Rural Development : शेती, ग्रामविकासात ‘लोकप्रबोधन’चा ठसा

उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करत संस्थेने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

देशी बियाण्यांचा प्रचार-प्रसार, सेंद्रिय शेती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष मदतीसह कृषी, ग्रामविकासाच्या (Rural Development) क्षेत्रात बावीस वर्षांपासून आरळी बुद्रुक (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील लोकप्रबोधन संस्था (Lokprabhodhan Organisation) कार्यरत आहे. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करत संस्थेने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी धनाजी सुभेदार धोतरकर यांच्या पुढाकारातून बावीस वर्षांपूर्वी लोकप्रबोधन संस्थेची सुरवात झाली. आरळी येथे त्यांची स्वतःची १२ एकर शेती आहे. धोतरकर यांनी २००० पासून सेंद्रिय शेतीला चालना देत देशी बियाण्यांचा प्रचार आणि प्रसार कार्यात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रबोधन संस्था उदयाला आली.

Rural Development
Crop Insurance : नुकसानीच्या ५२ हजार पूर्वसूचना नाकारल्या

२००९ मध्ये धोतरकर यांचा पुण्यातील शिरीष कुलकर्णी तसेच अफार्म, बाएफ संस्थेशी संपर्क झाला. यातून देशी बियाणे संकलनास सुरुवात झाली. संस्था ग्रामीण भागात लोकसहभागातून आरोग्य, शिक्षण, युवा शेतकरी, महिला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्‍नांवर काम करते. सध्या उपाध्यक्ष अपर्णा ढेकणे, सचिव लक्ष्मण काटकर आहेत. याचबरोबरीने सुधाकर कदम, बालाजी माने, बंडोपंत कोळेकर आणि प्रदीप पाटील हे संस्थेच्या कार्यकारिणीवर आहेत.

Rural Development
Cashew Crop Insurance : काजूसाठी विमा योजना

जलसंधारण, रोजगार हमीबाबत जनजागृती ः

महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजना आणि जलसंधारणाच्या कामाबाबत संस्थेकडून जनजागृती करण्यात येते. सार्वजनिक कामे (वनतळे, वृक्ष लागवड, भूमिगत बंधारे, माती नालाबांध, गाव तलाव, जलाशयातील गाळ काढणे आदी.), वैयक्तिक कामे (सिंचन विहीर, रोपवाटिका, शोषखड्डे, बांधदुरुस्ती, सीसीटी, सपाटीकरण) यासारख्या कामांबाबत तसेच रोजगार हमी योजनेतून यापैकी कोणती कामे घेता येतात, त्याचा फॉर्म भरणे, जॉबकार्ड काढून देण्यापासून कामाची मागणी ते सर्व आनुषंगिक कामे शेतकऱ्यांना करून दिली जातात. २०१७ पासून आजपर्यंत उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, नळदुर्ग या पाच तालुक्यांतील जवळपास २५ गावांतील ३५० शेतकऱ्यांना विविध कामे संस्थेने उपलब्ध करून दिली आहेत. दरवर्षी प्रत्येकी पाच गावे रोजगार हमी योजनेतील कामासाठी निवडून, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गरजांनुसार आणि मागणीनुसार कामे उपलब्ध करून दिली जातात.

सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन ः

शेतकऱ्यांना दशपर्णी, पंचामृत, गोमूत्र, जीवामृत व गांडूळ खताच्या निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, लोहारा आणि लातूरमधील औसा तालुक्यातील सुमारे पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

संस्थेने कार्यक्षेत्रात गो आधारित सेंद्रिय शेती करणाऱ्या गरजू वीस शेतकऱ्यांना गोशाळेच्या मदतीने प्रत्येकी एक देशी गाय भेट दिली आली. हे शेतकरी शेण, गोमूत्राचा वापर करून सेंद्रिय खते, कीडनाशक तयार करतात. काही भाकड गाई दुभत्या झाल्या आहेत. दिलासा संस्था (यवतमाळ) यांच्यामार्फत २५ शेतकऱ्यांना वैरण कातरण्यासाठी मोठ्या विळीचे वाटप करण्यात आले. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २००० लिटर क्षमतेची टाकी तसेच १००० लिटर क्षमतेचे सिमेंटचे ५० हौद शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

बचत गटांना व्यवसाय प्रशिक्षण ः

लातूर जिल्ह्यातील ५० आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या २० गावांतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना उषा इंटरनॅशनल, दिल्ली, अफार्म संस्था, पुणे यांच्या माध्यमातून शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. २०१७ पासून सुमारे १५०० हून अधिक महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी काही महिलांनी शिवणकामाला सुरुवात केली. बचत गटातील महिलांसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन, कृषिनिविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. यातून ५० महिलांनी प्रत्यक्ष उद्योग सुरू केले आहेत.

कार्यक्षेत्रातील १००० कुटुंबांना परसबागांसाठी देशी बियाणे वाटप करण्यात आले. त्यातून तीन गुंठ्यांच्या काही परसबागा तयार झाल्या आहेत. जनसाथी दुष्काळ निवारण मंच (यवतमाळ) यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील ३० विधवा शेतकरी महिलांना शेती आणि कुटुंबाच्या खर्चासाठी विना परतावा प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थसाह्यही देण्यात आले. या शेतकरी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक उपक्रम राबवले जातात.

पुरस्काराने गौरव ः

संस्थेला नेहमीच टाटा सामाजिक संस्था तसेच अभिव्यक्ती संस्था, नाशिक यांचे सहकार्य लाभते. या संस्थांमार्फत शेतकरी आणि ग्रामविकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, उपक्रम आखले जातात. ग्रामीण भागातील महिला आणि बालकांसाठी संस्था युनिसेफ बरोबर काम करते. देशी बियाणे, सेंद्रिय शेती, दुष्काळ व ग्रामविकासाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष म्हणून धनाजी धोतरकर यांना २०१४ मध्ये ‘कृषिमित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

देशी बियाण्यांची बँक ः

संस्थेने उस्मानाबाद जिल्ह्यातील ८० टक्के गावांत देशी बियाणे आणि सेंद्रिय शेतीसाठी प्रबोधन केले आहे. संस्थेकडे सुमारे १२५ हून अधिक पिकांच्या देशी बियाण्यांची बँक आहे. यामध्ये हुलगे, करड, अंबाडी, तीळ, जवस, मूग, मटकी, कारळ, नाचणी, राळ, साव, भगर, मूग, गहू, बाजरी, पिवळी, काळी साळी, लालसाळी, पांढरी साळी, हरभरा आणि पालेभाज्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना देशी बियाणे देताना त्या बदल्यात तेच बियाणे पुन्हा त्यांच्याकडून दुपट्टीने घेतले जाते. आज त्यांच्या बियाणे बँकेचा हा व्यवहार राज्यातील अन्य जिल्ह्यापर्यंतही पोहोचला आहे.

ग्रामविकासातील संस्थेचे उपक्रम ः

१) युवा विकास व्यसनमुक्ती केंद्र ः गावागावात व्यसनमुक्तीवर मेळावे, मार्गदर्शन शिबिर. व्यसनमुक्त तरुणांचा सन्मान.

२) प्रजनन बाल आरोग्य केंद्र ः किशोरी नवदांपत्य, लाभार्थी कुटुंबासाठी जनजागृतीपर कार्यक्रम.

३) आयुष प्रकल्प ः शालेय मुलांना योगासनाची माहिती व प्रात्यक्षिके.

४) एड्स जनजागृती कार्यक्रम ः दरवर्षी एक डिसेंबरला जागतिक एडसदिनानिमित्त जनजागृती.

५) वृक्षारोपण ः सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षलागवडीत सहभाग. दरवर्षी कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका गावात २५ वृक्षांची लागवड.

६) शेतकरी संवाद वाचनालय ः दैनिक ‘अॅग्रोवन’सह विविध साप्ताहिक, पाक्षिके, मासिके आणि प्रमुख दैनिकांची उपलब्धता. सेंद्रिय शेती, आरोग्य, पर्यावरण, पाणी, शिक्षणआदी विषयासंबंधी ध्वनिमुद्रिकांची उपलब्धता.

संपर्क ः धनाजी धोतरकर, ९८२२९९८८२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com