Millet : ओळख भरडधान्याची

एकेकाळी बहुतांश ग्रामीण भागामध्ये ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि भाजी असा रोजचा आहार होता.
Ragi
RagiAgrowon

प्रीतम भुतडा, डॉ. एल. एन. जावळे, डॉ. जी. एम. कोटे

भारत सरकारने (Central Government) घेतलेल्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने २०२३ हे जागतिक भरड धान्य वर्ष (Millet Year) म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे शासनातर्फे भरडधान्यांचा प्रसार व आहारातील वापर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे नियोजन होत आहे.

भरडधान्य हा शब्द जरी अनेकांना नवीन वाटत असला, तरी यातील अनेक अन्नधान्ये आपल्या पारंपरिक अन्नामध्ये होती व त्यातील काही अद्यापही आहेत. पोषक असलेली अनेक भरडधान्ये ही कोरडवाहू शेतीमध्ये चांगल्या प्रकारे रुजली होती.

मात्र बहुतांश पिके लागवडीतून, तर धान्य बाजारातून कमी होत चालली आहेत. वास्तविक ही भरडधान्ये बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांसाठी, तर ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत.

एकेकाळी बहुतांश ग्रामीण भागामध्ये ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि भाजी असा रोजचा आहार होता.

मात्र शहरीकरणाचा वाढता प्रभाव आणि गहू, तांदळाची सार्वजनिक अन्नधान्य केंद्रासह बाजारात होत गेलेली उपलब्धता यामुळे गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांच्या आहारामध्ये गेल्या काही वर्षांत गहू, तांदळाच्या पदार्थांचे प्राबल्य दिसून येते.

विशेष म्हणजे ही दोन्ही पिकांना पाणी, जमीन अधिक लागते. त्याच प्रमाणे विशिष्ट हवामानही आवश्यक असते. पाण्याची कमी होत चाललेली उपलब्धता लक्षात घेता या धान्यांना आपल्या पारंपरिक कोरडवाहू, कमी निविष्ठा लागणाऱ्या पिकांचा पर्याय देण्याची आवश्यकता निर्माण होत चालली आहे.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ही भरडधान्ये पोषकतेच्या बाबतीत कोठेही कमी नाहीत. उलट अनेक बाबतीमध्ये ही धान्ये अधिक आरोग्यपूर्ण ठरतात. या पिकांची आज आपण ओळख करून घेऊ.

Ragi
Millet Crop Cultivation : कोरडवाहू शेतीसाठी भरडधान्य लागवड फायदेशीर

विविध भरडधान्ये ः

बाजरी (Pearl millet)

शास्त्रीय नाव : पेन्नीसेट्म ग्लायुकम (Pennisetum glaucum)

उगम स्थान : आफ्रिका

प्रमुख राज्ये : राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाना

कोदरा (Kodo Millet)

शास्त्रीय नाव : पास्पॅलम स्क्रोबिक्युलॅटम (Paspalum scrobiculatum)

उगम स्थान : भारत

प्रमुख राज्ये : मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तमिळनाडू

रागी / नाचणी (Finger Millet)

शास्त्रीय नाव : इल्यूसिन कोरॅकाना (Eleusine coracana)

उगम स्थान : आफ्रिका

प्रमुख राज्ये : राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू

चीना (Proso Millet)

शास्त्रीय नाव : पानिकम मिलियासियम (Panicum miliaceum)

उगम स्थान : चीन

प्रमुख राज्ये : तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड

कुटकी (Little Millet)

शास्त्रीय नाव : पानिकम सुमाट्रेन्स (Panicum sumatrense)

उगम स्थान : भारत

प्रमुख राज्ये : मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान.

कुरी (Browntop Millet)

शास्त्रीय नाव : ब्रॅचियारिया रॅमोसा (Brachiaria ramosa)

उगम स्थान : दक्षिण पूर्व आशिया

प्रमुख राज्ये : कर्नाटक आणि आंध्र प्रदेश,

ज्वारी (Sorghum)

शास्त्रीय नाव : सोरघम बायकलर (Sorghum bicolor)

उगम स्थान :आफ्रिका

प्रमुख राज्य : महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थान

सांवा (Barnyard Millet)

शास्त्रीय नाव : इकाईनोक्लोओ फ्रुमेंटेसिया ----- (Echinochloa esculenta ?)

उगम स्थान : चीन

प्रमुख राज्ये : तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान

कंगणी (Foxtail Millet)

शास्त्रीय नाव : सेटारिया इटालिका (Setaria italica)

उगम स्थान : चीन

प्रमुख राज्ये : आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि राजस्थान

राजगिरा (Rajgira)

शास्त्रीय नाव : ॲमरन्थस क्रुयंटस (Amaranthus cruentus)

उगम स्थान : मेक्सिको

प्रमुख राज्ये : केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्र

Ragi
Millets Year 2023: भरडधान्य आहारात महत्त्वाची का आहेत?

भरडधान्याचे आरोग्यासाठी महत्त्व ः

१) आहारात भरडधान्यांचा वापर करत असल्यास पोटात आम्ल (ॲसिड) तयार होत नाही. उलट ते प्रोबायोटिकसारखे काम करते.

२) त्यात भरपूर फायटोकेमिकल्स ( Phytochemicals) आहेत. त्यात ग्लुटेन नसल्यामुळे त्यामुळे होणाऱ्या विविध ॲलर्जीपासून बचाव होतो.

३) भरडधान्ये नियमित खाण्यात असल्यास रक्तातील शर्करा (triglycerides, C- reactive Protein) कमी होत जाते. परिणामी, हृदयरोगाची शक्यता कमी होते.

४) सर्वच भरडधान्यामध्ये भरपूर तंतुमय पदार्थ (फायबर) आहेत. त्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य अबाधित राहते.

५) त्याच प्रमाणे ही धान्ये सावकाश पचत असल्याने दीर्घकाळ पोहोच भरल्याची भावना राहते. परिणामी, सतत व अतिखाण्याची समस्या असल्यास किंवा स्थौल्यत्वाची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी ही भरडधान्ये अत्यंत मोलाची ठरू शकतात.

६) भरडधान्यामध्ये प्रथिने १२ टक्के, चरबी (फॅट) २ ते ५ टक्के, कर्बोदके ६५ ते ७५ टक्के, तर १५ ते २० ग्रॅम तंतुमय पदार्थ असतात. याशिवाय त्यात अँटिऑक्सिडंट, क्षार व जीवनसत्त्वेसुद्धा मुबलक आहेत. म्हणून भरडधान्ये पचायला हलकी आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही फारच उत्तम ठरतात. त्यामुळे ती रोजच्या आहारातही वापरायला हरकत नाही.

शेतीमध्ये पीक म्हणून भरडधान्यांचे महत्त्व ः

१) पाश्‍चात्त्यांच्या सलग आणि एक पीक पद्धतीमुळे भारतामध्येही शेतीतील समृद्ध जैवविविधता कमी झाली आहे. काही ठरावीक आणि एकसुरी पीक पद्धतीकडे शेतकरी वळले आहेत.

२) पूर्वी शेतीमध्ये, बांधावर किंवा परिसरातील मोकळ्या जागांमध्ये असलेल्या अनेक उपयुक्त वनस्पती किंवा पिके आता लुप्त झाली आहेत.

३) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बहुतांश भरडधान्ये ही कमी ते जास्त पावसाच्या प्रदेशात, हलक्या ते कमी प्रतीच्या जमिनीतही उगवतात. म्हणून ती कोरडवाहू शेतीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

४) तुलनेने काटक असल्याने बहुतांश भरडधान्य पिकांसाठी कोणत्याही वरखतांची आवश्यकता नसते. कीड रोगाचा प्रादुर्भावही कमी असल्याने फवारण्यांची गरज भासत नाही.

५) आरोग्यपूर्ण आहारामध्ये समावेश होत असल्याने अन्नसुरक्षेसोबतच पोषकतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात.

६) कोणत्याही हवामान, मातीमध्ये त्यांचे पीक चांगले येते. अन्य कडधान्य, तेलबिया, भाजीपाला पिकासोबतही घेता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.

वाढती लोकसंख्या व बदलते हवामान, जागतिक तापमानामध्ये होत असलेली वाढ अशा स्थितीमध्ये भात आणि गहू यासारख्या पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

अशा स्थितीमध्ये एकूणच मानव जातीच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पौष्टिक अशा भरडधान्यांची लागवड अनेक अर्थाने फायदेशीर ठरू शकते. या कडबा, काड किंवा भुस्सा यांचा वापर जनावरांच्या चाऱ्यांसाठी करता येतो. काही पक्ष्यांचे हे आवडते खाद्य आहे. त्यामुळे कमी पाण्यामध्ये येणारी ही धान्ये व त्यांचा कडबा यांचा अंतर्भाव पशुपक्षिपालनामध्ये करता येणे शक्य आहे.

प्रीतम भुतडा (सहायक कृषी विद्यावेत्ता), ९४२१८२२०६६, डॉ. एल. एन. जावळे (ज्वारी पैदासकार), ७५८८०८२१५७ (ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com