
सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त परोपजीवी कीटक आणि सात हजारांपेक्षा जास्त परभक्षी कीटकांच्या प्रजाती आहेत. तसेच पाचशेपेक्षा जास्त विषाणू, जिवाणू आणि इतर रोगांच्या प्रजाती किडींचे शत्रू म्हणून कीटक विश्वात कार्यरत आहेत.
त्यापैकी जैविक कीडनाशके म्हणून विकसित झालेल्या घटकांची निर्मिती व पुरवठा कृषी विद्यापीठे आणि खासगी कंपन्यांद्वारे केला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याद्वारे विकसित केलेली उपयुक्त जैविक कीडनाशके पुढीलप्रमाणे.
ट्रायकोग्रामा हा गांधील माशीसारखा दिसणारा परोपजीवी कीटक असून, त्याचा आकार अतिशय लहान म्हणजेच ०.४-०.७ मि.मी.असतो. जैविक कीड नियंत्रणासाठी वापरण्यात येणारा प्रमुख किटक म्हणून ट्रायकोग्रॅमा मित्र किटकाची ओळख आहे.
या ट्रायकोग्रॅमाच्या ८० हून अधिक प्रजाती आहेत. हा मित्र किटक सर्व प्रकारच्या वातावरणात आढळून येतो. हा किटक आकाराने अतिशय लहान असून प्रौढ ट्रायकोग्रॅमा मित्र किटक अंडी अवस्थेतच किडींचे नियंत्रण करतो.
ट्रायकोग्रामा शेतात फिरून पिकांचे नुकसान करणाऱ्या अळ्यांची अंडी शोधून त्यात स्वत:चे अंडे टाकतो. ट्रायकोग्रामा चिलोनिस, ट्रायकोग्रामा बॅक्ट्री, ट्रायकोग्रामा जापोनिकम व ट्रायकोग्रामा प्रिटिऑसम या ट्रायकोग्रामाच्या जाती उपयोगी ठरतात.ट्रायकोग्रामाचे कार्ड कापूस, ज्वारी, मका, उस, टोमॅटो, भेंडी, वांगे या पिकांमध्ये पेरणीपासून ४०-४५ दिवसांनी २-३ कार्ड प्रति एकरी वापरावे.
ट्रायकोग्रामा कार्ड्स चा वापर कसा करतात?
पोस्टकार्ड सारख्या ११ x १७ सेंमी कागदावर धान्यामध्ये जाळी करणाऱ्या पतंगाची सुमारे १८ हजार ते दोन लाख अंडी चिटकवलेली असतात. त्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा अति चिमुकला म्हणजे मुंगीच्या एक चतुर्थांश इतका लहान परोपजीवी कीटक असतो. या कार्डचे २० तुकडे होतात. '
एक गुंठा क्षेत्रात एक तुकडा वा पट्ट्या म्हणजे १० मीटरच्या आडव्या उभ्या अंतरावर स्टेपलरच्या साह्याने पानाखाली टाचतात. यांचा भात, मका, उसावरील खोड किडी, कपाशीवरील बोंड अळ्या, भेंडी, टोमॅटो तसेच वांगीवरील फळे पोखरणाऱ्या किडींच्या अंड्यांचा नाश करण्यासाठी उपयोग होतो.
म्हणजे कार्डच्या एका तुकड्यातून सुमारे एक हजार परोपजीवी कीटक बाहेर पडून ते किडीच्या अंड्यातच त्यांची अंडी घालून त्यात वाढतात. अशा प्रकारे किडींच्या अंड्याचा नाश होतो.
हेक्टरी साधारण कपाशीसाठी १० तर अन्य पिकांसाठी ३.५ कार्डस प्रति प्रसारणासाठी वापरतात. अशी ४ ते ६ प्रसारणे एका आठवड्याच्या अंतराने करावयाची असतात.
या काळात रासायनिक कीडनाशकांचा वापर करू नये. प्रति कार्डची किंमत ५० ते ७० रुपये असते. कार्ड घेताना परोपजीवी निघण्याची तारीख तपासून पाहावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.