छोट्या बदलातून सुखाच्या महामार्गाकडे...

वातावरण बदलाचा सर्वांत जास्त प्रभाव समुद्र पातळी वाढणे, उंच लाटांची निर्मिती, समुद्राचे किनाऱ्यालगत खोलवर आक्रमण आणि तेथील भात शेतीचे प्रचंड नुकसान यामध्ये होणार आहे. किनाऱ्यालगतची भात शेती धोक्यात येत आहे. अतिपावसामुळे डोंगर उतारावरील माती वाहून जाण्याचा धोका वाढत आहे. अशा समस्यांवर गोव्यातील शेतकरी आपल्या पातळीवर मार्ग काढू लागले आहेत.
Agriculture on Hills
Agriculture on Hills Agrowon

गोवा राज्याने तयार केलेल्या वातावरण बदलाचा अभ्यास केंद्र शासनाकडे जमा केला. सोबतच त्वरित २०२१ पासूनच राज्याचा कृषी विभागही या अहवालात नोंदवलेल्या संभाव्य धोक्यावर सकारात्मक काम करू लागला. केंद्र शासनाच्या वतीने राज्यांना वातावरण बदलाच्या अभ्यासासाठी देश विदेशामधील स्वायत्त संस्थांची मदत घेण्यास परवानगी होती. या कामासाठी अनेक राज्यांनी आयआयटी, भारतीय विज्ञान संस्था यांची मदत घेतली. मात्र गोवा या एकमेव राज्याने नाबार्ड या कृषी निगडित स्वायत्त संस्थेची निवड केली होती. या अहवालाचा मुख्य भागीदार नाबार्ड ही संस्था असल्यामुळे विविध धोरणात्मक बाबींना वेग मिळाला.

२०१४ मध्ये सादर केलेल्या गोव्याच्या अहवालात २०३० पर्यंतच्या संभाव्य धोक्यांचा अंदाज घेण्यात आला आहे. गोव्याच्या वातावरण बदलात या राज्याला जोडलेला समुद्र, खाणकामामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेत जमिनी आणि पश्चिम घाटामधील अवैध खाण कामामुळे झालेला जंगलाचा ऱ्हास याचा प्रामुख्याने विचार झाला. यामध्ये ‘आत्मा’ आणि चेन्नईच्या ‘स्वामिनाथन संशोधन संस्था’ या संस्थांचा मोठा वाटा आहे.

- स्वामिनाथन संस्थेचे समुद्र किनाऱ्यालगतच्या भात शेतीवरील काम अतिशय महत्त्वाचे आहे. कारण यापुढे वातावरण बदलाचा सर्वांत जास्त प्रभाव समुद्र पातळी वाढणे, उंच लाटांची निर्मिती, समुद्राचे किनाऱ्यालगत खोलवर आक्रमण आणि तेथील भात शेतीचे प्रचंड नुकसान यामध्ये होणार आहे. या बाबी महाराष्ट्रामधील कोकण, आंध्र प्रदेश, ओडिशा, प. बंगालमध्ये दिसून येतात. मग त्यास गोवा कसा अपवाद असू शकेल? समुद्र किनाऱ्यालगतची शेती त्या पाण्यामुळे नापिक झाली आहे. या शेतीत भात पिकविणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी स्थलांतर केले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी स्वामिनाथन संशोधन संस्थेने अनेक भात वाण तयार केले. त्याचा गोव्यामधील शेतकऱ्यांनाही लाभ झाला.

गोव्यामधील वन खात्याने पर्यटन विभागाच्या मदतीने समुद्र किनाऱ्यालगत लाटांना थांबवण्यासाठी खारफुटीचे जंगल तयार केले आहे. सोबतच सुरुची बने, समुद्रफळ अशा वृक्षांचीही लागवड केली. यामुळे पर्यटनात वाढीसोबतच भात शेती सुरक्षित झाली. त्यातून अनेक यशोगाथा तयार झाल्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खाणकामामुळे उद्ध्वस्त झालेल्या दक्षिण गोव्याचा मोठा वाटा आहे.

- वातावरण बदलावर मात करावयाची असेल तर रासायनिक खते वापर आणि भूगर्भ पाणी उपसा कमी होणे गरजेचे आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढून पावसाचे पाणी जिरायला हवे. त्यासाठी ‘आत्मा’ने राज्यात सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मितीस महत्त्व दिले. त्यासाठी शेकडो महिला बचत गट तयार केले. शेतीमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवला. खाणकामाची जास्त झळ बसलेल्या तालुक्यांतील महिलांना एकत्रित करून गांडूळ खत निर्मितीचे शिक्षण दिले. सुरुवातीला ‘आत्मा’ तर्फे गाईचे शेण आणि गांडुळेही मोफत दिली. पुढे यात १२ बाय ३ बाय ३ फूट आकाराच्या प्लॅस्टिक बेड निर्मिती आणि वापर सुरु झाला. या महिला दोन महिन्यात उत्कृष्ट प्रकारचे खत तयार करू लागल्या. त्यातूनच दक्षिण गोव्यामधील सात महिला बचत गटांची यशोगाथा तयार झाली. त्याची नोंद भारत सरकारनेही घेतली. या सात महिला बचत गटांनी ‘आत्मा’ कडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या बळावर अनेक बेड तयार केले. त्यातून मागील दीड वर्षात दहा टन खत तयार झाले. त्याची १० रु. प्रति किलो प्रमाणे विक्री केली.

डोंगर सुरक्षित करा
क्युपेम तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पुरुष भात शेती करतात, तर महिला भाजीपाला उत्पादन घेतात. येथील महिला बचत गटांनी ‘आत्मा’ अंतर्गत कृषी प्रशिक्षणे पूर्ण केली. आता हा महिला बचत गट भात शेतीमध्येही उतरला आहे. गोव्यामध्ये वातावरण बदलामुळे पावसाचे प्रमाण आणि नद्यांचे पूरसुद्धा वाढले. या राज्यात नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आज या सर्व नद्या पृष्ठभागावर आल्या की उधाणतात. पूर्वी जो पूर २४ तासात उतरत असे, आता तो चार चार दिवस ठाण मांडतो. विशेषत: पॅडी, केळी, सुपारी आणि नारळ यांचे जास्त नुकसान होते. मागील दोन तीन वर्षात हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पिके वाहून गेल्यामुळे त्या जागी तण जास्त वाढत आहे. शेतकऱ्यांपुढे आता हे नवीनच संकट उभे ठाकले आहे. या समस्येवर एकच मार्ग दिसतो, डोंगर सुरक्षित करण्याचा!

दक्षिण गोव्यामधील बारसेम गावच्या विशाखा विठोबा वेलीत या महिला शेतकऱ्याची याबाबतची यशोगाथाही बोलकी आहे. त्यांनी स्वतःच्या ७ एकर शेतीमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला घेतात. डोंगर उतारावर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि पायथ्याशी एसआरआय पद्धतीने भात शेती हे त्यांचे प्रारूप गोव्यात आज खुपच प्रसिद्ध झाले आहे. भाजीपाल्यामध्ये मिरची, भोपळा, बटाटा, सुरण, आले यांचे उत्पादन घेतात. मिरच्यांची रोपे तयार करून प्रोट्रेमधून विकली जातात. सोबत खोबरेल तेल निर्मिती, मधमाशी पालन आणि फणसापासून विविध उत्पादने तयार करतात. त्यांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेसोबतच मोठमोठ्या शहरातही विक्री केंद्रे सुरु केली आहेत.

वातावरण बदलास सामोरे जाताना सर्व प्रथम परिसरातील डोंगर सुरक्षित करणे गरजेचे आहे. ते हिरव्या आच्छादनाने झाकले गेले तरच नद्या उगमापासूनच शांतपणे वाहू शकतात. आपल्या कोकणामधील डोंगर काजू लागवडीसाठी उद्ध्वस्त होत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात उघडी पडलेली माती मोठमोठे दगड, धोंडे, खडक घेऊन खाली येते. यामुळे वाहणाऱ्या नद्या भूपृष्ठावर येताच त्यांचे पात्र बदलू लागतात. गोव्याच्या या शेतकऱ्यापासून डोंगराचे रक्षण कसे करावे हे आपणास शिकता येते. मागील पावसाळ्यात कोकणामधील डोंगर पायथ्याशी असलेली भात शेती पूर्णपणे वाहून गेली. मात्र गोव्यामध्ये ती स्थिर राहिली. त्यास कारण ‘आत्मा’ने त्यांच्या शेती तंत्रज्ञानामध्ये केलेला बदल होय.

प्रथम सिंमेटीकरण थांबवा...
नेस्टर रँगल या संगणक अभियंत्याने आपले पणजी येथील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे स्टोअर बंद केले. आपल्या सेंट इस्टेवाम या गावातील ५०० कुटुंबांना एकत्र घेत शेतीला सुवर्णयुग मिळवून दिले. या गावातील जमीन नापीक असल्याचे सांगत त्यावर कोळसा वाहतुकीचे रस्ते आणि साठे करण्याचा व्यावसायिकांचा मानस होता. तो त्यांना नेटाने खोडून काढला. स्वतः सात एकर शेती करताना फादर डायस यांच्या विनंतीवरून २०१८ मध्ये अन्य शेतकऱ्यांना सोबत घेत सामुदायिक शेतीचा प्रयोग राबवला. २०१७-१८ पर्यंत गावातील ५ लाख चौमी क्षेत्र भात लागवडीखाली आले होते. ते २०१९-२० पर्यंत वाढून दुप्पट झाले. त्याला यांत्रिकीकरणाचे जोड दिली. सामुदायिक शेतीमुळे बाजारपेठ शेताच्या बांधावर आली आहे. येथील मांडवी नदीमधील निसर्गसुंदर बेट वाचवण्यासाठी प्रयत्न केले. नेस्टर यांची स्वतःची शेतीही ४० एकरवर पोचली आहे. त्यात काजू बरोबरच ७०० आंब्याचे वृक्ष आहेत. ही वातावरण बदलाला उत्तर देणारे प्रयोग आहेत.

Agriculture on Hills
अनधिकृत मासेमारीला ‘समुद्र कन्यां’चा लगाम

त्यांची एकच घोषणा होती- ‘कॉंक्रीट जंगल ते सदाहरित जंगल!’
ही घोषणा त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. २०२१ मध्ये या अभियांत्रिकी पदवीधराने आपले गाव म. गांधीच्या स्वप्नामधील गावाप्रमाणे आदर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, ‘‘वातावरण बदलास सामोरे जायचे असेल तर प्रथम सिंमेटीकरण थांबवा. एकाच पिकावर अवलंबून राहू नका. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्या. ती तुमचे जीवन सुखमय करेल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com