Sweet Orange : फळगळीचे नेमके कारण ओळखून उपाययोजना करा

पाण्याचा ताण, संजीवकांचे असंतुलन, पोषक घटकांची कमतरता या सारख्या कारणामुळे, किंवा रोग- कीटकांच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळाची फळगळ होते.
Sweet Orange
Sweet Orange Agrowon

बदनापूर, जि. जालना : पाण्याचा ताण, संजीवकांचे असंतुलन, पोषक घटकांची कमतरता या सारख्या कारणामुळे, किंवा रोग- कीटकांच्या प्रादुर्भावामुळे (Pest Disease Outbreak) लिंबूवर्गीय फळाची फळगळ (Citrus Crop Fruit Fall) होते. त्याचे नेमके कारण ओळखून उपाययोजना करावी असे मत औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्र हिमायतबागचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (जालना-२) द्वारे दर महिन्याच्या २० तारखेला आयोजित करण्यात येणाऱ्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद बैठकीत ते बोलत होते. डॉ. पाटील म्हणाले, की मुख्यत्वे, फळ धारणेनंतर होणारी बहुतांश फळगळ वनस्पती शास्त्रीय कारणामुळे होते. ही प्राधान्याने मे-जून महिन्यात होत असल्याने जूनगळ म्हणून ओळखली जाते. साधारणपणे ०.५ ते २ सेंटिमीटर आकाराची फळे असताना ही गळ होते.

Sweet Orange
Sweet Orange : सूर्यप्रकाशाचा अभाव, सततच्या पावसामुळे वाढली फळगळ

वाढीच्या अवस्थेतील फळांमध्ये पाणी, कर्बोदके आणि संजीवकासाठी झालेल्या स्पर्धेमुळे फळगळ होते. या दरम्यान पाण्याचा ताण आणि वातावरणातील वाढलेले तापमानामुळे लहान फळे जास्त काळ टिकू शकत नाहीत. या वर्षी सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव अन् मुळांची अकार्यक्षमता यामुळे आंबिया बहराच्या मोसंबी फळांची गळ दिसून येते. प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया मंदावल्याने वाढत्या फळांना कर्बोदकाचा पुरवठा कमी होतो. त्यांच्या कमतरतेमुळे पाने, फुले आणि फळात पेशीक्षय होतो. फळवाढीसाठी कार्बन- नत्राचे संतुलन असणे गरजेचे असते. नत्रामुळे पेशीक्षय क्रिया कमी होते.

Sweet Orange
Sweet Orange : मोसंबी फळगळीवर उपाययोजना

ऑक्झिनच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. पाण्यातील एकूण नत्रापैकी अमोनिया या संयुगाची मात्रा फळाच्या निरोगी वाढीस पोषक असते. ही मात्रा शिफारसीत नत्रयुक्त खताच्या फवारणीतून वाढवता येते. अंबिया बहराची फळधारणा झाल्यानंतर मे आणि जून महिन्यात संजीवक, बुरशीनाशक व अन्नद्रव्याची फवारणी घेतलेली नसल्यास शिफारशीनुसार वेळेत व मात्रेत त्यांच्या फळे तोडणीपूर्व फवारण्या घ्याव्यात. प्रामुख्याने बोट्रिडीप्लोडिया थियोब्रोमी, कोलेटोट्रिकम ग्लोईओस्पोरिऑइड्‍स व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशी देठाद्वारे फळामध्ये प्रवेश करून पूर्ण वाढलेल्या फळाचे नुकसान करतात.

या बुरशीचा प्रसार झाडावरील जुन्या वाळलेल्या फांद्यामुळे होतो. तसेच काही किडीच्या प्रादुर्भावामुळे (उदा. काळीमाशी, मावा इ.) पानावर शर्करायुक्त चिकट पदार्थांवर बुरशी वाढते. परिणामी, पेशीक्षय होतो. एखाद्या झाडावर १० टक्के वाळलेल्या फांद्या असल्यास त्यावर २२ टक्क्यांपर्यंत फळगळ होत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः संततधार पाऊस असलेल्या स्थितीमध्ये कोलेटोट्रीकम बुरशींचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत असतो. देठ पिवळे पडणे आणि देठाजवळ काळा डाग पडणे यावर उपाय योजताना कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास खालील बाजूची फळे अगोदर सडण्यास सुरुवात होते. त्यावर उपाय योजताना मेटॅलॅक्सिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. खरीप हंगामातील सद्यःस्थितीतील कीड व रोग नियंत्रण याविषयावर डॉ. धांडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. डी. सोमवंशी, कार्यक्रम समन्वयक यांनी, तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. आर. एल. कदम यांनी केले. आभार पांडुरंग पाटील डोंगरे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com