Organic Carbon : सेंद्रिय कर्बाचे महत्त्व अन् वाढविण्याचे उपाय

कोणत्याही पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी हवामान, जमीन, पाणी, रोग, कीड आणि पीक व्यवस्थापन यांची सांगड व्यवस्थित घालावी लागते.
Organic Carbon
Organic CarbonAgrowon

डॉ. प्रमोद जगताप

कोणत्याही पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी (Crop Production) हवामान, जमीन, पाणी, रोग, कीड आणि पीक व्यवस्थापन (Crop Management) यांची सांगड व्यवस्थित घालावी लागते. यातील हवामान (Climate), पाण्याची उपलब्धता, रोग आणि कीड यांचा निसर्गाशी थेट संबंध असून, त्वरित त्याचे परिणाम दिसतात. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. तुलनेने जमिनीच्या आरोग्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. आपल्या शेतीतून शाश्‍वत उत्पादन मिळवायचे असेल तर जमिनीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. जमिनीच्या सुपीकतेची विस्ताराने माहिती घेऊ. (Organic Carbon)

Organic Carbon
परंपरागत कृषी योजनेतून सरकारचं सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन 

जमिनीची सुपीकता (म्हणजे त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण) आणि उत्पादकता (पिकाचे निघणारे उत्पादन) या दोन वेगळ्या बाबी आहेत. या उत्पादनाला काही विशिष्ट दर मिळाल्यास त्यावर शेतकऱ्याला मिळणारे उत्पन्न ठरत असते. अशा प्रकारे सुपीकतेचा आणि उत्पन्नाचा सरळ संबंध आहे. जमिनीच्या सुपीकतेचे जैविक, भौतिक आणि रासायनिक असे तीन प्रकार पडतात.

१) जैविक सुपीकता म्हणजे जमिनीत असणारे उपयुक्त जिवाणू. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या जितकी जास्त तितकी जमीन सुपीक असे मानले जाते.

२) भौतिक सुपीकतेमध्ये जमिनीत असणारी मोकळी हवा, जमिनीची जलधारणा क्षमता, निचरा यांचा समावेश होतो. पिकांच्या मुळांच्या निरोगी आणि भरघोस वाढीसाठी हे गुणधर्म महत्त्वाचे आहेत.

३) रासायनिक सुपीकतेत पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांची उपलब्धता समजते. माती परीक्षणानंतर आपल्या जमिनीचा सामू, क्षारांचे प्रमाण, उपलब्ध अन्नद्रव्ये किती हे कळते. उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्ये हे त्यांच्या पिकासाठी आवश्यकतेनुसार ठरतात. त्याच प्रमाणे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, मुक्त चुना यांची माहिती मिळते.

आपल्या पिकाच्या उत्तम उत्पादकतेसाठी वरील तिन्ही प्रकारच्या सुपीकता जमिनीमध्ये असल्या पाहिजेत. या तिन्ही सुपीकता उत्तम ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण. सेंद्रिय कर्ब हा शाश्‍वत शेतीचा गाभा आहे.

Organic Carbon
'अमूल' आता सेंद्रीय उत्पादने विकणार

सेंद्रिय कर्ब म्हणजे काय?

जमिनीतील सजीवांनी जमिनीतील कोणत्याही पदार्थांचे अंशतः विघटन केल्यानंतर राहिलेला कर्ब किंवा कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो. सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थात ५८ टक्के सेंद्रिय कर्ब असतो. भारतातील साधारण ६७ टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आहे. महाराष्ट्रातील ५० टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी, तर ३८ टक्के जमिनीत मध्यम प्रमाणात आहे. माती तपासणीनंतर

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण --- सुपीकता निकष

०.२ टक्क्यापेक्षा कमी --- अत्यंत कमी

०.२१ ते ०.४० टक्के या दरम्यान --- कमी

०.४१ ते ०.६० टक्के --- मध्यम

०.६१ ते ०.८० टक्क्यांपर्यंत --- जास्त

०.८ पेक्षा अधिक --- खूप जास्त

सेंद्रिय कर्बावर यांचा होतो परिणाम ः

सेंद्रिय कर्बावर प्रामुख्याने हवामान, जमिनीतील जिवाणू, ओलावा, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रकार आणि त्यांचे जमिनीत वापरलेले प्रमाण अशा अनेक बाबींची परिणाम होतो.

१) हवामान ः जितके तापमान जास्त तितका त्याचा सेंद्रिय कर्बावर अनिष्ट परिणाम होतो. थंड तापमानात सेंद्रिय कर्ब योग्य पातळीत ठेवणे सोपे जाते. महाराष्ट्रात तापमान तुलनेने जास्त असल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढीसाठी मर्यादा येतात. जमिनीत सेंद्रिय पदार्थ किंवा खतांचा वापर केल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. बहुतांश शेतकरी एकतर पुरेशी सेंद्रिय खते वापरत नाहीत किंवा पुरेसा वापर केला तरी उष्ण तापमानामुळे सेंद्रिय पदार्थांचे वेगाने विघटन होते. परिणामी सेंद्रिय कर्ब पातळीत वाढ होण्यात अडचणी येतात.

२) जमिनीतील जिवाणू व ओलावा ः सेंद्रिय पदार्थांच्या वापरानंतर त्यांच्या जैविक आणि रासायनिक विघटनात जिवाणू महत्त्वाची भूमिका निभावतात. सेंद्रिय पदार्थ हे जिवाणूंचे अन्न आहे. तसेच जमिनीतील बुरशी, जिवाणू, ॲक्टिनोमायसेट्स असे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ कुजविण्याची प्रक्रिया सुरू करतात. पूर्ण विघटनानंतर

सेंद्रिय कर्ब वाढतो. मात्र तापमान अधिक असल्यास जमिनीत अपेक्षित वाढ दिसत नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा योग्य प्रमाणात राखणे आवश्यक असते. अधिक ओलावा असल्यास जिवाणूंची कार्यशक्ती व एकूणच विघटनाची प्रक्रियाही मंदावते.

३) सेंद्रिय पदार्थांचे गुणधर्म ः आपण वापरलेल्या सेंद्रिय खतातील सेंद्रिय कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर हे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व वेग ठरवते. उदा. गव्हाच्या काडाचे कर्ब नत्र गुणोत्तर ८०:१ तर शेणखताचे हे गुणोत्तर १६:१ या दरम्यान असते. त्यामुळे गव्हाच्या काडाचे विघटन होण्यास खूप कालावधी लागतो. जमिनीत नत्राचे प्रमाण खूप कमी असेल तर सेंद्रिय पदार्थ विघटनाची क्रिया मंदावते.

४) जमिनीचे गुणधर्म -जमिनीचा सामू जर ४.५ पेक्षा कमी आणि ८.५ पेक्षा जास्त असला तरी जिवाणूंवर अनिष्ट परिणाम होतो. सेंद्रिय पदार्थाचे विघटन मंद होते. ज्या जमिनी लागवडीखाली आहेत त्या जमिनीत सेंद्रिय कर्ब हा पडीक जमिनीपेक्षा कमी असतो. सुधारित तंत्रज्ञानाने सेंद्रिय कर्बामध्ये वाढ करता येते.

सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने फायदे ः

सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते. परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते. अशा जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असल्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकताही लक्षणीय प्रमाणात सुधारते. जमिनीची जलधारणाशक्ती, पोत सुधारतो, त्यामुळे क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची निरोगी, जोमदार वाढ होते. जमिनीचा सामू अधिक असल्यास तो कमी होण्यास मदत होते. जीवाणूद्वारे सेंद्रिय आम्ले सोडली जातात. या आम्लांमुळे रासायनिक अभिक्रिया वाढून स्थिर झालेली सेंद्रिय व रासायनिक अन्नद्रव्येही पिकांना उपलब्ध होऊ लागतात. म्हणून सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवणे जमिनीच्या जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकतेसाठी महत्त्वाचे ठरते.

सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या उपाययोजना ः

१) जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणे हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा रामबाण उपाय आहे. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत, प्रेसमड केक, प्रेसमड केकचे कंपोस्ट, हिरवळीची पिके, अखाद्य पेंडी (निंबोळी पेंड, करंज पेंड, सरकी पेंड इ.)

२) जनावरे जोपासणे अवघड ठरत आहे. त्यांची संख्या कमी होत चालल्याने शेणखताचा पुरेसा वापर शेतात होण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. मात्र शेणखत अपुरे आहे किंवा उपलब्ध नाही म्हणून रासायनिक खतांचा अधिक वापर धोकादायक ठरू शकतो. कारण सेंद्रिय खतांसाठी कोणतेही रासायनिक खत पर्याय ठरू शकत नाही.

३) एक सेंद्रिय खत उपलब्ध नसेल, दुसऱ्या सेंद्रिय खतांचाच पर्याय योग्य ठरतो. उदा. उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवणे. पिकांची फेरपालट करून नत्र स्थिरीकरण करणारी पिके घेणे.

४) जमिनीस आवश्यक विश्रांती दिल्यावरही सेंद्रिय कर्ब टिकण्यास मदत होते.

५) पिकांसाठी रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा.

६) पिकांच्या गरजेनुसारच पाण्याचा वापर करावा.

७) निसर्गातील सेंद्रिय पदार्थ हे जमिनीच्या दृष्टीने मोलाचे असतात. उदा. शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष इ. पासून सेंद्रिय खत करून वापर करावा.

८) हिरवळीच्या पिकांचा (उदा. ताग, धैंचा, चवळी इ.) सेंद्रिय कर्ब वाढण्यास खूप फायदा होतो. पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा. योग्य वेळी ती जमिनीत गाडावीत.

९) जमिनीत जिवामृत, व्हर्मिवाश यांचाही वापर करावा.

१०) पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्याने घेऊ नये. त्यात वेळोवेळी बदल करावेत.

११) आपण पिकाच्या अधिक उत्पादनक्षम जाती निवडत असल्यामुळे त्यांच्या पोषकतेचाही व्यवस्थित विचार करावा. सेंद्रिय खतात सर्व प्रकारची अन्नद्रव्ये अल्प प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त वेगवेगळी विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हार्मोन्स) आणि जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) मिळतात. यामुळे उत्पादनाचा दर्जा (उदा. गोडी, रंग इ.) आणि रोग, कीड प्रतिकारकशक्ती वाढते.

१२) सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात अधिक असून, या थराची धूप होणार नाही, याची काळजी घ्यावी.

अशा प्रकारे जमीन आणि पीक व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्ब वाढीचा गांभीर्याने विचार करावा.

--------------

डॉ. प्रमोद जगताप, ९४२२०७१२९३

(मृदा शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com