Glyphosate : ग्लायफोसेट जगभरात चर्चेत राहिलेले तणनाशक

ग्लायफोसेटचा मूळ स्रोत हा अमेरिका आहे. या देशात ग्लायफोसेटचे नोंदणीकरण १९७४ मधील आहे. अमेरिकन सरकारच्या ‘ईपीए’ (पर्यावरण संरक्षण एजन्सी) विभागामार्फत सुरक्षितता व वापर या अनुषंगाने प्रत्येक नोंदणीकृत कीडनाशकाचे फेरमूल्यांकन दर पंधरा वर्षांनी होते.
Glyphosate
Glyphosate Agrowon

ग्लायफोसेटचा (Glyphosate) मूळ स्रोत हा अमेरिका आहे. या देशात ग्लायफोसेटचे नोंदणीकरण १९७४ मधील आहे. अमेरिकन सरकारच्या ‘ईपीए’ (पर्यावरण संरक्षण एजन्सी) विभागामार्फत सुरक्षितता व वापर या अनुषंगाने प्रत्येक नोंदणीकृत कीडनाशकाचे (Pesticide) फेरमूल्यांकन दर पंधरा वर्षांनी होते.

ग्लायफोसेट सर्वांत जास्त चर्चेत आले ते अमेरिकेत गाजलेल्या घटनेने. कॅलिफोर्निया येथील सत्तर वर्षे वयाचे एडविन हार्डेमन हे मोन्सॅन्टो कंपनीच्या ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर २६ वर्षांपासून करीत होते. त्याच्या वापराने कर्करोग झाल्याच्या कारणावरून त्यांनी कंपनीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला.

Glyphosate
Sugar Factory : पुणे विभागात १८ साखर कारखाने सुरू

सॅन फ्रॅन्सिस्को जिल्हा न्यायालयाने त्यांचा दावा मान्य केला. कंपनीला त्यासाठी जबाबदार धरीत ७५ दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावला. या तणनाशकाच्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो, असा इशारा कंपनीने उत्पादनाच्या लेबलवर प्रसिद्ध केला नसल्याचा उल्लेख न्यायाधीशांनी केला. आज मोन्सॅंटो कंपनी ‘बायर’कडे हस्तांतरित झाली असली, तरी असे असंख्य खटले न्यायालयात दाखल झाले व कंपनीला त्यांना तोंड द्यावे लागले.

‘ग्लायफोसेट’ काय आहे?

मोन्सॅंटो या अमेरिकी कंपनीने (आता बायर कंपनीकडे अधिग्रहित) या तणनाशकाचा शोध लावला. सन १९७४ मध्ये हे तणनाशक बाजारपेठेत सर्वप्रथम दाखल झाले. आजगायत म्हणजे सुमारे ४८ वर्षे ते जगातील विविध देशांमध्ये लोकप्रिय झाले आहे. ‘मोन्सॅंटो’ने याच तणनाशकाला सहनशील, तसेच बीटी जनुक असलेल्या उदा. कापूस, मका, सोयाबीन आदींचे जीएम (जेनेटिकली मॉडिफाइड) बियाणे (एचटी व बीटी) बाजारात आणले.

रुंद पानांची, गवतवर्गीय तणे किंवा कोणत्याही वनस्पतीचा नाश करण्याची क्षमता असलेले हे बिनानिवडक (नॉनसिलेक्टिव्ह) तणनाशक आहे. आंतरप्रवाही असल्याने हिरव्या पानांमधून शोषले जाऊन ते मुळांपर्यंत व संपूर्ण वनस्पतीत भिनून ते वनस्पतीचा मुळासकट नाश करते. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्‍यक काही प्रथिने वा अमायनो ॲसिडसशी संबंधित संप्रेरकाच्या (एन्झाइम) कार्यात ते अडथळा आणते. परिणामी, वाढीवर परिणाम होतो.

Glyphosate
Crop Damage : तूर अन् ज्वारीलाही बसला अतिपावसाचा फटका

ग्लायफोसेटला पर्याय आहेत का?

बिनानिवडक वर्ग असा विचार केल्यास तणनाशकांचे पर्याय केवळ दोनच दिसतात. ते भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. एक आहे पॅराक्वाट क्लोराइड. मात्र ते स्पर्शजन्य आहे. आंतरप्रवाही नसल्याने तणांचा ते मुळासकट नाश करू शकत नाही. दुसरा पर्याय आहे ‘ग्लुफोसिनेट अमोनियम’चा. पण ग्लायफोसेटपेक्षा ते सुमारे दुपटीने महाग असल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढवणारे आहे. त्यामुळे ग्लायफोसेटला सक्षम पर्याय नाही असेच म्हणावे लागते.

ग्लायफोसेट सुरक्षित असल्याचा अहवाल

फेब्रुवारी २०२० मध्ये ग्लायफोसेटचा वापर व धोके याबाबत अमेरिकेत सार्वजनिक मते मागविण्यात आली. ती विचारात घेतल्यानंतर ‘ईपीए’ने अंतरिम निर्णय फेरमूल्यांकन (रिव्ह्यू) अहवाल प्रसिद्ध केला. त्याद्वारे ग्लायफोसेट हे तणनाशक ‘लेबल’नुसार वापरल्यास मानवी आरोग्यासाठी धोकादायक नसल्याचा निष्कर्षही दिला. या तणनाशकामुळे मानवी कर्करोग होण्याची शक्यता दिसत नसल्याचेही ‘ईपीए’ने म्हटले.

धोके व त्यावरील उपाय ः

तणनाशक जर फवाऱ्यांमधील तुषारांद्वारे (ड्रीफ्ट) लक्ष्य नसलेल्या (नॉन टार्गेट) सजीव घटकांपर्यंत पोहोचले तरच त्याचे पर्यावरणीय धोके राहू शकतात, असेही ‘ईपीए’ने म्हटले. हे धोके कमी करण्यासाठी उत्पादनाच्या लेबलवरील सूचनांमध्ये बदल सुचविले.

यात फवारणीचे द्रावण, तुषार अनावश्‍यक ठिकाणी न पोहोचता केवळ लक्ष्यीत ठिकाणीच पोहोचेल असे व्यवस्थापन मार्गदर्शन सांगणे, तणनाशक प्रतिकार व्यवस्थापन आदींचा समावेश केला. यातून असाही सारांश काढला, की ग्लायफोसेटचा वापर जेव्हा लेबलनुसार केला जातो, त्या वेळी त्याचे फायदे संभाव्य पर्यावरणीय जोखमींपेक्षा अधिक असतात.

‘ईपीए’च्या भूमिकेसोबतच राज्यांनी हवे

पिण्याचे पाणी व उत्पादनांतील विषारी घटकांमुळे मानवी आरोग्याला बाधा पोहोचण्याची शक्यता असेल तर तसा इशारा उत्पादनावर संबोधित करणे कॅलिफोर्निया राज्याने एका कायद्यान्वये बंधनकारक केले. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन (आयएआरसी) संस्थेने सन २०१५ मध्ये ग्लायफोसेटची वर्गवारी कर्करोगकारक रसायनांमध्ये केली होती. त्यानुसार या राज्याने हे पाऊल उचलले होते. मात्र ‘ईपीए’ने कॅलिफोर्निया राज्याचे हे नियम चुकीचे ठरवले.

ग्लायफोसेटमुळे कर्करोग होऊ शकतो, असा उत्पादनाच्या लेबलवर असलेला इशारा ग्राहकांची दिशाभूल करणारा व चुकीचा ठरू शकतो, असे ‘ईपीए’ ने म्हटले. सोबतच ‘ईपीए’ जे निष्कर्ष प्रसिद्ध करते त्यास छेद देणारी विरोधी भूमिका कोणा राज्याची असण्याची गरज नाही, असेही स्पष्ट केले.

‘ईपीए’ च्या निर्णयाला आव्हान

‘ईपीए’ने ग्लायफोसेट आणि मानवी आरोग्य व पर्यावरणीय धोके यांच्या अनुषंगाने केलेल्या विश्‍लेषण अहवालाला आव्हान देत त्याविरुद्ध अमेरिकेतील न्यायालयात याचिका दाखल झाली. नामशेष होत चाललेल्या प्रजातींविषयी असलेल्या कायद्याचे उल्लंघनही ‘ईपीए’ने केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला.

न्यायालयाने मानवी आरोग्याचा भाग स्वतंत्र ठेवून पर्यावरणीय धोक्याबाबत अधिक माहिती देण्यास ‘ईपीए’ला सूचित केले. ग्लायफोसेटमुळे मानावात कर्करोग होण्याची शक्यता नाही, हा ‘ईपीए’ने काढलेला शास्त्रीय निष्कर्ष न्यायालयाने कायम ठेवला. तथापि, न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्लायफोसेटची मानवात कर्करोग तयार करण्याची क्षमता याबाबत पुन्हा एकदा अभ्यास करून त्याचे चांगले स्पष्टीकरण करण्यासाठी ‘ईपीए’ला सुचविले. त्याचबरोबर मानवी आरोग्याच्या अन्य पैलूंबाबतही असे विश्‍लेषण करण्याची गरज पाहण्याचे सुचविले आहे.

युरोपातील स्थिती

युरोपीय महासंघ (EU) आणि युरोपातील इफ्सा, अर्थात युरोपियन फूड सेफ्टी ॲथॉरिटी’ यांच्यामार्फत ग्लायफोसेट बाबतचे परिक्षण व पुनर्नोंदणी या प्रक्रिया अखंड सुरू आहेत. ‘इफ्सा’ आणि युरोपियन केमिकल्स एजन्सी (ECHA) यांनी स्वतंत्र परीक्षण केल्यानंतर सन २०१७ मध्ये महासंघाने ग्लायफोसेटच्या वापरास पाच वर्षांसाठी वापर करण्यास संमती दिली.

Glyphosate
Glyphosate Ban : ग्लायफोसेटच्या वापराबद्दल विक्रेते आणि शेतकरी गोंधळात | ॲग्रोवन

सन २०१९ मध्ये महासंघाने ग्लायफोसेटचे फेरमूल्यांकन वा तपासणी (असेसमेंट) करण्यासाठी चार सदस्य देशांचा गट स्थापन केला. १२ डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित तणनाशक उत्पादक कंपन्यांच्या गटाने युरोपात या उत्पादनाची पुनर्नोंदणी करण्यासाठी अर्ज केला. सद्यःस्थिती सांगायची, तर युरोपीय महासंघात यंदाच्या (२०२२) १५ डिसेंबरपर्यंत ग्लायफोसेटच्या वापरासाठी संमती मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com