Millet Cultivation : लागवडीमध्ये करा भरडधान्यांचा समावेश

२०२३ हे भरडधान्य वर्षे जाहीर झाल्यापासून त्यांच्या आरोग्याविषयीच्या फायद्याविषयी फार बोलले जात आहे. पण आपण या पिकांची शेतीमध्ये लागवड कशी करावी, याविषयी या लेखातून माहिती घेऊ.
Millet Cultivation
Millet Cultivation Agrowon

मयूरी अनूप देशमुख

Millet Crop Cultivation भरडधान्ये ही पोषक आणि आरोग्यासाठी (Millets For Health) उपयुक्त असली, तरी प्रामुख्याने दुर्लक्षित आहेत. काही प्रमाणात त्यांची आदिवासी किंवा दुर्गम पट्ट्यामध्ये लागवड (Millet Cultivation) होते.

त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळे सध्या भरडधान्याविषयी होत असलेल्या प्रसाराच्या (Millet Awareness) पार्श्‍वभूमीवर वाढत्या मागणीची पूर्तता कशी होणार असा प्रश्‍न आहे.

कारण ही धान्ये आपण शेतकऱ्यांनी पिकवलीच नाही, तर सर्वसामान्यांच्या ताटात येणार कोठून? म्हणजेच या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पिकांच्या लागवडीमध्ये असलेल्या संधी ओळखायला हव्यात. कमी पाण्यावरील ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला नक्कीच चालना देतील.

वरई (Little Millet)

अन्य नावे ः वरी, कुटकी

ओळख ः धान्याचा आकार सर्वांत लहान असल्यामुळे इंग्रजीमध्ये ‘लिटल मिलेट’ या नावाने ओळखतात.

भारतातील पारंपरिक पिकांपैकी एक असलेल्या या पिकाची महाराष्ट्रात अमरावती (चिखलदरा, धारणी), नगर (अकोले), नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इ. भागांत लागवड केली जाते.

दुर्गम प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न असलेल्या या धान्याची अन्यत्र ओळख ही उपवासासाठीचे अन्न म्हणून अधिक आहे.

एकदल प्रकारातील या पिकाची उंची ३० ते १५० सेंमीपर्यंत असते. पाने गवताच्या पात्यांप्रमाणे असून, मऊ किंवा त्यावर लव असते. खोड काडीसारखे बारीक व सरळ वाढणारे आहे.

भातासारखी यास फुले येत असून, चार ते पाच सेंमी लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे हे पीक अधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशातही चांगले उत्पादन देते.

आरोग्यासाठी महत्त्व ः

भगरीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण भरपूर आहे. सर्वसामान्य लोक केवळ उपवासादिवशी खातात. गहू, भाताला पर्याय म्हणून दैनंदिन आहारात समावेश करायला हवा.

बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारावर उपयुक्त.

अधिक तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी लाभदायक.

शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावते.

लागवड तंत्रज्ञान ः

अनुकूल हवामान - वार्षिक पर्जन्यमान- २५०० मिमी.

समुद्रसपाटीपासून २१०० मी. उंचीपर्यंत प्रदेशात होते.

वाढीसाठी पोषक तापमान- २३ ते २७ अंश सेल्सिअस.

जमीन- हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची जमीन असावी. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पादन मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. रोप लागवड पारंपरिक आणि प्रचलित पद्धत आहे.

Millet Cultivation
Millet Cultivation : ‘कृषी’चा ज्वारी, बाजरी लागवडीवर ‘फोकस’

रोपवाटिका

एक एकर क्षेत्र लागवडीसाठी २ ते ३ गुंठे क्षेत्र, ८ ते १० सेंमी. उंच व उतारानुसार लांबी ठेवावी.

बीजप्रक्रिया आवश्‍यक आहे.

लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास २० ते २५ दिवसांनी पहिले आणि ४० ते ४५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

लागवडीनंतर एक महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरावे.

आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर, कारळा ही पिके २ ते १ या प्रमाणात घेता येतात.

सुधारित वाण ः फुले एकादशी

उत्पादन ः सरासरी धान्य उत्पादन हेक्टरी १२ ते १४ क्विंटल, कडबा उत्पादन २० ते २५ क्विंटल.

कालावधी- १२० ते १३० दिवस.

कोडो (Kodo Millet)

अन्य नावे - कोद्रा, पायगवत, भातगवत, खडक बाजरी.

संस्कृत - कादेरा, कन्नड - हर्का

सुमारे तीन हजार वर्षांपासून भारतात या पिकाची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे ९० सेंमी.पर्यंत उंच वाढते. लघू पौष्टिक तृणधान्यापैकी याचे धान्य सर्वांत जाडे भरडे असून, तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे.

१०० ते ११० दिवसांत ते परिपक्व होते. भारतात जवळपास १.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यातून ०.८४ लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता ४२९ किलो प्रति हेक्टर आहे.

Millet Cultivation
Millets Year 2023: भरडधान्य आहारात महत्त्वाची का आहेत?

आरोग्यासाठी महत्त्व ः

भरपूर तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चांगले.

ॲन्टी ऑक्सिडेंटचे प्रमाण चांगले असल्याने मधुमेही लोकांच्या आहारात भाताला पर्याय म्हणून कोडोची शिफारस वैद्यकीय तज्ज्ञ करतात.

यात लेसिथिनची मात्रा अधिक असून, ते मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

महिलांमधील रजोनिवृत्तीनंतर होणारा हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टोरॉल यापासून मुक्ततेसाठी या धान्याचे नियमित सेवन फायदेशीर ठरते.

ग्लुटेन मुक्त.

लागवड तंत्रज्ञान

हलक्या, खडकाळ मुरमाड जमिनीपासून ते पोयट्याच्या जमिनीत येते. खोल पोयट्याच्या आणि कसदार जमिनीत अधिक उत्पादन मिळते. चांगल्या निचऱ्याची जमीन उत्तम ठरते.

उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात येणारे हे पीक आहे. दुष्काळात तग धरून राहण्याची क्षमता आहे. त्यामुळे कमी आणि अनिश्‍चित पाऊस पडणाऱ्या ठिकाणी लागवडीस उपयुक्त.

वार्षिक पर्जन्यमान ४०० ते ५०० मिमी असणाऱ्या प्रदेशात लागवड करतात.

खरीप हंगामात पेरणी पद्धतीने लागवड करतात.

बियाणे प्रमाण १० ते १२ किलो प्रति हेक्टरी.

सुधारित जाती : जीपीके-३, जेके-१३, जेके-६५

आंतरपिके- कोडो अधिक मूग, कोडो अधिक तूर, कोडो अधिक सोयाबीन ही २ : १ या प्रमाणात फायद्याचे.

उत्पादन - हेक्टरी धान्य १५ ते २० क्विंटल, तर कडबा ३० ते ४० क्विंटल.

Millet Cultivation
Millet Processing : भरधान्याच्या मूल्यवर्धनातून पूरक उद्योगाला संधी

बर्टी (Barnyard Millet)

अन्य नावे ः सावा, शमुल, सावऱ्या. हिंदीत झंगोरा नावाने परिचित.

ओळख ः हे एकदल वर्गातील पीक असून, ५० ते १०० सेंमी. सरळ उंच वाढते. फुटव्यांची ४ ते ७ पर्यंत संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे सपाट व मऊ, बारीक लव असते. दुष्काळी किंवा अतिपर्जन्यमान असलेल्या भागातही तग धरून राहण्याची क्षमता.

धान्य आणि चारा अशा दुहेरी हेतूने लागवड केली जाते. भारतातील उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तमिळनाडू, गुजरात व महाराष्ट्रात लागवड होते.

भारतात ०.९३ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून, ०.७३ लाख टन एकूण उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता ७५८ किलो प्रति हेक्टरी आहे.

आरोग्यासाठी महत्त्व

पचनासाठी हलके अन्न म्हणून उपवासात बर्टी भाताप्रमाणे शिजवून खाल्ली जाते. विशेषतः नवरात्रीच्या उपवासासाठी मागणी असते.

धान्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून, यातील प्रथिने सहज पचण्याजोगी.

पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीतील कमी कष्टाची व बैठे काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे.

यातील नियासिन जीवनसत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

लिनोलिक, पाल्मेटिक आणि ओलिक ही असंपृक्त मेदाम्ले हृदयरोगी व मधुमेहींसाठी उपयुक्त.

रक्तातील साखरेची आणि लिपीडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी.

ग्लुटेनमुक्त असून, ग्लुटेनची ॲलर्जी असणाऱ्यांसाठी उपयुक्त.

लागवड तंत्रज्ञान

हलकी ते मध्यम जमीन उपयुक्त. पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम.

उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात येणारे पीक. समुद्रसपाटीपासून २७०० मी. उंचीपर्यंतच्या भागात पीक

वार्षिक पर्जन्यमान २०० ते ४०० मिमी. आवश्यक.

खरीप हंगाम. लागवड पेरणी पद्धतीने. जास्त पावसाच्या प्रदेशात रोप लागवड.

बियाणे- ३ ते ४ किलो हेक्टरी.

आंतरपीक पद्धती - बर्टी अधिक राजमा

(४ : १) प्रमाणात फायदेशीर.

वाण- फुले बर्टी, व्हीएल २०३

उत्पादन- हेक्टरी धान्य १८ ते २० क्विंटल,

कडबा- २० ते २५ क्विंटल.

प्रा. मयूरी अनूप देशमुख, ९२८४५२२२८४

(मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com