Soil Testing : 'यू टर्न" घेऊन एकाएकी शेतकरी कसा झालो ?

पण सगळ्या जगावर विस्तारलेली, सगळ्या जगाची तहहयात उपजशील शाश्‍वत अशी आई असते ती ही मातीच. म्हणून तिला आम्ही मातीमाय अथवा धरणी आई म्हणतो.
Soil Testing
Soil TestingAgrowon

आबाजी ऊर्फ मिलिंद रंगराव पाटील

शेताच्या चारही कोपऱ्यांतली आणि मध्यभागची अशी मिळून कोरड्या मातीची मूठ मूठभर अशी किलो दीड किलोची पिशवी घेऊन जिल्हा मृद् परीक्षण चाचणी केंद्रातल्या (District Soil Testing Centers) नोंदणी कक्षात बसलो होतो ,तेव्हा असेच काही विचार झिरपू लागले मनात. आपण नियमित माती तपासतोय, तिच्यात काय उणंदुणं आहे त्याची शास्त्रीय कुंडली काढून घेतोय, ज्या घटकांची तिच्यात कमतरता आहे त्याची भर करतोय आणि जी मुबलकता आहे त्यावर आवर घालतोय. तिला घातक विषारी घटकांच्या व्यसनात गुरफटून द्यायची नाही म्हणून सतत सजग राहतोय.

Soil Testing
Soybean Crop Management : सोयाबीन कापणी, मळणी व साठवणुकीदरम्यान घ्यावयाची काळजी

आपली माती आरोग्य संपन्न अशी समृद्ध ठेवणे हे एक सुजाण भूमिपुत्र म्हणून आपण परम कर्तव्य समजतोय. तिच्यावरच्या निस्सीम मायेपोटी तिचं जास्तीत जास्त अस्सल देशीपण टिकवण्याची मनिषा बाळगतोय. कारण आपल्याच पुढच्या पिढीच्या लेकरांची सुद्धा तीच खरी आई असणार, हे भान जिवंत ठेवायचं असतं आपल्याला. शेवटी जितीजागती माणसं काय नी त्यांना जन्म देणारी त्यांची हाडामासाची आई काय एक ना एक दिवस मातीमय होतच असतात; पण सगळ्या जगावर विस्तारलेली, सगळ्या जगाची तहहयात उपजशील शाश्‍वत अशी आई असते ती ही मातीच. म्हणून तिला आम्ही मातीमाय अथवा धरणी आई म्हणतो.

जगण्याचं भान आणि खऱ्याखुऱ्या सृजनाचं ज्ञान देता देता ही माती आपल्याला जगवण्यालासुद्धा बांधील असते. कारण अन्न या आपल्या मूलभूत गरजेची पूर्तता तीच करते. म्हणून मला मातीचं सान्निध्य हेच खरं गुरुकुल वाटतं. हिच्याजवळ राहता राहता आपल्यावरही तिने किती समृद्ध संस्करण केलंय. आपल्यातसुद्धा काय नको होतं ते घालवून जे हवं होतं ते मुबलक भरवलंय. म्हणजे एकीकडे मी तिला तपासून आणतोय आणि दुसरीकडे ती माझंसुद्धा शारीरिक, मानसिक आरोग्य संभाळत असते. माझ्या या आईच्या कानगोष्टी मला नेहमीच ओजस्वी वाटतात. पण ते ऐकायला ध्वनी ऐकण्याचे कान नव्हे तर संवेदनांची पोहोच घेणारे अंत:करणाचे कान असावे लागतात.

शहरातून इकडे शेती करायला आल्यावर हळूहळू मला तिच्या गोष्टी ऐकण्याची सवय लागली. त्यातूनच माझं जीवन आमूलाग्र बदललं. या जन्माच्या मध्यावरच मी माझी शहरी ओळख पुसून अगदी यू टर्न घेऊन एकाएकी शेतकरी झालो. गाववासी झालो. या बदललेल्या प्रारब्धामुळे मला मातीला जपण्याचं भाग्य लाभलं, नाहीतरी हे काम शेतकरी वगळता दुसरं कोण करतो आजकाल जगात? मी भरपूर पाहिलंय तिकडे भौतिक सुधारणावाद्यांच्या वसाहतींमध्ये त्यांच्या घराच्या अंगणातली माती पायाने घरात येते नी हॉलमधली शायनिंगवाली किमती फरशी घाण दिसते म्हणून मातीलाच आम्ही गाडून टाकतो.

इतकी आयुष्यातून मातीला वर्ज्य करून टाकलीय तिकडे आपण. पण इकडे येऊन आपण तिचा जसा आब ठेवलाय, तिची जशी श्रीमंती वाढवली तसंच तिनं सुद्धा मला कितीतरी जपलं आहेच. समृद्ध केलं आहे. या मातीनंच मला नवी दिशा दिली. आणि नैसर्गिक चैतन्याची ओळख दिली. जीवनाला एक शिस्त, सजगता दिली. जगताना शांतता टिकवण्याचा मंत्र दिला. समाधानात राहायची शिकवण दिली. भिरभिर हव्यासाला लगाम दिले नी एकूणच सश्रम अशा एकांतवासात माणूस म्हणून जगण्याचं नवं भान दिलं. काय होतो मी हिच्या सान्निध्यात येण्याआधी आणि आता नेमका कसा झालोय? कुतूहलापोटी फावल्या वेळात कधी कधी स्वतःचीच ‘सोनं’ ग्राफी करत बसतो मी...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com