
खत व्यवस्थापन
जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी, वरील थरात भेगा पडू नये यासाठी रोटाव्हेटर करतेवेळी (पेरणीपूर्वी) चांगले मुरलेले व कुजलेले शेणखत २ टन प्रति एकर याप्रमाणे द्यावे.
शिफारशीनुसार सरळ खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची (Nutrients) मात्रा देताना प्रति एकर साधारणत: अर्धा बॅग युरिया (Urea), साधारणत: पावणेचार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व साधारणत: अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीचे (Sowing) वेळी द्यावे. यासोबतच प्रति एकर ८ ते १० किलो झिंक सल्फेट व ४ किलो बोरॅक्ससुद्धा द्यावे.
विद्राव्य खतांद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सोयाबीनचे पीक ५० दिवसांचे असताना व त्यानंतर पुन्हा ७० दिवसांचे असताना १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया याप्रमाणे फवारणी करावी. युरिया ऐवजी द्रव स्वरूपातील नॅनो युरियाचा सुद्धा वापर करता येईल. त्यासाठी फवारणीचे प्रमाण ४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे ठेवावे. शेगांमध्ये दाणे भरण्याची अवस्थेदरम्यान १९:१९:१९ हे खत २० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी अशी शिफारस आहे.
किंवा विद्राव्य खतांद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने पीक ३५ दिवसांचे असताना व त्यानंतर पुन्हा ५५ दिवसांचे होताना १० लिटर पाण्यात १३:०:४५ खत १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करण्याचीही शिफारस आहे.
उन्हाळी सोयाबीनमध्ये खरिपाच्या तुलनेमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. सुरुवातीच्या ३५-४० दिवसांच्या कालावधीत निंदण व डवऱ्याचे फेर याद्वारे तणांचे व्यवस्थापन करावे. उन्हाळी हंगामात तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.
पीक रोपावस्थेत असताना खोडमाशीची अळी तसेच मूळसड अथवा मानकुज यापासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्लोरपायरीफॉस २ मिलि अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. नॅपसॅक पंपाने नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून केवळ जोडओळींवर फवारणी करावी.
भेसळ काढणे
बीजोत्पादनामध्ये पेरलेल्या वाणाव्यतिरिक्त अन्य वाणांच्या बियाण्याची भेसळ उभ्या पिकात वेळीच काढावी. यासाठी पेरलेल्या सोयाबीन वाणाच्या झाडाच्या पानांचा आकार, पानांचा रंग व त्यावरील लव, फुलांचा रंग, खोडाचा प्रकार व खोडाचा रंग, वाढीचा प्रकार, झाडांची सर्वसाधारण उंची, शेगांचा प्रकार, शेंगावरील लव इ. प्रकारची वेगळे गुणधर्म असलेली झाडे वेळोवेळी शेतात फिरून ओळखून उपटून टाकावीत.
सिंचनाचे नियोजन
उन्हाळी सोयाबीनसाठी शाश्वत ओलिताची सोय असणे गरजेचे आहे. पिकाच्या संपूर्ण कालावधीचे साधारणत: ८-१० ओलित आवश्यक असतील.
स्प्रिंकलरने ओलित करून शेत ओलेगच्च करून, वाफसा आल्यावर पेरणी करावी. रात्रीचे कमी तापमान व थंडीचा कालावधी यामुळे सोयाबीन पिकाच्या उगवणीसाठी १०-१२ दिवस लागू शकतात.
रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेत हलके ओलित करावे. (स्पिंकलर चालू ठेवण्याचा कालावधी दीड ते दोन तास फक्त). पुढे जानेवारी मध्य ते फेब्रुवारी मध्य या दरम्यान साधारणत: १० दिवसांच्या अंतराने, फेब्रुवारी ते मार्च मध्य या दरम्यान साधारणत: प्रत्येक आठवड्याला ओलित करावे लागेल.
जसजशी उन्हाची तीव्रता वाढेल त्यानुसार गरजेनुसार दोन ओलितातील कालावधी कमी करावा.
ओलितासाठी स्प्रिंकलर चालू ठेवण्याचा कालावधी जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावा.
सिंचनासाठी संवेदनशील अवस्था ः रोपट्याची सुरुवातीची अवस्था, फुलोऱ्यापूर्वीची अवस्था, शेंगा लागण्याची अवस्था, शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था, शेंगामधील दाणे पक्वतेची पूर्व अवस्था या दरम्यान ओलित चुकवू नये.
पीक संरक्षण ः
पांढरी माशी व अन्य रसशोषक किडींना आटोक्यात ठेवण्यासाठी, सोयाबीनची उगवण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी शेतात १५ सेंमी × ३० सेंमी आकाराचे प्रति एकर किमान १२ ते १५ व कमाल ५५ ते ६० पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावेत.
पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
प्रोफेनोफॉस (५०% ईसी) २ मिलि अथवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.५% सीएस) ०.६ मिलि अथवा थायोमिथॉक्झॉम (१२.६०%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५%) (संयुक्त बुरशीनाशक) ०.२५ मिलि अथवा क्लोरॲन्ट्रानिलीपोल (१८.५% एससी) ०.३ मिलि. उन्हाळी सोयाबीन पिकांमध्ये रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यानुसार शिफारशीत बुरशीनाशकाचा वापर करावा.
कापणी आणि मळणी
सोयाबीन पिकाची कापणी कायिक पक्वतेच्या वेळी करावी. अन्यथा, शेंड्याकडील शेंगा तडकून दाणे जमिनीवर पडतात आणि नुकसान होते.
उत्पादित सोयाबीन बियाण्यासाठी वापरणार असल्यामुळे मळणी करताना मळणी यंत्राचे फेरे प्रति मिनीट (आर.पी.एम.) कमी ठेवावे. आर.पी.एम. कमी करणे शक्य नसल्यास मळणी यंत्राची पुली ॲडजेस्ट करण्याविषयी मळणी यंत्र चालकास सांगावे. मजुरांची उपलब्धता असल्यास शेंगा हाताने फोडून दाणे वेगळे केल्यास जास्त चांगले.
- जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(सहयोगी प्राध्यापक -कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.