यंत सुवासिक असतात. त्यामुळे या फुलांना चांगली मागणी असते. या फुलांचा उपयोग प्रामुख्याने वेणी, गजरा, पुष्पहार, गुच्छ किंवा लग्न समारंभात सुशोभीकरणासाठी केला जातो.

- निशिगंधाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांमध्ये उत्तम प्रतीचे दुर्मीळ सुवासिक तेल असते. फुलांच्या अर्कापासून तयार केलेल्या तेलाचा उपयोग सुवासिक तेले, साबण किंवा पावडर, शाम्पू तसेच विविध औषधांच्या निर्मितीवेळी केला जातो.

हवामान ः

- निशिगंधा पिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. साधारणपणे २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ५० ते ५५ आर्द्रता असलेल्या भागांत निशिगंधाची वाढ चांगली होते. पिकाच्या जोमदार वाढीसाठी भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.

- साधारण ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्तीचे अति उष्ण किंवा १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी अति तापमान पिकाच्या वाढीस अपायकारक ठरते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. फुले येण्याचे प्रमाण कमी होते.

जमीन ः

- निशिगंधाचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. क्षारयुक्त जमिनीतही निशिगंधाची लागवड करता येते.

- पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन लागवडीस निवडावी.

- दर्जेदार फुलांसाठी जांभ्या दगडाच्या वाळूमिश्रित आणि सामू ६.५ ते ७ असलेल्या जमिनीत निशिगंधाची लागवड करावी.

- उथळ आणि हलक्या जमिनीत निशिगंधाचे फुलदांडे आणि फुले लहान राहतात. आणि फुलांचा हंगामही थोड्याच दिवसांत संपतो. भारी काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

निशिगंध प्रकारानुसार जाती ः

फुलांच्या प्रकारानुसार सिंगल, डबल, सेमीडबल आणि व्हेरिगेटेड असे चार प्रकार पडतात.

१) सिंगल ः

या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून अत्यंत सुवासिक असतात. या फुलामध्ये ५ पाकळ्या असतात. ही फुले वेणी, हार, गजरा, माळा बनविण्यासाठी वापरली जातात. जाती ः मेक्सिकन सिंगल, कलकत्ता सिंगल, फुले रजनी, प्रज्वल आणि अर्का निरंतरा.

२) डबल ः

या प्रकारातील फुलांच्या जातीचा फुलदांडा भरपूर जाड असतो. फुलांमध्ये पाकळ्यांची संख्या १० पेक्षा जास्त असून, त्या ३ ते ४ घेरामध्ये असतात. फुलाचा रंग फिक्कट पांढरा असून, फुलांना कमी प्रमाणात सुगंध असतो. फुलदाणीत ठेवण्यासाठी किंवा परदेशात पाठविण्यासाठी ही फुले योग्य असतात.

जाती ः कलकत्ता डबल व एक्सेलसियर, वैभव

३) सेमीडबल ः

या प्रकारातील फुलांमध्ये ५ पाकळ्यांची एकात एक अशी दोन वर्तुळे असून एकूण १० पाकळ्या असतात. कळीच्या टोकाला गुलाबी छटा असते. ही फुले गुच्छ बनविण्यासाठी वापरली जातात.

जाती ः स्वर्ण रेखा, सुहासिनी

४) व्हेरिगेटेडट ः

पाकळ्या पांढऱ्या किंवा सोनेरी रंगाच्या असतात.

जाती ः रजतरेखा (लखनौ फूल संशोधन केंद्र)

Floriculture
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात केंद्राची गरज

अभिवृद्धी ः

निशिगंधाची अभिवृद्धी बियांपासून तसेच जमिनीत वाढणाऱ्या सुप्त कंदापासून करता येते. मात्र निशिगंधाची व्यापारी लागवड ही कंदापासूनच केली जाते.

लागवडीसाठी कंद निवडताना आधीच्या पिकाचे व्यवस्थित निरीक्षण करावे. कारण बेणे निवडताना रोगमुक्त आणि चांगले उत्पादन देणारे असणे आवश्यक असते. मूळ मातृ कंदाभोवती अनेक लहान मोठे कंद असतात. या सर्व समूहाला इंग्रजीत ‘क्लम्प’ असे म्हणतात. या सर्व समूहांचा अयोग करून निशिगंधाची लागवड केली जाते. परंतु लहान-मोठ्या आकाराच्या कंदामुळे पीक एकसारखे न वाढता कमी अधिक प्रमाणात वाढते आणि उत्पादन कमी मिळते. त्यामुळे समूहाने लागवड करण्यापेक्षा स्वतंत्र कंदाची लागवड करावी.

पूर्वमशागत ः

- जमिनीची उभी-आडवी खोल नांगरणी करावी. कुळाव्याच्या उभ्या आडव्या २ पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी.

- चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ४० ते ५० टन प्रमाणे जमिनीत मिसळावे.

लागवड ः

- निशिगंधाची लागवड सरी-वरंबा किंवा सपाट वाफे पद्धतीने करता येते.

- हलकी किंवा पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास सपाट वाफे पद्धती निवडावी. तर मध्यम आणि पाण्याचा कमी निचरा होणारी जमीन असल्यास सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा.

- जमिनीचा उतार लक्षात घेऊन सरी वरंबे किंवा सपाट वाफे तयार करावेत.

- सरी वरंब्यावर लागवड करताना ६० सेंमी अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक वरंब्याच्या दोन्ही बाजूंस २० ते ३० सेंमी अंतरावर कंदाची लागवड करावी.

- सपाट वाफ्यात दोन ओळींत २० ते ३० सेंमी आणि दोन कंदांत १५ ते २५ सेंमी अंतर राखून लागवड करावी. कंद जमिनीत ५ ते ६ सेंमी खोलीवर पुरावा. एका ठिकाणी एकच कंद लावावा. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.

- लागवडीसाठी हेक्टरी ६० ते ७० हजार कंद पुरेसे होतात.

खत व्यवस्थापन ः

- शेणखत उपलब्ध नसल्यास, लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत प्रथम तागासारखे हिरवळीच्या पीक घ्यावे. पीक फुलधारणेत येण्यापूर्वी जमिनीत गाडावे आणि चांगले कुजल्यानंतर त्या जमिनीत निशिगंधाची लागवड करावी.

- फुलांच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाशची मात्रा द्यावी. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी आणि नत्र तीन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.

सिंचन व्यवस्थापन ः

- कंद लागवडीनंतर लगेच पहिले पाणी द्यावे. दुसरे पाणी ५ ते ७ दिवसांनी द्यावे. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन दर १० ते १२ दिवसांनी सिंचन करावे.

- फुलांचे दांडे येण्यास सुरुवात झाल्यावर नियमित पाणी द्यावे. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

-----------------------

- शीतल गजभिये, ९८८१७९२५४२

- डॉ. भागवत चव्हाण, ९४०४५५१००९

(श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com