Soil Management : चुनखडीयुक्त जमीन कशी सुधाराल?

जमिनीत चुनखडीचे आणि आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांच्या वाढीस व अन्नद्रव्य पुरवठा प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात.
Soil Management
Soil Management Agrowon

जमिनीत चुनखडीचे (Limestone) आणि आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांच्या वाढीस व अन्नद्रव्य पुरवठा प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात.

सिंचन क्षेत्रात हलक्‍या जमिनीत मुक्त चुन्याचे कण पृष्ठभागाखालील मुरमाच्या थरात जाऊन साठतात, तर चोपण जमिनीत (सामू ८.५ पेक्षा जास्त असलेल्या) जमिनीतील खालच्या थरात चुनखडीचे थर दिसून येतात.यालाच शेतकरी शेड किंवा शाडू लागला असे म्हणतात.

असे चुनखडीचे थर जमिनीतील एक मीटरच्या आत दिसून आल्यास अशी जमीन फळबाग लागवडीसाठी योग्य नसते.

अशा जमिनीत फळबागेचे आयुष्य कमी राहते. उत्पादकता कमी होते. म्हणून फळबागेच्या  लागवडीसाठी खड्डे करताना मातीच्या थरांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवाव.

असे चुनखडीचे थर १५ सेंमी पेक्षा जास्त रुंदीचे व एक मीटरच्या आत साठलेले नसावेत. अशा जमिनीत फळबाग लागवड यशस्वी होत नाही.

चुनखडीयुक्त जमिन व्यवस्थापनासाठी कोणते उपाय योजावेत याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.    

Soil Management
Soil Management : चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखायची?

चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा  

जमिनीची खोलवर नांगरट करावी.

जमिनीत सेंद्रिय खते शिफारस केल्याप्रमाणे दरवर्षी टाकावीत. शेणखताचा अपुरा पुरवठा असल्यास ताग, धैंच्या आणि चवळी यासारखी हिरवळीची पिके पेरून ती ४५ ते ५० दिवसांत जमिनीत गाडावीत.

रासायनिक खते पृष्ठभागावर फेकून न देता ती दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत, अथवा मातीआड करावीत.

भाजीपाला अथवा फळपिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते कुजलेल्या शेणखतात आठवडाभर मुरवून द्यावीत. किंवा जीवामृतात टाकून आठवडाभर मुरवून वाफशावर उभ्या पिकांना द्यावे.

स्फुरद विरघळवणाऱ्या जैविक खतांचा वापर बीजप्रक्रियेद्वारे अथवा शेणखतात मिसळून करावा.

Soil Management
Soil Fertility : जमीन सुपीकतेवर द्या लक्ष

रासायनिक खतांचा वापर करताना माती परीक्षणाद्वारे मात्रा ठरवावी. त्यातील नत्र हे अमोनियम सल्फेटच्या, तर स्फुरद डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी)च्या स्वरूपात द्यावे आणि पालाश अन्नद्रव्ये शक्‍यतो सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे पिकांना द्यावीत.

जमिनीत मॅग्नेशिअम सल्फेट एकरी १० ते १५ किलो सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. उदा. लोहासाठी फेरस सल्फेट हेक्‍टरी २५ किलो, झिंक कमतरतेसाठी झिंक सल्फेट हेक्‍टरी २० किलो, बोरॉनसाठी बोरॅक्‍स ५ किलो प्रतिहेक्‍टरी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड नं. १) हेक्‍टरी २५ किलो या प्रमाणात जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून विविध पिकांना द्यावीत.

पिकांवर कमतरतेची लक्षणे (उदा. शेंड्याकडील पाने पिवळी पडणे, लहान आकाराची दिसणे, शेंडा जळणे) दिसून येताच, सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड नं. २) ची फवारणी आठ दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी. किंवा चिलेटेड स्वरूपात लोह, जस्त बाजारात उपलब्ध आहे, त्याच्या ०.१ ते ०.२ टक्के याप्रमाणे फवारण्या कराव्यात.

चुनखडीयुक्त जमिनीत सिंचनाची सोय ठिबकद्वारे करावी. नगदी फळपिकांना ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा.

चुनखडीयुक्त जमिनीत सहनशील पिकांची लागवड करावी. उदा. कापूस, गहू, ऊस, सोयाबीन, बाजरी, सूर्यफूल, तूर, भुईमूग, सीताफळ, अंजीर, आवळा, बोर, चिंच इत्यादी.

अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी, मळी कंपोस्ट  हेक्‍टरी ५ टन या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये नांगरटीपूर्वी जमिनीत मिसळून घ्याव.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com