Crop Nutrition : वनस्पतींमधील अन्नद्रव्यांची कार्ये, कमतरतेची लक्षणे

वनस्पतीला वाढीसाठी आणि तग धरण्यासाठी सुमारे १७ अन्नद्रव्ये लागतात. त्यातील प्रमुख नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनच घटकांचा पुरवठा शेतकरी सामान्यतः रासायनिक खताद्वारे करतात.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

आकाश दि. लेवाडे

वनस्पतीला वाढीसाठी (Plant Growth) आणि तग धरण्यासाठी सुमारे १७ अन्नद्रव्ये (Nutrients) लागतात. त्यातील प्रमुख नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphate) आणि पालाश (Potash) या तीनच घटकांचा पुरवठा शेतकरी सामान्यतः रासायनिक खताद्वारे (Chemical Fertilizer) करतात. मात्र दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी बहुतांश सर्व अन्नद्रव्ये पिकांना आवश्यकतेनुसार पुरवणे आवश्यक असते. अन्यथा, पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. वनस्पतींच्या शरीरक्रियेमध्ये ही अन्नद्रव्ये कोणते कार्य करतात आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे यांची माहिती घेऊ.

अन्नद्रव्ये म्हणजे काय?

झाडांच्या वाढीसाठी, विकासासाठी, प्रजननासाठी आणि उत्पादकतेसाठी आवश्यक रासायनिक घटक म्हणजे अन्नद्रव्ये होय.

आवश्यक प्रमाणानुसार अन्नद्रव्यांचे वर्गीकरण

१. पिकांना अधिक प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये (बृहत्)

२. पिकांना अत्यंत कमी प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये (सूक्ष्म) - यांची गरज झाडांना थोडी फार कमी प्रमाणात लागते.

अन्नद्रव्यांचे वर्गीकरण

१. बृहत् अन्नद्रव्ये (मॅक्रो न्यूट्रिएन्टस)

अ. अखनिज अन्नद्रव्ये – कार्बन (C) , हायड्रोजन(H), ऑक्सिजन (O)

ब. प्राथमिक अन्नद्रव्ये – नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K)

क. दुय्यम अन्नद्रव्ये – कॅल्शिअम (Ca), मॅग्नेशिअम (Mg), गंधक(S)

२. सूक्ष्म अन्नद्रव्ये (मायक्रो न्यूट्रिएन्टस)

लोह (Fe), मंगल (Mn), जस्त (Zn), बोरॉन (B), मोलाब्द (Mo), तांबे (Cu), क्लोरिन (Cl), निकेल (Ni)

या प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकाच्या शरीरक्रियेमध्ये एक विशिष्ट कार्य असून, पिकांना त्यांची गरज कमी अधिक प्रमाणात भासते.

अन्नद्रव्याचे शरीरप्रक्रियेतील कार्ये ः

नत्र

१) रोपट्याच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक.

२) प्रथिने, हरितद्रव्ये, विकर यांच्यामधील मूलभूत घटक.

३) प्रकाश संश्‍लेषणामध्ये महत्त्वाचे योगदान असते.

स्फुरद

१) मुळांच्या वाढीसाठी आवश्यक.

२) वनस्पतीला शक्ती प्रदान करते.

३) फांद्या, फूल, फळ, प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि एकूणच वनस्पतीच्या वाढीसाठी प्रोत्साहन देते.

पालाश

१. वनस्पतीला पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती प्रदान करते.

२. वनस्पतीला कीड-रोग तसेच अन्य जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची शक्ती देते.

३. पर्णरंध्राचे नियमन करून बाष्पोत्सर्जनाचे नियंत्रण करते.

४. पोषक द्रव्ये आणि साखरेचे वहन करते.

५. वनस्पतीच्या खोडांना ताठरता प्रदान करते.

कॅल्शिअम –

१) पेशी भित्तिकेतील महत्त्वाचा भाग, त्यामुळे प्रत्येक पेशी वेगळी राहते.

२. वनस्पतीची मुळांची प्रणाली विकसित करते.

३) फळांच्या व बियांच्या पक्वतेसाठी मदत करते.

गंधक –

१. प्रथिने व अमिनो आम्लाच्या उत्पादनासाठी आवश्यक घटक.

२. विविध जीवनसत्त्वांच्या उत्पादनासाठी मदत करते.

३. प्रकाश संश्‍लेषणास मदत करते.

४. वनस्पतींमध्ये सुवासिक द्रव्यांचे प्रमाण वाढीसाठी आवश्यक.

Crop Protection
Orange : संत्रा उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

मॅग्नेशिअम –

१. हरितद्रव्यांचा अविभाज्य भाग.

२. पानांना गडद हिरवा रंग प्रदान करणे.

३. वनस्पतींमध्ये मेद, कर्बोदके व जीवनसत्त्वे तयार करण्यासाठी

मदत करणे.

४. नत्र, स्फुरद व गंधकाच्या शोषणासाठी वनस्पतीला मदत करणे.

बोरॉन –

१. पेशी भित्तिकांना शक्ती प्रदान करून, त्यांचा विकास करणे.

२. कॅल्शिअमचे वहन व विद्राव्यता वाढविण्यासाठी वनस्पतींना मदत करणे.

३. नवीन पेशी व उतींच्या निर्मितीसाठी आवश्यक.

४. शर्करेचे वहन करण्यासाठी आवश्यक.

५. परागीकरणासाठी तसेच परागकणांची प्रजननक्षमता टिकविण्यासाठी आवश्यक.

लोह –

१. हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक.

२. बरीचशी विकरे आणि अमिनो आम्लांच्या निर्मितीमध्ये मदत करते.

मंगल –

१. प्रथिने निर्मिती व नत्राच्या एकरूपतेसाठी आवश्यक घटक.

२. बियाण्यांची उगवणशक्ती वाढविणे.

३. हरितद्रव्य निर्मितीमध्ये योगदान करणे.

मोलाब्द –

१. नत्र स्थिरीकरणासाठी आवश्यक घटक.

२. वनस्पतीद्वारा नत्राच्या एकरूपतेसाठी आवश्यक.

३. नत्र आधारित प्रथिनांच्या निर्मितीमध्ये मदत करणे.

क्लोरीन –

१. वनस्पतींच्या पेशीमध्ये हवा व पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते.

२. प्रकाश संश्‍लेषणात मदत करते.

३. पर्णरंध्रांचे नियमन करणे.

तांबे –

१. वनस्पतींच्या श्‍वसन आणि प्रकाश संश्‍लेषणामध्ये उत्प्रेरक.

२. हरितद्रव्ये उत्पादनामध्ये मदत करणे.

३. विविध विकरे सक्रिय करणे.

जस्त –

१. वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक संप्रेरकांची निर्मिती करणे.

२. विविध विकरे, प्रथिनांच्या संश्‍लेषणासाठी मदत करणे.

Crop Protection
Nutrient : चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापन

अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

नत्र –

१. झाडांची खालील पाने ‍पिवळी होतात.

२. मुळांची व झाडांची वाढ थांबते.

३. पानांचा रंग पिवळसर किंवा फिकट हिरवा होतो.

४. पानांच्या कडा व टोके जळाल्यासारखी दिसतात.

स्फुरद –

१. कमतरतेची लक्षणे जुन्या परिपक्व पानांवर दिसतात.

२. पाने लांबट, हिरवट होऊन, पानांची मागील बाजू जांभळी छटायुक्त होते.

३. पाने कमी लागतात व त्यांचा आकार कमी होतो.

४. मुळांची वाढ खुंटते.

पालाश –

१. कमतरतेची लक्षणे जुन्या पानावर दिसतात, ज्यामध्ये पानांच्या कडा व टोके अगोदर पिवळसर पडतात.

२. नंतर या कडा तांबूस होऊन, पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.

३. खोड कमकुवत होते व शेंडे गळून पडतात.

४. फळांची गुणवत्ता बिघडते.

गंधक –

१. गंधकाच्या कमतरतेची लक्षणे सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात नत्रासारखीच दिसतात.

२. नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडते.

३. पानांचा व देठांचा आकार कमी होतो.

कॅल्शिअम –

१. कमतरतेची लक्षणे ही कोवळ्या शेंड्याच्या भागावरच दिसतात.

२. कळी, फुलोरा, पात्या मोठ्या प्रमाणात गळतात.

३. मुळांची विशेषत: खालच्या टोकाच्या बाजूने वाढ खुंटते.

४. पीक वेळेआधीच किंवा उशिराने फुलावर येते.

५. शेंड्याकडील पानाच्या शिरा वगळता उर्वरित भाग पिवळसर पडून नंतर पाने पांढरी दिसू लागतात.

मॅग्नेशिअम –

१. झाडामध्ये हरितद्रव्याची कमतरता झाल्यामुळे देठ, पानाच्या कडा व शिरांमधील भागांचा रंग कमी व्हायला लागतो.

२. पाने लहान आकाराची होऊन, त्यांना हळूहळू लालसरपणा यायला लागतो.

३. फांद्या, खोड ठिसूळ बनते.

तांबे –

१. शेंड्याच्या भागातील वाढ थांबते.

२. पाने गळायला लागतात.

३. खोडाची वाढ खुंटते.

बोरॉन –

१. कमतरतेची लक्षणे फक्त शेंड्याच्या भागामध्येच दिसतात.

२. नवीन येणारी पालवी देठाकडून टोकाकडे वाळायला लागते.

३. फुलगळ होते व फळांना भेगा पडतात.

मँगेनीज (मंगल) –

१. पानांची वाढ खुंटते.

२. पानांच्या शिरा हिरव्या राहतात, मात्र मधला भाग पिवळा पडायला लागतो.

३. संपूर्ण पान फिक्कट पिवळसर पडते. गळून जाते.

मोलाब्द –

१. पानांच्या खालच्या बाजूस डिंकासारखा द्रव निघतो.

२. पाने शिरा सोडून नारंगी किंवा तपकिरी रंगाच्या ठिपक्यांनी वेढली जातात.

आकाश दि. लेवाडे, ९७६३०५७५१७

(सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, पिपरी, वर्धा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com