
शेतकरी : गणेश बोचरे
गाव : कुसूर, ता. जुन्नर, जि .पुणे
एकूण शेती : २५ एकर (खंडासह)
शेवंती लागवड : १५ एकर
Floriculture पुणे जिल्ह्यातील कुसूर (ता. जुन्नर) येथील गणेश बोचरे या तरुण शेतकऱ्याने फुलशेतीमध्ये (Flower Farming) सातत्य राखले आहे. बिगर हंगामी शेवंती उत्पादनात (Shevanti Production) त्यांचा विशेष हातखंडा आहे.
स्वतःकडील ५ एकरात शेवंती लागवड करत खंडाने आणखी २० एकर जमीन घेत त्यापैकी १० एकरांत शेवंती लागवड केली आहे. सध्या एकूण १५ एकरांवर त्यांनी टप्प्याटप्प्याने शेवंतीच्या विविध वाणांचे लागवड केलेली आहे. उर्वरित १० एकर क्षेत्रात झेंडू लागवड आहे. सिंचनासाठी शेततळे आणि बोअरवेलमधील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो.
लागवड नियोजन
लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत केली जाते. त्यानंतर एकरी ४ ट्रॉली शेणखत शेतात टाकले जाते. त्यावर रोटर मारला जातो.
शेत तयार झाल्यानंतर रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातात. त्यात डीएपी १०० किलो, १०ः२६ः२६ हे १५० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये २० किलो प्रति एकर प्रमाणे जाते.
लागवडीसाठी साडेचार फूट रुंदीचे बेड तयार करून घेतले जातात. त्यावर ठिबकच्या नळ्या टाकून नंतर मल्चिंग पेपर अंथरून घेतला.
लागवडीची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर बेड साधारण १० तास चांगले भिजवून घेतले जातात.
लागवडीसाठी रोपवाटिकेत ४० दिवसांच्या रोपांची आगाऊ मागणी नोंदविली होती. त्यानुसार रोपांची उपलब्धता केली. एक रोप साधारण ३ रुपये दराने मिळते.
लागवड झिगझॅग पद्धतीने दीड बाय १ फूट अंतरावर केली जाते.
लागवडीसाठी एकरी साधारण १२ हजार रोपे लागतात.
लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बुरशीनाशकांचा वापर केला जातो. त्यानंतर ७ व्या दिवशी १९ः१९ः१९ आणि बुरशीनाशकांची आळवणी केली जाते.
नवव्या दिवशी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते.
लागवडीनंतर रोपांची चांगली वाढ होण्यासाठी रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळणे गरजेचे असते. त्यासाठी शेतात बल्ब लावत प्रकाशाची व्यवस्था करण्यात केली. यासाठी सुमारे ४५ हजार रुपयांचा खर्च आला.
लागवडीनंतर १० व्या आणि ३० व्या दिवशी रोपांना जास्त फुटवे येण्यासाठी शेंडे खुडण्यात येतात.
शेवंती पिकामध्ये प्रामुख्याने मावा, फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला जातो. शिवाय पिकामध्ये फिरून कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी निरिक्षण केले जाते.
खत, सिंचन व्यवस्थापन
शेवंती पिकामध्ये लागवडीनंतर खत आणि सिंचनाचे वेळापत्रक करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते. दर ८ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात. त्यात १९ः१९ः१९, १२ः६१ः००, ०५२ः६१ प्रत्येकी ४ किलो प्रति एकर प्रमाणे वापर केला जातो.
लागवडीनंतर २० व्या दिवसानंतर मायक्रो स्प्रिंकलर १० ते १५ मिनिटे सुरू केला जातो. जेणेकरून पिकामध्ये वाढत्या तापमानामुळे तयार वातावरणातील उष्णता कमी होईल. तसेच मावा, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव टाळला जाईल.
काढणी, विक्री नियोजन
लागवडीनंतर साधारण ५० दिवसांनी फुले काढणीस येतात. त्यानंतर दर ५ ते ६ दिवसांनी फुलांचे तोडे सुरू होतात. उत्पादित सर्व फुलांची दादर येथील फूलबाजारात विक्री केली जाते. साधारण १०० ते १२० रुपये दराने फुलांची विक्री होते.
कलकत्ता व्हाइट फुलांचे तोडे संपले आहेत. एकूण ७ तोडे झाले असून, एका तोड्यात ८०० ते १००० किलो फुलांचे उत्पादन मिळाले.
सुविधा आणि एक्स्ट्रा व्हाइट वाणाचे पाडव्यापासून उत्पादन सुरु झाले आहे. आतापर्यंत साधारण ४ तोडे झाले असून, अजून ३ तोडे होतील. दोन्ही वाणांचे मिळून साधारण ८०० ते १००० किलो फुलांचे उत्पादन मिळाले आहे.
ऐश्वर्या येलो या वाणाचा १ एप्रिल रोजी पहिला तोडा झाला असून, त्यापासून ३५० किलो फुलांचे उत्पादन मिळाले आहे. या लागवडीपासून साधारण ८ ते ९ तोडे फुलांचे उत्पादन मिळेल.
भाग्यश्री वाणाची लागवड सध्या कळी अवस्थेत आहे. आणि श्वेता व्हाइट या वाणाच्या अयोग्य दर्जाच्या रोपांमुळे त्यापासून अद्याप उत्पादन मिळाले नाही.
वाणनिहाय लागवड
शेवंती लागवडीसाठी वाण निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी फुलांचे रंग, बाजारपेठेतील मागणी, दर इत्यादी बाबी विचारात घेऊन शेवंती वाणांची निवड केली जाते.
सध्या गणेश बोचरे यांनी १५ एकरांत ६ वाणांची लागवड केली आहे. त्यात कलकत्ता व्हाइट, सुविधा, शेवंती व्हाइट, ऐश्वर्या यलो, एक्स्ट्रा व्हाइट आणि भाग्यश्री या वाणांची लागवड आहे.
वाण- क्षेत्र - लागवड तारीख
कलकत्ता व्हाइट- ३ एकर- ९ सप्टेंबर
श्वेता व्हाइट- ३ एकर- ५ ऑक्टोबर
सुविधा- १ एकर - १ नोव्हेंबर
एक्स्ट्रा व्हाइट- दीड एकर- १ नोव्हेंबर
ऐश्वर्या यलो- ३ एकर- १ जानेवारी
भाग्यश्री- ४ एकर - १० फेब्रुवारी
गणेश बोचरे, ९८९०७०७५८६ (शब्दांकन : गणेश कोरे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.