उन्हाळ्यात कलिंगडाचे आरोग्यासाठी महत्त्व

महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर, तर खरबुजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. मूळ आफ्रिकेतील हे फळ भारतातील कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जाते.
Watermelon
WatermelonAgrowon

सचिन शेळके, डॉ. संदीप प्रसाद

उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे कलिंगड (शा. नाव - स्रिटलस व्हल्गॅरिस) हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर, तर खरबुजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. मूळ आफ्रिकेतील हे फळ भारतातील कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात, तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. पूर्वी कोणत्याही पिकात आंतरपीक म्हणून किंवा नदीपात्रात, तलावात गाळपेर म्हणून कलिंगडाचे उत्पादन घेतले जाई. मात्र, अलीकडे वाढती मागणी आणि दर लक्षात घेऊन कलिंगडाची लागवड मुख्य पीक करू लागले आहेत.

  • -उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे हे फळ आहे. अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होतो.

  • - मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक.

  • -कच्च्या कलिंगडाची भाजी, तसेच लोणची तयार केली जातात.

कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्न घटकाचे प्रमाण -

या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क जीवनसत्त्वे असतात. पाणी ९३%, शर्करा पदार्थ ३.३%, प्रथिने २.०%, तंतुमय पदार्थ ०.२%, खनिजे १.३%, चुना ०.१%, स्फुरद ०.९%, लोह ०.८%, जीवनसत्त्व ‘अ’ ११%, जीवनसत्त्व ‘क’ १३%, जीवनसत्त्व ‘ब’ १०%, जीवनसत्त्व ‘ई’ ७%.

कलिंगडाचे आरोग्यासाठी फायदे ः

१) कलिंगडामधील जीवनसत्त्व अ आणि ‘क’मुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहे.

२) उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे. त्यात कमी प्रमाणात सोडिअम असून, ते थंड असते.

३) किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कलिंगड खाल्ल्यास किडनी साफ होण्यास मदत होते.

४) कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे या अ‍ॅण्टिऑक्सिटेंटचे प्रमाण अधिक असून, कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.

५) कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असून, अधिक वेळ पोच भरल्याची भावना राहते. यामुळे वजन कमी राहण्यास मदत होते.

६) कलिंगड फळ खाणे किंवा ताजा रस प्यायल्यामुळे या फळातील अधिक असलेले सिट्रूलिन अमिनो आम्ल रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करते. अतिकष्टामुळे स्नायूंमध्ये आलेला ताण कमी करते.

७) रसाऐवजी कलिंगड चावून खावे. त्यातील चोथा व आर्द्रता यामुळे मलावरोधाची तक्रार कमी होते. पोट साफ होते.

८) व्यायामापूर्वी कलिंगडाच्या रसाचे सेवन केल्यास दाह कमी करते. त्यातील फ्लॅव्हेनॉइड, कॅरोटीनॉइड यासारखे घटक दाह निर्माण करणाऱ्या ट्रीटेरपेनॉइड घटकांशी लढतात.

९) कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे. त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा. या गाळलेल्या पांढऱ्या दुधाचा वापर भाजी किंवा आमटीत करता येतो. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद वाया जात नाहीत.

१०) कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो. उष्माघातामुळे शरीराची, डोळ्याची, तळपायाची आग होत असल्यास कापलेल्या कलिंगड किंवा टरबुजाची साल त्या अवयवावर ठेवल्यास आग कमी होते.

कलिंगड फळ खाताना...

१) कलिंगड हे फळ पिकल्यानंतर माठाखाली ठेवावे. पाण्याने ओले केलेले थंड कापड त्यावर टाकावे. त्यानंतर चार ते पाच तासांनी कलिंगड खावे. फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये. तसेच एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. म्हणून ते लगेचच खावे.

२) फ्रीजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्ल्यास अनेक वेळा

फूड पॉयझनिंग (अन्न विषबाधा) होऊन जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात.

२) अनेक जण कलिंगड खाताना चवीसाठी त्यावर मीठ टाकतात. मात्र कलिंगडामध्ये नैसर्गिकरीत्या सोडिअम क्लोराईड, पोटॅशिअम हे क्षार असतात. त्यावर मीठ टाकल्यास क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते. शक्यतो नैसर्गिक स्थितीतील कलिंगड कापून त्वरित खावे.

सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (सचिन शेळके हे सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्‍वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील आचार्य पदवीचे विद्यार्थी असून, डॉ. संदीप प्रसाद हे डेअरी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com