शेतकरी पीक नियोजन : पेरू

आमची वडिलोपार्जित २० एकर शेती असून संपूर्ण क्षेत्रामध्ये पेरूच्या लखनौ ४९ या वाणाची लागवड केली आहे. आम्ही १९९५ पासून पेरूचे उत्पादन घेत आहोत.
Guava Farming
Guava FarmingAgrowon

शेतकरी ः मकरंद भास्करराव दंडवते

गाव ः राहाता, ता. राहाता, जि. नगर

पेरू क्षेत्र ः २० एकर

एकूण झाडे ः २६३०

आमची वडिलोपार्जित २० एकर शेती असून संपूर्ण क्षेत्रामध्ये पेरूच्या लखनौ ४९ या वाणाची लागवड केली आहे. आम्ही १९९५ पासून पेरूचे उत्पादन घेत आहोत. सुरुवातीला पाच एकरावर पेरू लागवड करत पुढे पुढे टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली. सध्या २० एकरांवर पेरूची सुमारे २६३० झाडे आहेत. त्यामध्ये १५ बाय १५ फूट अंतरावर सुमारे १३५० झाडे आणि उर्वरित लागवड २० बाय २० फूट अंतरावर आहे. दोन झाडांमध्ये जास्त अंतर ठेवल्यामुळे झाडांची वाढ आणि फळे पोसण्यास मदत होते.

- पेरू पिकामध्ये बहार धरल्यापासून ते काढणीपर्यंत सर्व बाबींचे काटेकोर व्यवस्थापन केले जाते. आम्ही पेरूमध्ये मृग बहर धरतो. पेरू बागेत सर्व बाबींचा अभ्यास करून काटेकोर नियोजन केले जाते.

- पेरूमध्ये एका वर्षात एकच बहर फायदेशीर ठरतो. त्यात मृग बहर पेरू उत्पादकांच्या दृष्टीने फायद्याचा मानला जातो. कारण थंडीच्या काळात फळे पोसण्यास अडचण येत नाही. त्यामुळे दर्जेदार फळनिर्मिती होते.

- पेरू झाडांची लागवड केल्यापासून साधारणपणे तिसऱ्या वर्षी उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. साधारण चौथ्या ते पाचव्या वर्षी विक्रीयोग्य उत्पादन मिळते. झाडांच्या वाढीनुसार उत्पादनात वाढ मिळण्यास सुरुवात होते.

व्यवस्थापनातील बाबी ः

- मागील हंगामातील फळांची तोड पूर्ण झाल्यानंतर बागेची स्वच्छता केली जाते.

- फळांची तोडणी झाल्यानंतर बाग ताणावर सोडण्याचे नियोजन असते.

- बहर धरण्यासाठी बाग फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत ताणावर सोडली जाते. जमीन काळी कसदार असल्याने साधारण तीन महिने बागेला ताण दिला जातो.

- झाडाचे वय, आकारमान आणि वाढीची अवस्था पाहून रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. प्रति झाड साधारण १ ते २ क्रेट शेणखत दिले जाते.

- साधारण जूनच्या शेवटी ते जुलै महिन्यात कळी फुटण्यास सुरुवात होते. कळी चांगली फुटण्यासाठी आणि फुटलेल्या कळीची वाढ चांगली होण्यासाठी शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते.

- बहर धरल्यानंतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात.

- साधारण ऑक्टोबरपासून पीक हाती येण्यास सुरुवात होते. जानेवारीपर्यंत फळे विक्री तयार होतात.

- पेरूवर प्रामुख्याने फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. फळमाशी फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाते.

- आम्ही मृग बहर धरत असल्यामुळे उन्हाळ्याच्या आधीच फळे विक्रीला येतात. त्यामुळे तीव्र उन्हाचा फळांवर विपरीत परिणाम होत नाही.

आगामी नियोजन ः

- सध्या बहर नियोजनाची तयारी सुरू असून मजुरांच्या मदतीने छाटणीची कामे सुरू आहेत. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने आंतरमशागतीची कामे केली जातील.

- साधारण मे महिन्याच्या शेवटी ते जूनच्या पहिल्या आठवड्यात झाडांचा ताण तोडला जाईल. ताण तोडताना पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाईल.

- झाडाची वाढीची अवस्था पाहून रासायनिक खतांची मात्रा दिली जाईल.

मकरंद दंडवते, ९४२०८०००७४ (शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com