अन्नपदार्थांमधील भेसळ शोधण्याच्या घरगुती पद्धती

थोडा अधिक फायदा मिळवण्यासाठी अनैतिक मार्गाने अन्नपदार्थामध्ये भेसळ करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे एखाद्या पदार्थाची गुणवत्ता कमी होतानाच त्याचे वजन किंवा आकारमान वाढवले जाते. ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे टाळण्यासाठी अन्नातील भेसळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
अन्नपदार्थांमधील भेसळ शोधण्याच्या घरगुती पद्धती
Milk AdultrationAgrowon

डॉ. सचिन एकतपुरे, अनिता परदेशी, डॉ. अहमद शब्बीर टी. पी.

सामान्यतः अन्नातील भेसळ (Food Adulteration) शोधण्यासाठी मोठ्या प्रयोगशाळा किंवा अत्याधुनिक उपकरणांची (Modern Equipment) गरज भासते. मात्र सामान्य व्यक्तींनाही घरगुती पातळीवर अन्नभेसळ (Adulteration) ओळखणे सोपे व्हावे, या उद्देशाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची यादी तयार केली आहे. या पुस्तिकेमध्ये घरगुती पद्धतीने पदार्थांमधील भेसळ शोधण्याच्या पद्धतीविषयी माहिती घेऊ. (How To Find Food Food Adulteration)

दुधातील पाण्याची भेसळ ः

एका बशीमध्ये एक थेंब दूध घेऊन, ती तिरकी पकडावी. जर दूध शुद्ध असेल तर थेंब जागेवर थांबेल किंवा हळूहळू खाली सरकेल. सरकताना मागे पांढरा पट्टा तयार होईल. दूध भेसळयुक्त असल्यास लगेच खाली सरकेल. मागे कोणतीही खूण शिल्लक राहणार नाही.

दुधातील कपडे धुण्याच्या सोड्याची भेसळ ः

काचेच्या वाटीमध्ये दूध आणि पाणी समप्रमाणात घ्यावे. चांगले ढवळावे.

-दुधामध्ये धुण्याच्या सोड्याची भेसळ असल्यास जाड फेस तयार होईल. तो लवकर कमी होणार नाही.

-दूध शुद्ध असल्यास फेस आला तरी लगेच कमी होऊन जाईल.

दूध आणि दुग्धजन्य (खवा, चक्का, पनीर) पदार्थांमध्ये पिष्टमय पदार्थांची भेसळ ः

२-३ ग्रॅम दुग्धजन्य पदार्थांमध्ये थोडे पाणी टाकून गरम करून घ्यावे. (दुधाच्या बाबतीत पाणी टाकून गरम करण्याची आवश्यकता नाही.)

पदार्थ थोडा थंड झाल्यावर त्यामध्ये आयोडीन (जखमेवर लावायचे औषध) २ थेंब टाकावे.

दूध अथवा पदार्थाचा रंग निळा झाल्यास त्यात पिष्टमय पदार्थ आहेत असे समजावे.

लोणी, तुपामध्ये रताळे किंवा बटाट्याची भेसळ ः

एका काचेच्या वाटीमध्ये अर्धा चमचा तूप किंवा लोणी घ्या. त्यात टिंचर आयोडीनचे २ ते ३ थेंब टाकावेत.

लोणी किंवा तुपाचा रंग निळा झाल्यास रताळ्याची किंवा बटाट्याची भेसळ असल्याचे सिद्ध होते.

खोबरेल तेलामधील भेसळ

पारदर्शक काचेच्या पेल्यामध्ये खोबरेल तेल घ्यावे. ते ३० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावे. (फ्रिझरमध्ये ठेवू नका).

शुद्ध खोबरेल तेल लवकर घट्ट होते. त्यात अन्य तेलाची भेसळ असल्यास दुसऱ्या तेलाचा थर वेगळा दिसेल.

मधातील साखरेची भेसळ

काचेच्या पारदर्शक पेल्यामध्ये पाणी घेऊन, त्यात ३-४ मधाचे थेंब टाकावे. शुद्ध मध पाण्यात विरघळत नाही.

जर मध जर पाण्यात विरघळला तर त्यामध्ये साखरेची भेसळ असल्याचे समजावे.

साखर, पिठी साखरेतील खडूची भेसळ

काचेच्या पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात १० ग्रॅम पिठी साखर टाकावी. पाणी नितळ न होता पांढरे होऊन पेल्यामध्ये तळाला पांढरी भुकटी शिल्लक राहिल्यास खडूची भुकटीची भेसळ असल्याचे समजावे.

गहू पिठामध्ये लाकडी भुस्सा भेसळ

काचेच्या पारदर्शक पेल्यामध्ये पाणी घ्यावे. एक चमचा गव्हाचे पीठ चिमटीने पसरून टाकावे.

लाकडी भुस्सा भेसळ असल्यास ती पाण्यावर तरंगेल, तर शुद्ध गहू पीठ तळाला जाऊन बसते.

धान्यांमध्ये रंगाची भेसळ

पारदर्शक पेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये २ चमचे धान्य टाकावे. मिश्रण ढवळावे.

धान्यामध्ये रंगाची भेसळ असल्यास पाण्याचा रंग बदलेल.

हिंगामध्ये डिंकाची भेसळ

एक ग्रॅम हिंग पावडर पाणी असलेल्या काचेच्या पेल्यात टाकून ढवळावे. हिंग भेसळयुक्त असल्यास न विरघळता तळाला जाऊन बसेल.

शुद्ध हिंग पाण्यात मिसळून दुधाळ रंग तयार होईल.

हळदीमध्ये रंगांची भेसळ

पारदर्शक पेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये १ चमचा हळद टाकून मिश्रण ढवळावे.

हळद शुद्ध असल्यास थोडा रंग सोडेल आणि तळाला जाऊन बसेल. हळद भेसळयुक्त असल्यास तळाला बसताना खूप रंग सोडेल.

या प्रमाणेच अन्नपदार्थांच्या अन्य काही चाचण्याही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) संकेतस्थळावर (https://fssai.gov.in/) उपलब्ध आहेत. या चाचण्या केल्यानंतर आपल्याला पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास तुम्ही जवळच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे किंवा FSSAI च्या संकेतस्थळावर (https://foscos.fssai.gov.in/consumergrievance/) जाऊन तक्रार नोंदवू शकता.

लेखक ः डॉ. सचिन एकतपुरे, ९८९०२७३३३०

(लेखक भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे अंतर्गत राष्ट्रीय परामर्श प्रयोगशाळा येथे कार्यरत आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com