रोगांची लक्षणे ओळखून करा उपाययोजना

लिंबूवर्गीय फळझाडातील मोसंबी हे एक महत्त्वाचे फळपीक आहे. महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यांत मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
Sweet Orange
Sweet OrangeAgrowon

मधुकर शेटे, डॉ. प्रमोद पाचणकर, डॉ. रणजित कडू

लिंबूवर्गीय फळझाडातील (Citrus Fruit Crop) मोसंबी (Sweet Orange) हे एक महत्त्वाचे फळपीक आहे. महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यांत मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड (Sweet Orange Cultivation) केली जाते. या भागातील जमीन व हवामान मोसंबी पिकाच्या (Sweet Orange Crop) वाढीसाठी अनुकूल आहे. मोसंबी पिकांवर विविध रोगांचा (Disease On Sweet Orange) प्रादुर्भाव होतो. रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. योग्य वेळी नियंत्रण केल्यास बऱ्याच कालावधीपर्यंत झाडांपासून चांगले उत्पादन मिळते. तसेच बागेचे आयुष्यमानदेखील वाढते.

डायबॅक होण्याची प्रमुख कारणे ः

- अयोग्य जमिनीची निवड.

- अयोग्य कलमांची निवड.

- अशास्त्रीय पद्धतीने बहराचे व्यवस्थापन.

- अयोग्य सिंचन पद्धती.

- लागवडीनंतर अयोग्य पद्धतीने बागेची निगा व मशागत.

- अन्नद्रव्यांचा अपुरा व असमतोल पुरवठा.

- पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष.

विविध विषाणूजन्य, बुरशीजन्य आणि काही जिवाणूजन्य रोग डायबॅकसाठी कारणीभूत आहेत. यामध्ये टिस्टीझा, ग्रीनिंग व फायटोप्थोरा हे महत्त्वाचे रोग आहेत. रोगांव्यतिरिक्त विविध किडी (मावा, सिट्रस सायला, साल खाणारी अळी) व सूत्रकृमीमुळे सुद्धा डायबॅक होऊ शकतो.

१) डिंक्या ः

- फायटोप्थोरा नावाच्या बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. कलम केलेल्या जागेच्या आसपास बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो.

- रोगग्रस्त सालीमधून डिंकासारखा चिकट द्रव बाहेर येतो. सालीचा आतील भाग काळपट किंवा भुरकट रंगाचा दिसतो. रोगट साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात.

- रोगामुळे झाड कमजोर होऊन त्याचे आयुष्यमान कमी होते.

नियंत्रण ः

- झाडाची रोगग्रस्त साल काढून ती जागा पोटॅशिअम परमँगनेट (१ टक्के) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणाने निर्जंतुक करावी. त्यावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.

- जमिनीत कलम लावताना मुळे व इतर भागांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

- ओलित करताना झाडाच्या बुंध्याला पाणी लागू नये यासाठी दुहेरी आळे किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

- पावसाळ्यापूर्वी किंवा संपल्यानंतर झाडाच्या बुंध्यास नियमितपणे बोर्डो पेस्ट लावावी.

२) पायकूज किंवा मूळकूज ः

- रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार जमिनीतून होतो.

- कलमाचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीच्या आत गाडला गेल्याने रोगाचा प्रादुर्भाव होतो.

- रोगाचा प्रादुर्भाव खोडावर व मुळावर दिसून येतो. जमिनीलगतची साल कुजते.

- झाडावरील पाने मलूल होऊन पिवळी पडतात व गळतात. फळगळदेखील होते. कालांतराने झाडही वाळते.

नियंत्रण ः

- झाडाची कुजलेली मुळे काढून त्यावर कॉपर ऑक्सिक्लोराइड हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे द्रावण टाकावे. मुळ्या मातीने झाकून हलके ओलित करावे.

- साधारण २५ ते ३० सेमी उंचीवर डोळा बांधलेली कलमे वापरावीत.

- दुहेरी आळे किंवा ठिबक पद्धतीने ओलित करावे. पावसाळ्यापूर्वी व संपल्यानंतर झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट (मोरचूद १ किलो अधिक चुना १ किलो अधिक पाणी १० लिटर) लावावी.

- सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम

प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रतिझाड १० ते २० लिटर या प्रमाणे आळवणी करावी.

Sweet Orange
क्लस्टर फॅसिलिटेशन सेलमध्ये  मोसंबी पिकाचा समावेश 

२) शेंडेमर ः

- कोलेटोट्रीकम, डिप्लोडिया या बुरशींमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

- रोगाची लागण पावसाळी हवामानात होऊन पावसाळा संपल्यानंतर लक्षणे दिसून येतात.

- कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून मागे वाळतात व गळतात.

- वाळलेल्या फांद्यावर काळसर सूक्ष्म गोल ठिपके दिसतात.

नियंत्रण ः

- पावसाळ्यापूर्वी झाडावरील रोगट व वाळलेल्य फांद्या (साल) काढून जाळाव्यात.

- साल काढल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड (०.३ टक्का) ३ ग्रॅम

प्रतिलिटर पाणी याप्रमाणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

३) कोळशी ः

- काळ्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर चिकट द्रव साचून त्यावर काळसर बुरशीची वाढ होते, यालाच ‘कोळशी’ असे म्हणतात.

- रोगाचा प्रादुर्भाव दमट व उष्ण हवामानात अधिक होतो.

- प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने, फांद्या, फळे व संपूर्ण झाड काळे पडते.

नियंत्रण ः

- काळ्या किंवा पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी,

डायमेथोएट १.५ मिलि अधिक कॉपरऑक्सिक्लोराइड (०.३ टक्का) ३ ग्रॅम

प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

Sweet Orange
Mosambi : कृषिकन्यांकडून मोसंबी बाग आराखड्याचे प्रात्यक्षिक

४) ग्रीनिंग ः

- रोगाचा प्रसार सिट्रस सायला या कीटकामुळे होतो.

- सुरुवातीस झाडातील एखाद्या मोठ्या फांदीतील पाने निस्तेज व गर्द पिवळी दिसतात. पक्व पानांतील शिरा पिवळ्या होतात किंवा पानांत हिरवे पिवळे चट्टे दिसतात. नवीन फुटीतील पाने लहान आकाराची राहून सरळ दिशेने वाढतात. पाने पिवळी होऊन त्यात हिरवे ठिपके दिसतात.

- फांद्या खुरट्या राहतात. झाडांना अवेळी बहार येतो.

- फळे लहान व विकृत आकाराची, असमान रंगाची, संख्येने कमी, चवीला कडवट आणि त्यातील बी अनेकदा अपक्व राहतात. सूर्यप्रकाशात उघडी असलेली फळे पिवळी होतात तर सावलीतील फळे हिरवी राहतात.

- रोगाची तीव्रता ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात अधिक जाणवते.

- या रोगाची लक्षणे ही जस्त व लोह या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसणाऱ्या लक्षणांप्रमाणे असतात.

- जिवाणूंची वाढ ही अन्नद्रव्य वहन करणाऱ्या शिरांमध्ये होते. त्यामुळे अन्न व पाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो किंवा वहनाची प्रक्रिया थांबते. परिणामी झाडाचा ऱ्हास किंवा डायबॅक होतो.

नियंत्रण ः

- नवीन पालवीचे सिट्रस सायला किडीपासून संरक्षण करण्यासाठी,

इमिडाक्लोप्रिड ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

- बागेतील रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत.

- छाटणीसाठी वापरलेली कात्री किंवा अवजारे प्रत्येक झाडास वापरतेवेळी सोडिअम हायपोक्लोराइट १५ मिलि प्रतिलिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करावी.

५) फळ काढणीपूर्व देठकुज ः

- आंबिया बहरातील मोसंबी फळे ४ ते ५ महिन्यांच्या अवस्थेत असताना फळ काढणीपूर्व देठकूज हा रोग आढळतो. भरपूर आर्द्रता आणि उष्ण हवामान रोगाच्या प्रसारासाठी पोषक ठरते.

- फळाच्या देठाजवळील भागावर बुरशीचा संसर्ग होऊन तो भाग करडा तपकिरी रंगाचा होतो. फळे नारंगी रंगाची होऊन त्यांची गळ होते.

- उन्हाळ्यात मेलेल्या फांद्या आणि झाडाच्या सालीवर रोगजंतू उपजीविका करून त्याचा आंबिया बहरात प्रसार होतो.

नियंत्रण ः

- जमिनीवर पडलेली व झाडांवर असलेली रोगग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.

- बहर धरण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या फांद्या काढून नष्ट कराव्यात.

६) ट्रिस्टेझा ः

- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो.

- पाने निस्तेज दिसतात किंवा त्यावर पिवळ्या रंगाच्या विविध छटा दिसतात. पानांच्या शिरा सूर्यप्रकाशात पाहिल्यास त्या पोकळ झाल्यासारख्या दिसतात. पानातील शिरा पिवळ्या आणि फुगलेल्या दिसतात.

- कलम जोडाजवळील सालीच्या आतील भागात सुईने टोकरल्यासारखे खोल व्रण आढळतात.

- रोगाची तीव्रता जास्त असल्यास, झाडे एकाएकी कोसळतात.

नियंत्रण ः

- रोगग्रस्त झाडे बागेतून काढून टाकावीत.

- मावा किडीपासून नवीन पालवीचे संरक्षण करण्यासाठी,

डायमिथोएट १.५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

- नवीन लागवडीकरिता रोगमुक्त कलमांचा वापर करावा.

- छाटणीसाठी वापरलेली कात्री किंवा अवजारे प्रत्येक झाडास वापरतेवेळी सोडिअम हायपोक्लोराइट १५ मिलि प्रतिलिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करावी.

(टीप ः लेखातील कीडनाशकांना ॲग्रेस्को शिफारशी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com