Natural Biscuit Making : नैसर्गिक स्वादाच्या बिस्किटांचा तयार केला ब्रॅण्ड

शरयू सचिन काशीद यांनी कोल्हापूर शहरातील बाजारपेठेचा अंदाज घेत प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रीत केले. विविध स्वादांच्या बिस्किटांसह बेकरी पदार्थ, तसेच नैसर्गिक चवीच्या आइस्क्रीम उद्योगामध्ये त्यांनी स्वतःची ओळख तयार केली आहे.
Biscuit Making
Biscuit MakingAgrowon

Rural Story : विविध स्वादांच्या बिस्किटांसह बेकरी पदार्थ, व नैसर्गिक आइस्क्रीम उद्योगातून (Icecream industry)कोल्हापूर शहरातील शरयू सचिन काशीद यांनी प्रगती साधली आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्‍वभूमी नसताना केवळ श्रम आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या आधारावर त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून हा व्यवसाय यशस्वी केला आहे.

शरयू काशीद यांनी एमए (हिंदी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर औद्योगिक लेखा परीक्षक तसेच कॅशिअर म्हणूनही काम केले. लग्न झाल्यानंतर त्यांच्या नोकरीत खंड पडला. उच्चशिक्षित असल्याने काय करायचे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता.

शेतकरी कुटुंबातील माहेर असल्याने त्यांचा कल प्रक्रिया उद्योगाकडे होता. शहरी बाजारपेठेचा अभ्यास आणि पती सचिन यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर बिस्कीट निर्मिती करण्यास सुरुवात केली. शरयू यांचे कुटुंब धार्मिक आहे.

त्यामुळे त्यांचा भर हा सात्त्विक पदार्थ तयार करण्याकडे आहे. २०१७ मध्ये शरयू यांनी घराच्या परिसरातील मंदिरात येणाऱ्या भाविकांना खाद्य पदार्थ तयार करून देण्यास सुरुवात केली. यातूनच पुढे त्यांना प्रक्रिया उद्योगाची संकल्पना सुचली.

Biscuit Making
Food Processing : बिस्कीट प्रक्रिया उद्योगामध्ये तयार केली ओळख

विविध स्वादांची बिस्किटे, आइस्क्रीम ः

शरयू काशीद यांनी पहिल्या टप्यात प्रायोगिक तत्त्वावर बिस्किटांसह अन्य बेकरी पदार्थांच्या निर्मितीस सुरुवात केली. यानंतर परिसरातील ग्राहकांना या पदार्थांची विक्री करण्यास प्राधान्य दिले.

ग्राहकांकडून वाढती मागणी लक्षात घेऊन २०१८ ला त्यांनी बिस्किटे निर्मितीसाठी यंत्रांची खरेदी केली. प्रशिक्षणदेखील घेतले. अनुभवातून शिकत त्यांनी पदार्थांचा दर्जा चांगला राखण्यास प्राधान्य दिले. यामुळे ग्राहकांच्याकडून त्यांच्या विविध उत्पादनांना मागणी वाढली.

सध्या शरयूताई मैद्याचा वापर करून कोकोनट, चॉकलेट, गुलकंद, मिल्क, बदाम, नमकीन, जॅम आदी चवीची बिस्किटे तयार करतात. तुपातील आणि साधी अशी गव्हाच्या पिठापासून बिस्किटे तयार करतात.

सेंद्रिय गूळ आणि साखरेचा वापर केलेली नाचणी बिस्किटांना ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे. क्रीम रोल, खारी, टोस्ट, तीन प्रकारचे स्लाईस केक, केक रस्क आदी प्रक्रिया पदार्थ मागणीनुसार तयार केले जातात.

शरयू काशीद या ग्राहकांच्या मागणीनुसार नैसर्गिक स्वादाचे आइस्क्रीम तयार करून देतात. आंबा पल्प, पेरू गर आणि खाऊच्या पानांच्या मसाल्यापासून आइस्क्रीम निर्मितीला त्यांनी चालना दिली आहे.

याचबरोबरीने चिकू, अंजीर स्वादामध्येही आइस्क्रीम तयार करतात. आईइस्क्रीमसह अन्य पदार्थ मिळून सुमारे २८ प्रकारचे प्रक्रिया पदार्थ तयार करतात.

अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर ः

शरयूताईंचा प्रक्रिया उद्योगामध्ये मनुष्यबळापेक्षा यांत्रिकीकरणाकडे अधिक ओढा आहे. यामुळे पदार्थ तयार होण्यात सुलभता आली, वेळेची बचत झाली. प्रक्रिया उद्योगामध्ये पीठ मळण्यासाठी हायड्रॉलिक स्वरूपाची तीन स्वयंचलित यंत्रे, ओव्हन, बिस्कीट ड्रॉपिंग यंत्रांची उपलब्धता आहे.

याशिवाय स्लायसर, स्पायरल मिक्सर, क्रीम रोल फिलिंग यंत्र, डीप फ्रिज अद्ययावत यंत्रसामग्री त्यांच्याकडे आहे. यंत्राच्या वापरामुळे केवळ दोन ते तीन लोकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार केले जातात.

विविध बाजारपेठेमध्ये मागणी ः

शरयू ताईंचे पती सचिन हे पदार्थ विक्रीची जबाबदारी सांभाळतात. ते एका खासगी कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात आहेत. संध्याकाळी सहानंतर ते शहरातील विविध बेकरी आणि दुकानदारांना भेटी देऊन ऑर्डर घेतात.

त्यानुसार कोणाला किती पदार्थ लागणार आहेत याबाबत नियोजन करून पदार्थ निर्मिती होते. शहरातील विविध बेकरी व्यावसायिक, नामवंत ब्रँडच्या चहाच्या फ्रॅंचायजी त्यांच्या बिस्किटांच्या ग्राहक आहेत. गेल्या चार वर्षांपासून बेळगाव, नगर, फोंडा आदी भागांमध्येही बिस्किटासह अन्य पदार्थ पाठवले जातात.

बाजारपेठेत उत्पादनांची वेगळी ओळख होण्यासाठी त्यांनी ‘सरयू देव बिस्कीट’ हा ब्रँड तयार केला आहे. गव्हाची बिस्किटे २४० रुपये किलो, तुपातील बिस्किटे ३३० रुपये किलो, सेंद्रिय गुळाची बिस्किटे ३३० रुपये किलो, खारी २०० रुपये किलो, टोस्ट १८० रुपये किलो या दराने विक्री होते.

१०० मिलि आइस्क्रीम २० रुपये, ७५० मिलि आइस्क्रीम पार्टी पॅक १४० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. दिवसाला सुमारे ५० किलो बिस्किटांची निर्मिती होते. या सर्व उलाढालीतून वीस ते पंचवीस टक्के नफा मिळतो.

Biscuit Making
Milk Processing : प्रयोगशील शेतकऱ्याने दूध प्रक्रिया उद्योगात तयार केला स्वतःचा ब्रॅण्ड

काटेकोर नियोजनावर भर ः

दररोज साडेबारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध पदार्थांची निर्मिती केली जातात. नियोजनानुसार दोन दिवस बिस्किटे, एक दिवस केक, एक दिवस क्रीम रोल आणि खारीनिर्मिती केली जातात. एक दिवस पॅकिंगसाठी राखीव ठेवला जातो.

ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ निर्मितीत काही वेळा बदल केला जातो. पदार्थ तयार करताना शरयू यांच्यासोबत सासूबाई अर्चना, भावजय कविता जाधव आणि मदतीस धरती रावल या मेहनत घेतात. पदार्थ तयार करण्यासाठी प्रत्येक जण कुशल झाले आहेत. त्यामुळे पदार्थाचा दर्जा टिकून आहे.

शेतकऱ्यांकडून तूप, गूळ, नाचणी खरेदी ः

बिस्किटांसह अन्य पदार्थांचा दर्जा हा कच्च्या मालावरच अवलंबून असतो. यामुळे कोणत्याही परिस्थितीत कच्च्या मालाच्या दर्जाबाबत तडजोड केली जात नाही. नियमित व्यापाऱ्यांकडे खात्रीशीर स्वरूपातच कच्च्या मालाची खरेदी केली जाते. यामुळे पदार्थांची एकसारखी चव राहते.

अनेक पदार्थ तुपामध्ये केले जातात. तुपाची खरेदी ही शेतकऱ्यांकडूनच केली जाते. घरगुती बनविलेल्या तुपाची चव वेगळी असल्यामुळे त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.

शेतकऱ्यांच्या घरून तुपाचे संकलन करण्यासाठी शरयू यांचे बंधू संतोष यांची मदत मिळते. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने उत्पादित नाचणी, गुळाची खरेदीदेखील शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे पदार्थांना वेगळीच चव येते.

संपर्क ः शरयू काशीद, ८६६८२ ११६०६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com