हिरवळीच्या खतामुळे सेंद्रिय पदार्थ, अन्नद्रव्यात वाढ

हिरवळीच्या खतासाठी ताग घेतल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि अत्यावश्यक अन्नद्रव्यांमध्ये वाढ होत आहे. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून कार्यक्षमता वाढते. तागाचे पीक जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेते. पीक गाडल्यानंतर वरच्या थरात ही अन्नद्रव्ये मिसळतात. ही उसाला उपलब्ध होतात.
Green Manure
Green ManureAgrowon

तागाच्या (Jute) मुळावरील गाठीमधील रायझोबियम जिवाणू हवेतील नायट्रोजन घेतात. नंतरच्या पिकाला जिवाणू नत्र हे नायट्रेट आणि अमोनियमच्या अवस्थेत उपलब्ध करून देतात. उसाच्या (Sugarcane) सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रेट-नायट्रोजनचा वापर जास्त होतो. जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म टिकवण्यासाठी ऊस घेण्यापूर्वी ताग जमिनीत गाडल्याने रासायनिक खतांची (Chemical Fertilizer) उपलब्धता वाढते. सेंद्रिय पदार्थामुळे सूक्ष्म जिवाणू, गांडुळे, विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढते. नत्रयुक्त खतांचे स्थिरीकरण होते.

सेंद्रिय कर्ब

हिरवळीच्या खतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.१० पासून १.४० टक्क्यांपर्यंत वाढते.सेंद्रिय पदार्थाच्या एकूण वजनाच्या ५८ ते ६० टक्के सेंद्रिय कर्ब मिळतो. उरलेल्या ४० टक्क्यांमध्ये इतर अत्यावश्यक अन्नद्रव्ये मिळतात.

जमिनीत १ टक्का कार्बनसाठी १ हेक्टर जमिनीत वरच्या १ फुटात ४२ टन सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. त्यासाठी ७२ टन सेंद्रिय पदार्थ वेगवेगळ्या सेंद्रिय खतांच्या माध्यमातून जमिनीमध्ये ऊस लागवडीपूर्वी मिसळून देणे आवश्यक आहे.

मातीची रचना

ताग कुजण्याच्या प्रक्रियेत आम्ल वाढल्याने मातीच्या कणांची रचना व जडण-घडण, बदलून हे कण एकमेकांना चिकटून राहतात. त्यामुळे जमिनीत सच्छिद्रता वाढते. माती कणांची रचना बदलून जमिनीतील हवेचे प्रमाण आणि निचरा वाढतो. समस्यायुक्त जमिनीचा सामू कमी झाला.

अन्नद्रव्यांची उपलब्धता व सेंद्रिय कर्बाची पातळी वाढल्याने तागानंतरच्या ऊस संख्येत आणि उत्पादनात हमखास वाढ होते.जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते.

गांडुळांची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. मातीच्या रचनेत बदल झाल्याने जमिनीत हवेचे प्रमाण वाढून उसाच्या मुळ्या खोलवर शिरतात. पीक पाण्याचा ताण सहन करते.मुळ्या खोलवर गेल्याने ऊस पडण्याचे प्रमाण कमी होते.

Green Manure
Mango Farming : संत्रा पट्ट्यात आंबा, बांबूची व्यावसायिक शेती

भौतिक गुणधर्मात बदल

पाणी मुरण्याचा वेग वाढतो. धूप कमी होते, जमिनीत तागामुळे ह्युमस वाढल्याने त्याच्या वजनाच्या ९० टक्के पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीतील पाणी मुरण्याचा वेग तासाला २.८ सेंमी. वरून ३.९ सेंमी., जमिनीतील पाणी धारणक्षमता हेक्टरी ५.५ सेंमी ने वाढली आहे. जमिनीतील ऑक्सिजन पातळी वाढल्याने स्फुरद, पालाश आणि गंधक ही अन्नद्रव्ये ऊस पिकाला ग्रहण करता येतात.

रासायनिक गुणधर्मात बदल

रासायनिक खतांबरोबर हिरवळीच्या खताच्या वापरामुळे उसामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया ऊस पानांमध्ये वाढल्याचे आढळून आले आहे. एकूण नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक उपलब्ध होतो. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि लोह वाढल्याचे दिसून आले. उसाला नियमितपणे वाढीच्या काळात नत्राचा पुरवठा होतो. फॉस्फरस अन्नद्रव्याचा वापर ३९ टक्क्यांनी वाढला आहे.

Green Manure
गुजरातमध्ये विद्यार्थी गिरवणार सेंद्रीय शेतीचे धडे

जैविक गुणधर्मात वाढ

जमिनीतील जिवाणू आणि सूक्ष्मजीवांना अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. जिवाणूंची संख्या तागाचे पीक मातीआड केल्याबरोबर वाढत जाते. सेंद्रिय खाद्य मिळाल्याने त्यांची संख्या आणि कार्यक्षमता वाढते. सेंद्रिय व रासायनिक खते पिकास उपलब्ध करून देण्याचे काम जिवाणू करतात. या तंत्राने जमीन सुपीक होते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला घेता येतील अशा अवस्थेत बदल करण्याचे काम जिवाणू करतात.

मायकोरायझा बुरशीचा संख्येत वाढ झाल्याने मातीचे कण चिकटून राहतात. जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढल्याने रासायनिक खते, कीडनाशकांच्या अवशेषांचा परिणाम कमी जाणवला. जमिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी होऊन उसामध्ये रोग प्रतिकारक्षमता वाढत आहे.

नत्र स्थिरीकरण

रासायनिक खतावाटे दिलेल्या नत्र निचऱ्याद्वारे वाहून जातो. पण तागामुळे उपलब्ध झालेले नत्र मातीच्या कणांना घट्ट धरून राहतो. तागाचे पीक हिरवळीच्या खतासाठी घेतल्याने नत्राचे स्थिरीकरण होते.

सुरवातीच्या ऊस वाढीच्या काळात विशेषतः ऊस ३ ते ६ महिन्याचे असताना नत्राचा जवळपास ४० ते ६० टक्के पुरेपूर वापर झाल्याने उसाला चांगले फुटवे फुटून संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

हिरवळीची पिके नत्र खताला चांगला पर्याय ठरू पाहत आहे. कार्बनःनत्र प्रमाण कमी असल्याने (१६ः१) जैविक प्रक्रियेमुळे नत्राचा रासायनिक खतांसारखा फायदा होतो. त्यामुळे तागाची कुजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि त्यातील नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा पुनर्वापर होतो. अन्नद्रव्यांचा निचरा होण्यास प्रतिबंध होत आहे. हिरवळीचे खत वापरल्याने जमिनीत नत्राचे स्थिरीकरण झाले. त्यामुळे उसाला तुरा येण्याचे प्रमाण कमी झाले.

तण नियंत्रण

हिरवळीच्या पिकांद्वारे वाढीच्या अवस्थेत आणि कुजण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट रसायने जमिनीत सोडली जातात. त्यामुळे तणांच्या उगवणीवर परिणाम होऊन त्यांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते.

या तंत्राने पाडेगाव संशोधन केंद्रातील ५० एकर क्षेत्रातील हरळी व लव्हाळा पिकाचे नियंत्रण करणे नैसर्गिकरीत्या शक्य झाले. जमिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी होऊन उसामध्ये रोग प्रतिकारक्षमता वाढत असल्याचे आढळून आले.

क्षारयुक्त जमिनीवर परिणाम

समस्यायुक्त जमिनीचा सामू कमी होतो. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. सेंद्रिय कर्बाची वृद्धी होते. ऊस लागवड, ईएसपी १५ टक्क्यांपेक्षा कमी, क्षारांचे प्रमाण मीटरमध्ये १.१ डेसीसायमन पेक्षा कमी, पाण्यातील ईसी ०.५ पेक्षा कमी झाल्याने उत्पादनात घट होत नाही.

पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास उसाला पुरेसे पाणी आणि अन्नद्रव्य घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास पोटॅश आणि मॅग्नेशिअम अत्यंत कमी उपलब्ध होतात.

तागाचे उत्पादन

ताग गाडल्यानंतर दुसरे पीक ३५ ते ४५ दिवसांनी घ्यावे. कुजण्यासाठी ४ ते ६ आठवडे लागतात. गाडण्यास उशीर केल्यास कुजण्यास वेळ लागतो. कुजण्याची प्रक्रिया प्रामुख्याने हवामान आणि पीक अवस्थेवर अवलंबून असते.

साधारणपणे ३० टनांपर्यंत सेंद्रिय खत तागामुळे उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे १३४ किलोपर्यंत नत्र, २० ते २५ किलो स्फुरद आणि ४० ते ६५ किलो पालाश या अन्नद्रव्यांची भर पडते. ऊस पिकात तागाचे पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास उत्पादनामध्ये ८ टनांनी वाढ होते.

फेरपालटीनंतर ऊस उत्पादन

हिरवळीच्या खताच्या वापराने ऊस उत्पादनात ५७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. ऊस फुटवा, उंची आणि हिरवेगारपणा वाढतो.

उसाच्या एकरी १०० ते १२५ टन अधिक उत्पादनासाठी जमिनीत हिरवळीचे खत, प्रेसमड किंवा पाचट कंपोस्ट आणि गांडूळ खत हे १ः१: ०.५ या प्रमाणात मिसळल्यास कार्बनचा साठा वाढणार आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.

उशिरा ताग गाडण्याचा परिणाम

गाडण्यास १५ ते २० दिवसांचा उशीर झाल्यास तागातील तंतुमय पदार्थ, कठीण तंतुमय धागे, काष्ट तंतू, कार्बन ः नत्र प्रमाण वाढते. नत्राचे प्रमाण कमी होते. पेशीभित्तिकेच्या मजबुतीमुळे ताग कुजण्यास विलंब होतो. तंतुमय पदार्थ विघटन करण्यास सूक्ष्मजीवांना कठीण जाते आणि कुजण्यास विलंब होतो.

उशिरा ताग गाडल्यास कार्बन वाढत असला तरी त्याबरोबर नत्र कमी होत जातो. त्यामुळे या वाढलेल्या कर्बाचा कुजण्यासाठी आणि नंतरच्या उसाच्या पिकाला अपेक्षित फायदा होत नाही. उशिरा ताग गाडल्याने पॉलीफिनॉल रसायनाचे प्रमाण वाढल्याने जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. धाग्यांची संख्या आणि प्रमाण वाढल्याने खत म्हणून फायदा कमी होतो. ज्या जमिनीत कॅल्शिअम आणि पोटॅश कमी आहे, त्या ठिकाणी तागाचे पीक ६० दिवसांत गाडावे.

---------------

- डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७,

(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com