Chana Production
Chana ProductionAgrowon

Chana Production : हरभरा उत्पादनवाढीची सूत्रे ...

बागायती क्षेत्रात हरभरा पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान केल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी शेत ओलावून वाफशावर करावी.

डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. सारिका कोहकडे, डॉ. अरविंद तोत्रे

बागायती क्षेत्रात हरभरा पेरणी (Chana Sowing) २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान केल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी शेत ओलावून वाफशावर करावी. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी.हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक (Intercrop) घेता येते.

हरभरा लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन (४५-६० सेंमी खोल) पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन निवडावी. मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत पीक चांगले येते.

उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा येतो परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी, चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमीन तसेच निचरा न होणाऱ्या जमिनीत आणि आम्ल जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

Chana Production
Chana Cultivation : हरभरा लागवड व्यवस्थापनाची सप्तसूत्री

लागवडीपूर्वी जमिनीची २५ सेंमी खोल नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. जमिनीची कमीत कमी मशागत करावी, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होईल. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.

१) बागायती क्षेत्रात पाणी देण्याची सोय असल्यामुळे पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान केल्यास अधिक उत्पादन मिळते. कमी खोलीवर ५ सेंमी वर पेरणी केली तरी चालते. काबुली हरभऱ्याची पेरणी शेत ओलावून वाफशावरच करावी. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी.

२) १० नोव्हेंबरनंतर पेरणी १५ दिवसांनी व ३० दिवसांनी उशिरा केल्यास उत्पादनात अनुक्रमे २७ ते ४० टक्के घट होते.

३) देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळींतील अंतर ३० सेंमी, तर दोन झाडांतील अंतर १० सेंमी ठेवावे. काबुली जातींकरिता दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी आणि दोन झाडांतील अंतर १० सेंमी ठेवावे.

४) ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वरंबा सरी पद्धत वापरणे फायद्याचे ठरते.

Chana Production
Kabuli Chana : काबुली हरभरा तेजीत

बियाण्याचे प्रमाण :

१) लहान दाण्याच्या जातीसाठी : ६० किलो/हेक्टर.

२) मध्यम आकारमानाच्या जातीसाठी : ७५-८० किलो प्रति हेक्टर

३) टपोरे दाणे असलेल्या जातीसाठी ः १०० किलो प्रति हेक्टर

४) काबुली जाती : १०० ते १२५ किलो प्रति हेक्टर

सुधारित जाती ः

जात ---पक्वतेचा कालावधी (दिवस)---उत्पादन (क्विं./हेक्टर)---वैशिष्ट्ये

Chana Production
Chana Cultivation : हरभरा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

देशी वाण

विजय --- ---जिरायती ८५-९०, बागायत १०५-११०---जिरायती १४, बागायती २३ उशिरा १६ ---अधिक उत्पादन क्षमता, मर रोगप्रतिकारक्षम, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम. गुजरात राज्यासाठी प्रसारित

दिग्विजय---जिरायती ९०-९५, बागायत १०५-११०---जिरायती १४, बागायती २३, उशिरा २१---पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायती बागायत तसेच उशिरा पेरणीत योग्य, महाराष्ट्रासाठी प्रसारित.

फुले विक्रम---१०५-११०---जिरायती १६, बागायती २२, उशिरा २१---घाटे जमिनीपासून १ फुटाच्या वर लागतात, वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त, मररोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य, पीक पक्व झाल्यावर घाटे गळत नाहीत.

फुले विक्रांत---१०५-११०---२० ---पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायती पेरणीस योग्य

फुले विश्‍वराज---९५-१०५---१५-१६ ---मररोग प्रतिकारक्षम, पश्‍चिम महाराष्ट्रात जिरायती पेरणीस योग्य, १०० दाण्यांचे वजन २३ ग्रॅम

जाकी -९२१८---१०५-११०---१८-२०---टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायती तसेच बागायत पेरणीस योग्य

पीडीकेव्ही कांचन---१०५-११०---१८-२०---टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायती तसेच बागायत पेरणीस योग्य, विदर्भ विभागासाठी प्रसारित

बीडीएनजी-७९७ (आकाश) ---१०५-११०---जिरायती १५, बागायती २०---मध्यम आकाराचे दाणे, मररोगास प्रतिकारक्षम, अवर्षण प्रतिकारक्षम, मराठवाडा विभागासाठी प्रसारित

काबुली जाती ः

कृपा ---१०५-११०---१८---जास्त टपोरे दाणे, १०० दाण्याचे वजन ५९.४ ग्रॅम असलेली जात, सफेद पांढरे दाणे, सर्वाधिक बाजारभाव

विराट---११०-११५--- जिरायती ११, बागायती १९---अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारकक्षम, महाराष्ट्रासाठी प्रसारित.

पीकेव्ही-२---१००-१०५---१२-१५ ---अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारकक्षम, अधिक बाजारभाव.

पीकेव्ही-४---१००-११०---१२-१५---अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारकक्षम, अधिक बाजारभाव.

बीजप्रक्रिया :

१) मर, मूळकुज किंवा मानकुज रोगनियंत्रणासाठी : पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेन्डाझिम (२५ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५० टक्के डब्ल्यूएस) या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया.

जिवाणू संवर्धक वापरण्याची पद्धत :

१) रायझोबियम व स्फुरद उपलब्ध करणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे.

२) प्रथम १२५ ग्रॅम गूळ प्रति लिटर गरम पाण्यात विरघळून घ्यावा. थंड द्रावणात २५० ग्रॅम प्रत्येक जिवाणू संवर्धक एकत्र करावे. १० किलो बियाण्यास हे मिश्रण पुरेसे आहे.

३) बियाणे ताडपत्री, फरशी किंवा प्लॅस्टिकवर घेऊन संपूर्ण बियाण्यावर आवरण होईल या प्रमाणे मिसळावे. बियाणे सावलीत वाळवावे. त्यानंतर पेरणी करावी. यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध होतो.

खत मात्रा :

१) प्रति हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.

२) पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.

३) गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र व स्फुरदासोबत २० किलो गंधक किंवा २५ किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्‍टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे.

४) फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी व त्यानंतर दुसरी फवारणी १५ दिवसांनी २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची करावी. यामुळे उत्पादनात वाढ होते.

आंतरमशागत :

१) पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३० ते ४५ दिवसांत शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

२) पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी केल्यास जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. तसेच गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.

पाणी व्यवस्थापन :

पीक अवस्था ---बागायती (दिवसांनी) ---दोन पाणी (दिवसांनी)---एक पाणी (दिवसांनी)

वाढीच्या अवस्थेत ---२० ते २५ - -

फुलोऱ्यात असताना ---४५ ते ५० ---३० ते ३५ ---३५ ते ४०

घाटे भरताना ---६५ ते ७० ---५५ ते ६०

हरभरा पिकास तुषार सिंचन अधिक उपयुक्त, त्यामुळे पाण्याची ३३ टक्के बचत तर होतेच, शिवाय उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

आंतरपीक :

१) हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते.

३) हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळीप्रमाणे आंतरपीक घ्यावे.

३) हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळींप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे.

४) उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूंस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सेंमी अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याचबरोबर हरभऱ्याच्या बेवड उसाला उपयोगी ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.

संपर्क : डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८,

(प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com