
ढगाळ वातावरण, पावसाची (Rain) उघडझाप आणि चुकीच्या व्यवस्थापनामुळे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव (Outbreak Of Sucking Pest On Cotton) झालेला आहे. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र (Cotton Research Center) आणि परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने रसशोषक किडींच्या यांत्रिक, मशागतीय, जैविक आणि रासायनिक नियंत्रणाविषयी पुढील सल्ला दिला आहे.
नियंत्रणाचे उपाय करताना कीड अचूक ओळखून, निरीक्षण करुन कीड व्यवस्थापनाचा निर्णय घ्यावा. त्यानंतर कीड व्यवस्थापन पद्धतीची निवड करुन प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवता येते.
यांत्रिक पद्धतीनं नियंत्रण कसं करायचं ?
- रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेली कापसाचे गळालेली पाते आणि बोंडे जमा करून नष्ट करावीत.
- पिठ्या ढेकणाचे व्यवस्थापन करताना फक्त प्रादुर्भावग्रस्त पिकावर फवारणी करावी अथवा प्रादुर्भावग्रस्त भाग किडीसहित काढून नष्ट करावा.
- पिवळ्या रंगाला पांढऱ्या माशा आकर्षित होऊन चिकटतात. म्हणून पिवळे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावेत.
- गुलाबी बोंड आळीग्रस्त डोमकळ्या दिसल्यास आतील अळीसहित त्या नष्ट कराव्यात.
- हेक्टरी चार ते पाच कामगंध सापळे लावावेत.
- कपाशीच्या शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे उभे करावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या टिपून खातील.
किड नियंत्रणाच्या मशागतीय पद्धती कोणत्या आहेत?
- जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा.
- शिफारशीनुसार दोन ओळीतील व दोन रोपांतील अंतर ठेवावे.
- मित्र कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके, मिश्र पिके घ्यावीत. कपाशी पिकाभोवती झेंडू आणि एरंडी या सापळा पिकांची एक ओळ कडेने लावावी.
जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करायचे?
- जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी ढाल किडा म्हणजेच लेडीबर्ड बीटल या कीटकाचे प्रौढ व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात. म्हणून पिकावर मावा किडी सोबत लेडी बर्ड बीटल पुरेशा प्रमाणात आढळून आल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.
- कपाशीवरिल किडीचे नैसर्गिक शत्रू किटक उदा. सिरफीड माशी, पेंन्टाटोमीड ढेकूण, कातीन, भुंगे, ड्रॅगनफ्लाय, रॉबर माशी, गांधील माशी, प्रार्थना कीटक, टॅकनिड माशी इ. मित्र किटकांचे संवर्धन करावे.
- वनस्पतीजन्य आणि जैविक किटकनाशकाचा वापर करावा. पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरेक्टीन दहा हजार पीपीएम १० मिली किंवा १५०० पीपीएम २५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पिठ्या ढेकणासाठी व्हर्टिसिलीयम बुरशीची ४० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकेः
निंबोळी तेल (५ टक्के) ५० मिली किंवा फ्लोनीकॅमीड (५० डब्ल्यू जी) २ ग्रॅम किंवा डायफेन्थुरॉन (५० डब्ल्यू पी) १२ ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ एस सी ३० मिली किंवा पायरीप्रोक्झीफेन (५ टक्के) + डायफेन्थुरॉन (२५ टक्के एस इ) २० मिली या किडनाशकांची दिलेल्या प्रमाणात प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.