Grape Cracking : मणी डागाळणे, क्रॅकिंगची समस्या

सद्यःस्थितीमध्ये द्राक्ष विभागामध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये चढ-उतार दिसून येत आहे. दिवसाच्या तापमानामध्ये जास्त वाढ होत असून, रात्री व पहाटे किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून येते.
Vineyard Management
Vineyard ManagementAgrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. शर्मिष्ठा नाईक

सद्यःस्थितीमध्ये द्राक्ष विभागामध्ये (Vineyard Management) दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये चढ-उतार दिसून येत आहे. दिवसाच्या तापमानामध्ये (Day Temperature) जास्त वाढ होत असून, रात्री व पहाटे किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून येते.

काही ठिकाणी ढगाळ वातावरणही (Cloudy Weather) दिसून येत आहे. सध्या बागेत मण्याचा आकार १० ते १२ मि.मी. आणि मण्यात पाणी उतरण्याची अवस्था दिसून येईल. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असलेल्या बागांमध्ये पुढील समस्या दिसून येतात.

Vineyard Management
Vineyard Management : उकड्या : द्राक्षातील शरीरशास्त्रीय विकृती

मणी डागाळण्याची समस्या

नेमके मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत ही समस्या हिरव्या व रंगीत अशा दोन्ही प्रकारच्या द्राक्ष बागेत दिसून येते.

त्यात मण्यावर काठी किंवा दगडाने ठेचल्यासारखे चित्र दिसते. सुरुवातीच्या काळात मणी सेटिंगनंतर जेव्हा आपण मण्याची विरळणी करतो, त्या अवस्थेताल मणी एकदम बारीक (४ ते ६ मि.मी. आकाराचे) आणि नाजूक असतात.

त्यांच्या पेशी तितक्याच नाजूक असतात. त्यामुळे मणी विरळणी करतेवेळी कात्रीचे टोक थोडेसे घासले गेले तरी त्याचा परिणाम मणी डागाळण्यामध्ये होतो.

बऱ्याचदा विरळणी करणारे मजूर पूर्ण प्रशिक्षित नसल्यामुळे दुसऱ्या मण्यांना इजा होणे शक्य असते. जर बागेत फक्त काही मोजक्या ओळींमध्ये ही परिस्थिती दिसून आल्यास कात्रीच्या इजेमुळे किंवा सनबर्निंगमुळे इजा झाली असे म्हणता येईल.

काही वेळा बागेत कात्रीचा वापर झालेला नसेल किंवा वापर होऊनसुद्धा मुळीच इजा झालेली नसली तरीही मणी डागाळण्याची समस्या दिसून येऊ शकते. विशेषतः ज्या बागेत गरजेपेक्षा जास्त संजीवकांचा वापर झाला असेल किंवा ही फवारणी उन्हाच्या वेळी घेतली असल्यास मण्यात पाणी उतरतेवेळी अशी परिस्थिती दिसून येईल.

मण्यात पाणी उतरतेवेळी किंवा १५ ते २० दिवसांपूर्वी आपण बागेत एकतर मोकळे पाणी देतो किंवा बोद पूर्णपणे भिजतील असे पाण्याचे नियोजन करतो.

मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत दिवसाचे वाढते तापमान आणि वाढती थंडी, सोबत संजीवकांच्या अतिरेकामुळे यापूर्वीच मण्यावर झालेली इजा या वेळी मणी डागाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

या वेळी आपण सर्व व्यवस्थापन चांगले करूनही सनबर्निंग किंवा मणी डागाळण्याची समस्या का उद्‍भवली, हे शेतकऱ्यांना समजत नाही.

Vineyard Management
Vineyard Management : कमी तापमानामुळे उद्‍भविणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना

जर बागेत कॅनॉपी कमी असेल, अशा स्थितीमध्ये मण्यावर सतत अधिक तीव्रतेचा सूर्यप्रकाश पडत असल्यास सुद्धा डागाळण्याची समस्या दिसून येते. कमी कॅनॉपी असल्यास प्रखर सूर्यप्रकाशामुळे मण्यावर फक्त तपकिरी रंगाचे चट्टे दिसतील.

मात्र त्यावर खड्डे पडल्यासारखे दिसणार नाही. यावर काही उपाययोजना करणे शक्य नाही. रंगीत द्राक्षामध्ये मात्र हे डाग घडाला पूर्ण रंग आल्यानंतर फारसे दिसणार नाहीत. मात्र हिरव्या रंगाच्या द्राक्षामध्ये ही समस्या अधिक जाणवेल.

बरेच बागायतदार या वेळी बोरॉन, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम फवारणी करताना दिसून येतात. मात्र कोणत्याही सूक्ष्म अन्नद्रव्याची किंवा रसायनांची फवारणी हा त्यावरील उपाय नाही.

त्याऐवजी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.

द्राक्षघड कॅनॉपीच्या सावलीमध्ये घेणे.

बागेत अचानक पाणी देणे बंद करणे.

द्राक्षघड पेपरने झाकणे.

शक्य असल्यास शेडनेटचा वापर करणे.

Vineyard Management
Vineyard Management : कमी तापमानामुळे बागेत उद्‍भविणाऱ्या समस्या

दवबिंदूची समस्या

रात्रीचे तापमान ज्या भागात हळूहळू कमी होते, अशा ठिकाणी दवबिंदू सकाळी उशीरापर्यंत बागेत राहण्याची समस्या दिसून येते. धुक्याची समस्याही तितकीच जाणवते. यामुळे पाने जास्त काळ ओली राहतात. कॅनॉपीमध्ये आर्द्रता वाढते. परिणामी, डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचा प्रादुर्भाव या वेळी दिसून येतो.

खरे पाहता डाऊनीची प्रादुर्भाव वाढण्याची ही अवस्था नाही. मात्र फुलोरा अवस्थेत झालेल्या डाऊनी प्रादुर्भावाचे नियंत्रण केले असले, तरी दवबिंदूमुळे जास्त काळ ओलसर राहिलेली पाने या रोगासाठी पोषक असे वातावरण तयार करतात. मण्यात पाणी उतरण्याच्या नंतरच्या अवस्थेतील बागेतसुद्धा या अवस्थेत डाऊनीचा प्रादुर्भावम यामुळेच दिसून येतो.

या वेळी बुरशीनाशकांची फवारणी करण्याची शिफारस नसते. म्हणजेच आपल्याकडे नियंत्रणाचे कोणताच उपाय हाती नसतो. या काळात जैविक नियंत्रणाचा वापर करणे फायद्याचे ठरेल किंवा स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करणे सोईचे होईल. मात्र निर्यातीच्या दृष्टीने हेसुद्धा धोक्याचे ठरू शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

जुन्या कॅनॉपीमध्ये गर्दी असल्यास या वातावरणामध्ये वाढते तापमान आणि वाढलेली आर्द्रता हे भुरी रोगाच्या प्रादुर्भावास चांगले आमंत्रण देते. एकदा भुरी घडावर, मण्यावर आणि देठावर आल्यास देठातील रस शोषून घेणे सुरू होते.

त्यानंतर मण्याचा विकास थांबतो. ८ ते १० मि.मी. आकाराच्या मण्याच्या घडावर भुरीचा प्रादुर्भाव जेव्हा होतो, तेव्हा मण्यातील पेशींची वाढ जोमात सुरू असते. अशा वेळी जर रस शोषला गेल्यास वाढत असलेला सिंक (द्राक्षघड) अशक्त होतो, परिणामी, मण्याचा आकार तिथेच थांबतो.

उपाययोजना

जास्तीत मोकळी कॅनॉपी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

भुरी रोगाचा प्रादु्र्भाव होणार नाही, यासाठी सुरुवातीपासूनच बुरशीनाशकांच्या फवारणीचे वेळापत्रक शिस्तबद्ध असावे.

वेळोवेळी जैविक नियंत्रकांचा वापर रोगाच्या नियंत्रणासाठी फायद्याचा ठरेल.

मणी तडकण्याची समस्या

अचानक कमी झालेल्या तापमानात मणी क्रॅकिंगची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. मण्यात पाणी उतरण्याच्या १५ ते २० दिवस आधीच्या बागेत जेव्हा मणी कडक असतो, अशा वेळी ही समस्या दिसून येते. मण्यातील पेशींची वाढ चांगली व्हावी, यासाठी या अवस्थेत बरेच बागायतदारा जीएची फवारणी करतात.

सोबत बागेत मोकळे पाणी देतात. या वेळी पेशींची वाढ अगदी जोमात सुरू असते. त्या वेळी मोकळे पाणी दिल्याने कॅनॉपीमध्ये आवश्यक ती आर्द्रता निर्माण होऊन मण्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. पाणी जास्त दिल्यामुळे वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे मण्यावर जो दाब येतो, त्यामुळे मणी चिरणे किंवा तडकण्याची समस्या दिसून येते.

एकदा मणी तडकल्यानंतर पुन्हा एकतर तो मणी खराब होईल, सडेल व अन्यमणी व घडही खराब होण्याची शक्यता वाढेल. पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत मण्यात ही अवस्था फारशी दिसत नाही, या वेळी मण्याची साल लवचिक झालेली असते, त्यामुळे पाहिजे तितका दाब मण्यावर पडत नसल्याने मणी तडकणे टळते.

यावर उपाय म्हणून बरेच बागायतदार कायटोसॅनची फवारणी करत असल्याचे समजते. मात्र त्यावरील महत्त्वाची उपाययोजना म्हणजे वातावरण पाहून बागेतील पाणी कमी जास्त करणे हीच ठरू शकते.

एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी न देता हळूहळू पाणी वाढवल्यास कदाचित ही समस्या निर्माण होणार नाही. मण्याची साल लवचिक होण्यासाठी कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमची फवारणी केल्यास काही अंशी चांगले परिणाम मिळू शकतील.

डॉ. आर. जी. सोमकुंवर,

९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com